मणी - १०
काही समारंभ, काही प्रसंग
सुखदुःखाचे धागे मानवी जीवनाच्या महावस्त्रात कसे एकमेकात गुरफटलेले असतात, त्याचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे. १९५८ साली प्रमोद मॅट्रिकला first class first आला. केवढा आनंदाचा प्रसंग! पण दुसऱ्याच वर्षी त्याची आई आजारी पडली. डाव्या पायाची शीर लागून तिला असह्य दुःख व वेदना सोसाव्या लागल्या. नीट चालता येत नसे. डॉ. दामले कडून लाईट घेणे वगैरे उपचार झाले पण आराम पडेना. मग डॉ. दामलेंनी मेयो हॉस्पीटल मधील रेडियोलाॅजिस्ट डॉ. कणिकदळे यांना पत्र देऊन Diathermic Treatment देण्यास सुचविले. १५ दिवस रोज मी तिला घेऊन मेयो हॉस्पीटलमध्ये जात असे व Diathermic Treatment देऊन परत आणत असे. तिच्या दुखण्याचे नाव सायटिका. काही उत्साही लोक भेटीला येत व म्हणत, 'ही आता अशीच अधू राहणार'. मी अत्यंत अस्वस्थ होतो. पण त्या दुखण्यातून ती पूर्णतया बरी झाली. त्यानंतर इतका प्रवास झाला. यात्रा झाल्या.
१४ मार्च १९८५ ला आमची धाकटी मुलगी चि. वृंदाला मुलगा झाला. केवढा आनंदाचा प्रसंग! पण त्यानंतर २-३ दिवसांनी बर्डी सुतिकागृहातून घरी येत असताना माझ्या पत्नीने दक्षिणामूर्ती मंदिराजवळ रिक्षा थांबवली व आईची भेट घेऊन येते म्हणून खाली उतरायला गेली व मटकन खाली बसली. तिला उठताच येईना. बबन मंगदे याने रिक्षा करून तिला आमच्या घरी पोहोचविले. तीन दिवस तिला उठताच येईना. घुसत पुढे सरकायची. चौथ्या दिवशी उठून उभी राहिली व घरात घासत घासत एक एक पाऊल पुढे टाकत चालू लागली. हा तिचा आजार Osteo Arthritis ठरला. अॅलोपॅथीत याच्यावर इलाज नाही. फक्त वेदनाशामक गोळ्या घेणे. तितक्यापुरते बरे वाटते. पुन्हा जैसे थे. अॅलोपॅथीक, आयुर्वेदिक, युनानी, होमियोपॅथिक सारे सारे उपचार झाले. मुंबईलाही वाऱ्या केल्या. एकदा जाऊन तेथील आर्थरायटिस स्पेशालिस्ट डॉ. बेंदरे यांचे महिनाभर औषध घेतले. काही गुण नाही. पुन्हा मुंबईच्या Tabe Clinic च्या जाहिराती वाचल्या, Arthritis मधून सुधारलेल्या रुग्णांच्या फोटोसहित. पुन्हा मुंबईला जाऊन दीड महिना तेथे राहून उपचार केले. मागच्या वर्षी मुंबईला गेलो तेव्हा डॉ. सामंत कडून गुडघ््याला Injection घेतले. पायावरील सूज उतरली, पण पुन्हा गाडी मूळपदावरच. Physio Therapist घरी येत असे. त्याच्या सल्यानुसार Physical Exercises केले, पण दुखणे हटले नाही. आता नुकतेच नागपुरच्या एका अस्थीरोग तज्ज्ञाकडून डाव्या गुडघ््याला चार आणि उजव्या गुडघ््याला चार Injections घेऊन झाली आहेत. गुण येण्याची वाट पाहणे सुरू आहे. मी Lumber Spondylisis आणि ही Osteo Arthritis ची कायम रुग्ण होऊन बसलो आहोत.
मागील वर्षी चि. अरुणची दुसरी कन्या चि. मंजिरीच्या बारश्याला मुंबईला गेलो. केवढा आनंदाचा प्रसंग! तेथे सव्वा महिना राहून नागपुरला परत आलो, तो दोन दिवसांनी माझी दुसरी मुलगी चि. विजया हिचे यजमान श्री. बळवंतराव पारखी दि. २७ फेब्रुवारीला वारले. काय म्हणावे या नशिबाला! माणूस अगदी सुन्न होऊन जातो. जीवनात अशा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो. म्हणून ठरवले की दुःख आले की सोसायचे आणि आनंदाचे प्रसंग आले की ते पकडून ठेवून साजरे करायचे.
आमचे मामा कै. कृष्णराव कमाविसदार यांचा जन्म १८९८ सालचा. १९७३ साली त्यांना ७५ वर्षे पूर्ण झाली. आम्ही त्यांना सहकुटुंब सहपरिवार आपल्या घरी जेवायला बोलावून मामींना पातळ व ब्लाउजचे कापड आणि मामांना खादीचे धोतर, शर्ट व गांधी टोपी देऊन त्यांचा अमृत महोत्सव साजरा केला. मामांचे अल्पचरित्रही मी त्या निमित्ताने लिहिले होते. ते त्यांना सादर भेट दिले. मामा त्या प्रसंगी चार शब्द बोलले. मला धन्यता वाटली. मामा पुढे ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी, दि. २२-६-७५ ला वारले.
१९७७ साली माझी बहीण चि. दुर्गा हिच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली. तेव्हा तिलाही आम्ही आमच्या घरी जेवायला बोलावून तिला पातळ व ब्लाउजचे कापड आणि श्री. भाऊसाहेबांना धोतर देऊन, अक्षवान करून तिची षष्ट्यब्दी साजरी केली.
१४ जुलै १९८५ ला आपल्या आईची एकसष्टी साजरी करायचे मुलांनी ठरविले. मलाही ऑगस्ट मध्ये ७० वर्षे पूर्ण होणार होती. माझे वडील ती. नानाजींच्या मृत्यूला १३ मार्च १९८५ ला ५० वर्षे पूर्ण झाली होती. म्हणून हिची एकसष्टी, माझी ७०वी वर्षगाठ आणि स्व. नानाजींचा ५०वा स्मृतिदिन एकत्रच साजरा केला. सर्व निमंत्रित मंडळी आली होती. ती. नानाजींच्या फोटोला हार घालण्यात आला. माझे छोटेसे प्रास्ताविक झाले. ती. नानाजींची थोरवी वर्णन करणारे एक काव्य मी रचले होते. त्याचे मी वाचन केले. डॉ. मंदाताई पत्तरकिने यांचे सुश्राव्य गायन झाले. प्रा. भजनी व श्री इंदुरकर यांनी तबल्याची व पेटीची साथ केली. फराळपाणी झाले आणि हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम संपला. स्वरचित काव्य येथे देतो.
ती. श्री. नानाजींची अर्धशतसांवत्सरी
मातृपितृदेवोभव सांगतात संत हे
प्रिय अमुचे एकअसति पितृदेव धन्य हे ।।धृ।।
बालपणी हरपली मम मातृदेवता
संगोपन शिक्षणादि त्वत्कार्य तत्त्वता
सांगु किती उपकार महा गणवती न हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।१।।
साहिले कष्ट तुम्ही असंख्य जीवनी
आस एक धरिली मनी पुत्र सद्गुणी
सुविद्य आणि शीलवान बघत स्वप्न हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।२।।
जीवन शुद्ध सत्त्वयुक्त आणि निर्मम
आदर्श तुम्ही निर्मिलाच की महत्तम
कर्म उपासना नि भक्ति ज्ञान थोर हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।३।।
ब्राह्ममुहूर्ती उठून स्नानसंध्या विधी
देवपुजा तर्पणादि पोथि जाप्य जपविधी
सूर्यनमस्कार नैवेद्य वैश्वदेव हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।४।।
सद्गुणांचा जो असे ममठायी संगम
ती सारी तुमचीच कृपा दोष सर्व ते मम
कोणि काहि म्हणो परंतु जाणतो मीच हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।५।।
दिपस्तंभा परिस तुम्ही मार्ग दाविला अम्हा
संकटाच्या समयि जाण रक्षिले तुम्ही अम्हा
धैर्य शक्ति प्रेरणा उत्तेजनच मूर्त हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।६।।
वर्षे पन्नास पुरी उलटली मृत्यूला
स्मृती ताजी मनी वसे मूर्ती मनी मंगला
कृतज्ञतेचे भाव मनी दाटतात आज हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।७।।
तुम्ही कृतार्थ कृतज्ञ मी आर्त मने पाहतो
सत्तर संवत्सरे काळ स्मृतीपुढे ठाकतो
प्रसंग काही करिती उभे नयनात अश्रु हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।८।।
मातृपितृदेवोभव सांगतात संत हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।धृ।।
माझे मावसभाऊ श्री. तात्याजी पुराणिक यांचा जन्म १९०७ सालच्या दिवाळीतला. १९८७ साली त्यांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण झाली. त्या वर्षी काही अडचणीमुळे आमच्या घरच्या महालक्ष्म्यांचा सण भाद्रपदात झाला नाही. आम्ही तो दिवाळीनंतर साजरा केला. श्री. तात्याजी, सौ. राधावहिनी आणि तात्याजींची बहीण श्रीमती द्वारका गुपचुप यांना आम्ही आमच्या घरी बोलावले. त्यांना औक्षवान करून त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला.
माझे मावसभाऊ श्री. रघुनाथराव पत्तरकिने यांचा अमृत महोत्सव सोहळा सीताबर्डी टेकडीवरील फौजी गणपती जवळील पटांगणात त्यांच्या अनुग्रहित मंडळींनी व चाहत्यांनी साजरा केला. त्या सोहळ्यानिमित्त मी रचलेल्या काव्याचे त्या प्रसंगी वाचन केले व त्यांना सादर समर्पण केले. ज्येष्ठ शुद्ध षष्ठी शके १९१०, सोमवार दि. २०-६-८८ ला तिथीनुसार तीर्थरूप आईचा ६० वा स्मृतिदिन आम्ही मनोमन साजरा केला. त्या निमित्त तिच्या गुणवर्णनात्मक काही गौरवगीते मी रचली होती. त्यापैकी दोन मी येथे प्रस्तुत करतो.
मातृपूजन - १
आई माते राधामाई अारति ओवाळितो । स्मृतीला पुष्पांजलि अर्पितो ।।धृ।।
आठव होता तुझा अंतरी
चित्ती हुरहुर उरी शिरशिरी
गौरकाय तव मूर्ति गोजिरी
भक्ती प्रेमा मनी दाटतो ।।१।।
स्मृतिच्या नीरांजनि रुप्याच्या
वाति घातल्या सुविवेकाच्या
तूप घातले कृतज्ञतेचे
ज्योत प्राणांची पाजळतो ।।२।।
प्रसन्नतेची ही फुलवात
कारुण्याचा कर्पूर शीत
ओवाळित तुजवरुनी ज्योत
भक्तिभाव मम मनी दाटतो ।।।३।।
मुग्ध मोगरा मम प्रेमाचा
पारिजातक प्रसन्नतेचा
जाई जुई निशिगंधाचा
चरणी पुष्पगुच्छ अर्पितो ।।४।।
बकुळीची ही माळा बरवी
चातुर्याची चंपककळी
शेवंतीची वेणि आगळी
गुलाब गजरा शिरी माळितो ।।५।।
श्वेत नील रक्तवर्णी
कमळांच्या मृदु आभूषणी
गुलाब पुष्पाच्या मालांनी
तव स्मृतीची पुजा बांधितो ।।६।।
मातूपूजन - २
आई माते राधामाई आरति ओवाळितो ।
स्मृतीला पुष्पांजलि अर्पितो ।।धृ।।
हळदी कुंकुम सौभाग्याचे
भाळि विराजे प्रसन्नतेचे
कंठी मंगलसूत्र मण्यांचे
जयजयकार तुझा करितो ।।१।।
भावमूर्ति तव मनी भाविली
मानसपूजा अशी बांधली
आरति कर्पूर पुष्पांजली
काया वाचा मने अर्पितो ।।२।।
नमोऽस्तुते श्री महन्मंगले
मातृदेवते शुभाशीष दे
तव चरणी मम भक्ति जडू दे
मागणे अन्य न काहि मागतो ।।३।।
गुणगौरव सुगंध घुमला
अवघा आसमंत दरवळला
चंदन-धूप-सौरभ भिनला
उदबत्त्यांचा धूप अर्पितो ।।४।।
नैवेद्य भावादर भक्तीचा
मधुरातिशय पक्वान्नांचा
फलाशाविरहित मधुर फळांचा
स्वर्णताटि तव पुढे ठेवितो ।।५।।
तेल जळे परि ज्योत पाजळे
झिजे चंदन परि सुगंध दरवळे
नंदादीप मंद परि राउळ उजळे
सदाशिवा तव सान्निध्याचा प्रकाश नित लाभतो ।।६।।
११ एप्रिल १९८९ ला माझ्या पत्नीची बहीण श्रीमती वीणाताई हरदास हिची एकसष्टी आम्ही आमच्या घरी साजरी केली. प्रमोद, विश्राम सहकुटुंब आले होते. शांताच्या आईही आल्या होत्या. शांताच्या निकट मैत्रिणी व परिचित मंडळी जेवायला होती.
माझा ७५वा वाढदिवस श्रावण शुक्ल एकादशी, शके १९१२, दि. २-८-९० ला संपन्न झाला. संस्कृतचे विद्वान डॉ. के. रा. जोशी हे अध्यक्ष होते. चि. प्रमोद, चि. गीता व चि. विश्राम हे सहकुटुंब आले होते. चि. विश्राम नंदुरबार वरून येतांना शेगावला जाऊन, श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन माझ्या नावाने अभिषेकाची दक्षिणा देऊन आला होता. हिची आई व बहीण दोघीही आल्या होत्या. सर्व नातलग व परिचित मंडळी उपस्थित होती. 'या कुन्देन्दु' या सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. अध्यक्षांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माझ्या स्वरचित 'अमृत कलश' नामक भक्तीगीत संग्रहाच्या हस्तलिखिताचे अध्यक्षांच्या हस्ते विमोचन झाले. चि. विजयाने पुढाकार घेऊन मला एक मानपत्र अर्पण कण्याचा सोहळाही पार पाडला. अमृतकलशातील 'श्रीगणेश महिमा'नेच प्रस्तुत आत्मचरित्राची सुरुवात झाली आहे. चि. प्रमोद व चि. सौ. गीता यांची समयोचित भाषणे झाली. अध्यक्ष डॉ. के. रा. जोशी यांचे अत्यंत मार्मिक व सुश्राव्य भाषण झाले. त्यांनी अमृतकलशातील काही कवितांचे रसग्रहणही केले. श्रीमती वाीणाताई हरदास यांच्या पसायदानाने अमृत महोत्सवाची सांगता झाली. प्रास्ताविक मी केले व आभार प्रदर्शन चि. प्रमोदने केले. फराळपाणी होऊन हा गोड कार्यक्रम संपला. दुसरे दिवशी डॉ. के. रा. जोशी आणि श्री. रघुनाथराव पत्तरकिने आमच्या घरी जेवायला होते. कार्यक्रमाच्या दिवशी श्री. बोक्षे यांच्या भजनाचा सुरेख कार्यक्रम झाला.
C. P. & Berar Education Society चे संस्थापक आणि शाळेचे सुपरिंटेंडेंट श्री. अण्णासाहेब गोखले १९८१ साली खूप आजारी झाले. आम्ही उभयता त्यांच्या भेटीला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले 'प्रमोद मॅट्रिकला First Class First आला, आणि तुमची सर्व मुलेही मॅट्रिकला मेरिट मध्ये आली. तुम्ही व तुमच्या मुलांनी शाळेचा लौकिक वाढविला, व शाळेची भरभराट झाली'.
१९५५ साली C. P. & Berar Education Society चा रजत महोत्सव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपन्न होणार होता. त्याकरिता खास रजत महोत्सव पुस्तिका प्रकाशित करावयाची होती. गोपाल प्रिंटींग प्रेसमध्ये त्याचे मुद्रणकार्य चालू होते. पुस्तिका वेळेवर प्रकाशित व्हावी व मुद्रणकार्याला गती यावी म्हणून मुद्रणालयात सकाळपासून सायंकाळपर्यंत बसून तेथल्या तेथे proof reading करण्याची, मजकुराला शीर्षक देण्याची आणि उपयुक्त सूचना करण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. २ डिसेंबर १९५५ चा दिवस होता. माझ्या पत्नीचे गरोदरपणाचे दिवस भरत आले होते. डॉक्टरने तीच तारीख दिली होती. माझे घरी राहणे आवश्यक होते. पण मी माझे कर्तव्य पार पाडण्याकरिता मुद्रणालयात होतो. रात्री ७-५० ला साहित्याचार्य बाळशास्त्री हरदासांचा पुतण्या नाना हरदास मुद्रणालयात सांगायला आला की तुम्हाला मुलगी झाली. मग मी पुढच्या सूचना देऊन घरी आलो. हीच आमची धाकटी मुलगी वृंदा. ह्या रजत महोत्सवात प्रत्येक शिक्षकाला एक चांदीचा पेला भेट देण्यात आला. त्याप्रमाणे मलाही.
१९८१ साली C. P. & Berar Education Society चा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला. त्यात माजी शिक्षकांचाही शाल देऊन सत्कार करण्यात आला. मलाही एक शाल मिळाली.
हे प्रसंग मी वर्णन केले त्यात आत्मश्लाघेचा मुळीच हेतू नाही. त्यावर मी भाष्यही करीत नाही. आता आत्मचरित्र लिहायला घेतलेच आहे, तर जीवनातील काही प्रमुख घटनांचा सत्याशी ईमान राखून उल्लेख करणे क्रमप्राप्तच आहे. त्यावरून माझा पिंड कसल्या प्रकारचा आहे ते ध्यानात येईल. अधिक सांगणे न लगे.
आता एक जरा वेगळ्या प्रकारचा प्रसंग सांगून हा दहावा मणी मज्जीवनमणिमालेत ओवतो.
माझ्याकडे नागपुर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मॅट्रिकच्या उत्तर पत्रिका तपासायला येऊ लागल्या. एके वर्षी एक जण माझ्याकडे आला. त्याला मी ओळखतही नव्हतो. त्याने मला वाकून नमस्कार केला व माझ्या हाती पेढ्यांचा कागदी डबा ठेवला. मी विचारले, 'हा काय प्रकार आहे? तुला मुलगा झाला काय?'. तो म्हणाला 'नाही सर. मी लुधियानाला लोकरीच्या कारखान्यात नोकरीला आहे. मी मूळचा नागपुरचा. मी यंदा नागपूर बोर्डाच्या १० वी मॅट्रिकच्या परीक्षेला बसलो आहे. माझा मराठीचा पेपर बिघडला सर. पेपर्स तपासायला कोणाकडे गेले याचा पुष्कळ शोध काढला. शेवटी पत्ता लागला की तुमच्याकडे ते आले आहेत. मी जर पास झालो तर मला प्रमोशन मिळेल. माझ्यावर मेहरबानी करा. तुमच्या घरी किती मंडळी आहेत? मी सर्वांसाठी स्वेटर्स पाठवून देईन. माझा रोल नंबर हा आहे सर.'. असे म्हणून तो माझ्या हाती चिठ्ठी देऊ लागला. मी ती चिठ्ठी घेतली नाही आणि पेढ्यांचा डबा परत घेऊन जा असे म्हणालो. 'तुझा मार्ग चुकला आहे. तुझे काम माझ्याच्याने होणार नाही. तू जसा पेपर सोडवला असशील तसाच तुझा निकाल लागेल.' असेही त्याला सांगितले. त्याने मला पुन्हा वाकून नमस्कार केला. मी त्याला पेढ्यांचा डबा परत देऊ लागलो. पण त्याने घेतला नाही. 'मी तो तुमच्यासाठीच आणला आहे सर. तो परत नेणे योग्य नाही सर. तुम्ही मला पास करा किंवा नका करू सर. माझे आता काही म्हणणे नाही. तुम्ही एवढ्या मोठया योग्यतेचे असाल अशी मला कल्पना नव्हती सर.' असे म्हणून पुन्हा एकवार वाकून नमस्कार करून तो निघून गेला.
_____________________
मणी - ११
नेत्र लागले पैलतीरी
आता माझ्या जीवनग्रंथाची ७७ पाने पूर्ण लिहून झाली आहेत. ७८ व्या पानाचे लेखन चालू आहे. येत्या ऑगस्टच्या २१ तारखेला ७९ व्या पानाचे लेखन सुरू होईल.
आता आमच्या जीवनाची सायंकाळ सुरू झाली आहे. मी थकलो आहे. माझी प्रिय पत्नीही थकली आहे. प्रकृतीच्या विविध तक्रारी सुरू होत आहेत. मला स्पाँडिलायटिस आणि हिला अॅर्थ्रिटिस चा त्रास आहे. गतकाळाची ओझरती ओळख आपणाला करून दिली आहे. भावी काळ आमच्या हाती किती आहे ते आम्हाला माहित नाही. पुढच्या क्षणाला काय होईल याचा भरवसा नाही. ह्या आत्मचरित्रात सगळ्याच घटना सांगितल्या आहेत असाही भाग नाही, आणि ते शक्यही नाही. तशी अपेक्षाही असू नये. ७८ वर्षे म्हणजे ७८ गुणिले ३६५ दिवस. प्रत्येक दिवसाचे घटित काही ना काही तरी असणारच. तेव्हा ते सारे कसे सांगणार? ज्या एका विशिष्ट पद्धतीने व धारणेने मी आयुष्य जगलो, जी मूल्ये उराशी बाळगली, आणि प्रसंगी त्याग करूनही जपली, त्यांना या आत्मचरित्रात सहजगत्याच उठाव मिळालेला असणार. ज्यांनी माझ्यावर संस्कार करून माझ्या जीवनाला आकार व डौल दिला, ज्यांनी मला प्रेम दिले, आदर दिला, ज्यांनी मला जीव लावला, जिव्हाळा दिला, ज्यांनी मला संकटसमयी धीर दिला, सांत्वना दिली, मार्गदर्शन केले, तोल जातांना ज्यांनी मला सावरले, त्यांचा उल्लेख येथे प्रामुख्याने आलेला आहे. त्यांच्या विषयी प्रेम, जिव्हाळा, आदर, कृतज्ञता, श्रद्धा, भक्ती इत्यादि भावही स्वाभाविकतःच प्रकट झाले आहेत.
काही लोकांनी माझे पाय ओढण्याचा प्रयत्न केला, मला निरुत्साह करण्यात धन्यता मानली. तुम्ही आजच्या जमान्याला लायक नाही, माणसाने काळाप्रमाणे वागले पाहिजे अशा प्रकारे मला हिणविण्यातच ज्यांना मोठेपणा वाटला, माझा साधेपणा व प्रामाणिकता यांचा फायदा घेऊन ज्यांनी मला बुद्धिपुरस्सर फसविले व अशा लबाडांचा कैवार घेऊन जे मला कुत्सितपणे हासले, त्या सर्वांचा अनुल्लेखाने परामर्श घेण्याचे मी ठरविले आहे. त्या अवांछित घटनांना व व्यक्तींना या आत्मचरित्रात स्थान देऊन कशाला मी आपल्या मनाला पुनरपी यातना करून घेऊ?
माझे परमपूज्य आई-वडील यांच्याबद्दल माझ्या मनात परम प्रेम, नितांत आदर, अपार कृतज्ञता, निस्सीम श्रद्धा व अकृत्रिम भक्ती वास करीत आहे. त्यांनीच मला पोसले, वाढविले, घडविले. त्यांचा सहवास मला अल्पकाळ लाभला याचे मला जरूर दुःख आहे, पण ज्याप्रमाणे तेजस्वी सौदामिनी क्षणभरी चमकते पण आपल्या तेजाने सारा दिक्प्रांत उजळून टाकते, त्याप्रमाणे माझ्या मातापित्यांनी आपल्या शील चारित्र्याने व सुसंस्कारांनी माझे सारे जीवनच उजळून टाकले यात मला साभिमान आनंद आहे. म्हणून प्रस्तुत आत्मचरित्रात त्यांचा उल्लेख जागोजाग येणे साहजिक आहे. त्यांच्या गुणगौरवपर जी गीते मी रचली त्यात माझ्या अंतःकरणाचा ओलावा मी ओतला आहे. त्यांना माझ्या या आत्मचरित्रात अग्रस्थान आहे, अग्रपूजेचा मान आहे. ती गीते मी येथे उद्धृत केली नसती तर ते माझे आत्मचरित्रच होऊ शकले नसते. माझे तनमनधन माझ्या मातापित्यांनी व्यापले आहे. आणखी कोणत्या शब्दात त्यांच्या विषयीच्या भक्तीभावना व्यक्त करू?
माझी एकुलती एक बहीण दुर्गा हिने माझ्यावर खूप प्रेम केले, लोभ केला, जिव्हाळा दिला. आमच्या घरचा असा एकही प्रसंग झाला नाही की ज्याला आम्ही तिला बोलाविले नाही. काही कारणवश जर ती एखाद्या प्रसंगी येऊ शकली नाही, तर आम्हाला रुखरुख लागायची. तिची तिन्ही मुले, चि. मदन, चि. मोहन, चि. श्याम ही सुशिक्षित, सद्वर्तनी व कर्तबगार निघाली. पहिला मुलगा चि. मदन भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये सिनिअर इंजिनिअर होता. तो मागच्याच वर्षी सेवानिवृत्त झाला. त्याने भोपाळलाच स्वतःचे घर बांधले आहे व तेथेच स्थायिक झाला आहे. दुसरा मुलगा चि. मोहन हा रसायन शास्त्रात M. Sc. असून मध्यप्रदेशातील सनावद येथे जवाहरलाल नेहरू पॉलिटेक्नीक मध्ये प्राध्यापक आहे. तिसरा मुलगा श्याम हा आर्किटेक्ट असून कामठीला स्वतंत्र उद्योग करतो. सौ. दुर्गाला तरुण वयातच दुखण्याने ग्रासले. वयाच्या ६९व्या वर्षी दि. २-१०-१९८६ ला चि. मोहनजवळ सनावद मुक्कामी तिचा दुःखद अंत झाला. तिच्या मृत्यूच्या वेळी आम्ही तेथे राहू शकलो नाही याचे आम्हाला अतिशय दु ख आहे.
माझ्या बहिणीचे यजमान श्री. लक्ष्मणराव माधवराव देशपांडे हे अतिशय प्रेमळ गृहस्थ. ते काही वर्षे नागपुरला व नंतर काही वर्षे कामठीला ट्रेझरीत अकौंटंट होते. ते मागच्याच वर्षी ७-१०-१९९२ ला वयाच्या ८२ व्या वर्षी कामठीला वारले. आम्हाला फार दुःख झाले. त्यांना आमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेबाबत फार कौतुक वाटायचे. ते घरच्या घरीच पडून त्यांना फ्रॅक्चर झाले. ते कामठीच्या दवाखान्यात भरती असतांना आम्ही चारपाचदा त्यांच्या भेटीला गेलो. प्रमोदचा ग्रंथ इंग्लंड अमेरिकेत प्रसिद्ध झाला असे जेव्हा त्यांना सांगितले, तेव्हा तशाही आसन्नमरण स्थितीत 'त्रिलोकि झेंडा फडकविला.' असे प्रशंसोद्रार त्यांच्या मुखातून बाहेर पडले.
भाऊसाहेबांच्या मृत्यूच्या पंधराव्या दिवशी आम्ही त्यांच्या सर्व मुलांना, सुनांना व नातवंडाना आमच्या घरी जेवायला बोलावले. त्या प्रसंगी स्व. भाऊसाहेबांवर एक शोकगीत रचून व ते स्वतः अवरुद्ध कंठाने वाचून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. माझी एकुलती एक बहीण माझ्यापेक्षा वयाने लहान असताना माझ्या अगोदर काळाने ओढून नेली याचे तर मला दुःख होतेच, पण तिच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी भाऊसाहेबही गेले आणि एक महत्त्वाचा दुवा निखळला.
आमच्या सर्व मुलींची लग्ने झाली. त्या आपापल्या घरी आहेत. मोठी मुलगी सौ. गीता अकोल्याला आहे. बाकीच्या दोघी नागपुरला आहेत. त्या आमच्या घरी येऊन जाऊन असतात. तीन मुले नोकरीनिमित्त परगावी आहेत. आता घरी आम्ही दोघेच आहोत. अडीअडचणीला मुले परगावी असली तरी धावून येतात.
दुसरा मुलगा चि. विश्राम हा आतापर्यंत नोकरीनिमित्त परगावीच होता. मागच्याच वर्षी तो बदलून नागपुरला आला. बँक आॅफ बडोदा च्या इतवारी शाखेत तो प्रबंधक आहे. तो आपल्या कर्तबगारीने व कर्तव्यपरायणतेने एकापाठी एक बढतीच्या पायऱ्या चढत आज नागपुर सारख्या मोठ्या शहरात इतवारी सारख्या मोठ्या शाखेत प्रबंधकाच्या पदावर आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तो अलग राहतो, पण आम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तू बाजारातून आम्हाला घरपोच आणून देतो.
आमच्या सर्व मुलामुलींच्या मनात आमच्या विषयी प्रेमादराची भावना वसत आहे. आमची सर्व मुले-मुली अत्यंत हुशार व बुद्धिमान आहेत व आपापल्या क्षेत्रात कर्तबगार आहेत.
आम्हीही मुलांच्या प्रगतीच्या आड कधीही आलो नाही. आपल्या स्वार्थासाठी त्यांना नागपुरला अडवून ठेवले नाही. त्यांना प्रगतीचा मार्ग त्यांच्या मनाप्रमाणे चोखाळू दिला. म्हणूनच ती आज एकापेक्षा एक उंच प्रगतीची शिखरे गाठत आहेत. मी शिकवण्या केल्या नाहीत किंवा शिकवणीचे वर्ग काढले नाहीत. स्वत च्या मुलांच्याच शिक्षणाकडे व अभ्यासातील प्रगतीकडे जातीने लक्ष पुरविले. त्याची मधुर फळे आम्ही चाखत आहोत. आम्हालाही काही चिंता, काळज्या, विवंचना, टोचण्या आहेत. पण मुलांच्या प्रगतीच्या आलेखाकडे पाहून त्या विसरण्यास किंवा त्यांची तीव्रतेची धार कमी होण्यास बरीच मदत होते. 'आत्मा वै पुत्र नामासि'. आपण स्वतःच पुत्ररूपाने प्रकट होत असतो. तेव्हा माझ्या या आत्मचरित्राचा बराचसा भाग मुलांच्या प्रगतीच्या व कर्तृत्वाच्या आलेखाने व्यापला असल्यास नवल ते काय?
माझी प्रेमळ पत्नी माझ्या जीवनाचेच अविभाज्य अंग आहे. माझ्या सर्व कार्यात तिची पूर्ण साथ तर मला मिळतेच, पण मार्गदर्शनही लाभते. मी माझे हे आत्मचरित्र लिहिले हे जरी खरे असले तरी ते एक अर्थाने माझ्या पत्नीचेही चरित्र आहे. या चरित्रातला कोणता भाग माझा व कोणता भाग तिचा हे वेगळे करून सांगणे कठिण आहे. इतकी आमची जीवने परस्परात मिसळली आहेत. नदी सागराला मिळाल्यानंतर तिचे अस्तित्व वेगळे शिल्लक उरते काय? तसेच आमचे झाले आहे म्हणा ना! मुलांच्या प्रगतीच्या व उत्कर्षाच्या चढत्या आलेखात आईचाही सिंहाचा वाटा आहे. याची जाण ठेवूनच चि. प्रमोदने आपला इंग्लंड, अमेरिकेत व त्या माध्यमातून संपूर्ण जगात प्रसिद्ध झालेला Pattern Recognition Transforms हा वैज्ञानिक ग्रंथ 'To my parents, who offered me both existence and uniqueness' अशा काव्यपंक्तींनी आम्हा उभयतांना अर्पण केला आहे.
चि. अरुणने मला आत्मचरित्र लिहिण्याचा जो प्रेमळ आग्रह केला तोही याच जाणिवेच्या पोटी हे मी पुरेपूर जाणून आहे.
चि. विश्रामही आम्हाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू आम्हाला घरपोच आणून देतो, तेही या प्रेमादरापोटीच. चि. सुधीर आमचा सर्वात लहान मुलगा. त्याला Ph. D. मिळाल्याचे घोषित झाले, तेव्हा तो स्वतः नागपुरला येऊन आम्हा दोघांनाही पदवीदान समारंभाला मुंबईला घेऊन गेला. Ph. D. ची पदवी घेतांना आम्ही त्याला डोळे भरून पाहिले. आम्हाला धन्यता वाटली.
माझा विवाह झाला तेव्हा माझे आई-वडील ह्यात नव्हते. पण मला सासू-सासरे अत्यंत प्रमळ लाभले. त्यांना मुलगा नव्हता. दोनच मुली. वडील मुलगी माझी पत्नी. दुसरी मुलगी शांता ही साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची पत्नी. शांताचा विवाह माझ्या लग्नानंतर ९ वर्षांनी १९५० साली झाला. माझ्या अपत्यांपैकी चौघांचा जन्म नागपुरचा तर तिघांचा वणीचा. चार मुलांचा जन्म नागपुरला झाला असला तरी प्रत्येक बाळंतपणाच्या वेळी माझ्या सासूबाई श्रीमती सत्यभामाबाई सास्तीकर नागपुरला आल्या आणि अपत्यांच्या जन्मानंतर दीड महिना तरी नागपुरला राहिल्या. अशा रीतीने त्यांची आम्हाला बरीच मदत झाली. आमच्या घरी महालक्ष्म्यांसारखा मोठा सण असो की कोणता कार्यप्रसंग असो, त्यांची आम्हाला मोठी मोलाची मदत होत असे. आमच्या सर्वच मुलामुलींचे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि हुशारीचे आमच्या सासूबाईंना व आमचे श्वशुर श्री. अण्णाजी सास्तीकर यांना भारीच कौतुक असे. त्यांचे आपल्या नातवंडांवर मोठे प्रेम. साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांना १९६८ साली वयाच्या ५० व्या वर्षी अकाली मृत्यू आला. त्यानंतर माझे सासूसासरे शांताला आसरा असावा म्हणून नागपुरला शांताजवळच येऊन राहिले. ती. स्व. अण्णाजींचा मृत्यू त्यांच्या वयाच्या ९४ व्या वर्षी १९८४ साली झाला. ती. नानीबाईंना ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची प्रकृती आता यथातथाच असते. चि. प्रमोदला शांतिस्वरूप भटनागर अवॉर्ड मिळाल्याबद्दल १९८८ च्या डिसेंबरात शाळेत व आमच्या घरी झालेल्या सत्कार समारंभाला आणि माझ्या अमृत महोत्सवाला त्या अगत्याने उपस्थित होत्या. तसेच चि. सुधीरच्या विवाह समारंभाला उपस्थित होत्या.
माझ्या पत्नीची लाडकी बहीण शांता हिने बाळशास्त्रींच्या मृत्यूनंतर त्यांचा ग्रंथलेखनाचा वसा अव्याहतपणे पुढे चालविला. तिने परिश्रमपूर्वक अनेक ग्रंथांचे लेखन केले व ते पुण्याचे मामाराव दाते यांनी प्रकाशित केले. साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांचे चरित्र, डॉ. मुंजे यांचे चरित्र, कथाभागवत, गर्गसंहिता, लोकनायक बापूजी अणे यांचे चरित्र, हे त्यापैकी काही ग्रंथ होत. तिचे आपल्या बहिणीवर आणि भाच्यांवर अकृत्रिम प्रेम आहे.
आम्ही दोघेही आता थकत चाललो आहोत. 'नेत्र लागले पैलतीरी' अशी सध्या आमची स्थिती आहे. द्रव्यार्जनाच्या बाबतीत साधनशुचितेला आम्ही महत्त्व दिल्याने आमची प्राप्ती बेताचीच असे. तेव्हा आम्हाला काटकसरीने वागावे लागे. माझ्या पत्नीची मला या बाबतीतही पूर्ण साथ असल्यानेच मी समाधानाने पण मानाने जगू शकलो.
_____________________
मणी - १२
विसावे शतक
माझा जन्म १९१५ सालचा. मला माझ्या जीवनातील पहिली घटना जर कोणती आठवत असेल तर ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मृत्यूनंतर, दुसऱ्या दिवशी निघालेली प्रचंड मूक शोकयात्रा. १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य वारले. लोकमान्य टिळक हे तत्कालीन भारताचे स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी होते. 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' असे त्यांना म्हटले जाई. पण यातच त्यांची थोरवी दडलेली आहे. आधीच्या पुढाऱ्यांप्रमाणे ते केवळ सुशिक्षितांचे व उच्चभ्रु लोकांचे अग्रणी न राहता सर्वसामान्य जनतेचे पुढारी बनले हाते. त्यांचे हितशत्रू त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणत. पण यातच त्यांचा खरा बहुमान आहे. इंग्रजी राज्याविरुद्ध त्यांनी भारतीयांच्या मनात असंतोषाचा वन्ही चेतविला, पेटविला. अशा या थोर पुढाऱ्याचा अंत झाला. सारा देश शोकसागरात बुडाला. नागपुरातही प्रचंड शोकयात्रा निघाली. साऱ्या स्तरातील लोक त्यात सहभागी झाले होते.
मी त्यावेळी पाच वर्षांचा होतो. केळीबाग मार्गावरून ती मिरवणूक गेली. आमच्या वाड्याच्या मागच्या दाराने बाहेर पडले की केळीबाग मार्ग जवळच होता. माझ्या वडिलांनी मला कडेवर घेऊन ती मिरवणूक मला दाखविली. साऱ्या शहरावर शोककळा पसरली होती. एका थोर देशभक्ताच्या मृत्यूने सारे राष्ट्र कसे शोकाकुल होते, हा पहिला खोल संस्कार त्या मिरवणुकीने माझ्या शिशुमनावर उमटविला.
लोकमान्यांच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे महात्मा गांधींकडे गेली. १९२१ ची काँग्रेस नागपुरलाच भरली. त्या अधिवेशनातही माझे वडील मला घेऊन गेले होते. त्या अधिवेशनातील पांढऱ्या शुभ्र गांधी टोप्या घातलेले कँाग्रेस कार्यकर्त्े व स्वयंसेवक - ते दृश्य मला अजूनही आठवते. मी प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात असताना आम्हाला भाषेच्या क्रमिक पुस्तकात 'जॉर्ज नृपा गावे सद्भावे' ही इंग्लंडचे व हिंदुस्थानचे बादशहा पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीपर कविता होती. १९११ साली पंचम जॉर्जने भारतास भेट दिली. दिल्लीला मोठा दरबार भरला. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून १२ डिसेंबरला दरबार डे ची सुटी राहात असे. पण प्राथमिक शाळेतून प्रार्थनेच्या वेळी नागपुरचे प्रसिद्ध कवी श्री. आनंदराव टेकाडे यांचे 'हा हिंददेश माझा' हे देशभक्तीपर गीत म्हटले जात असे.
१९२१ ची असहकािरतेची चळवळ बरीच फोफावली. विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या. वकिलांनी वकिली सोडली. विधानसभेच्या आमदारांनी राजीनामे दिले. नागपुरला टिळक विद्यालयाची स्थापना झाली. श्री. आप्पाजी तिजारे, आचार्य दादा धर्माधिकारी, इत्यादि मंडळींनी टिळक विद्यालय बरेच नावारूपास आणले. आमचे मामा श्री. कृष्णराव कमाविसदार, मावसभाऊ श्री. हरिभाऊ पत्तरकिने आदि मंडळींनी भंडाऱ्यास राष्ट्रीय शाळा काढली. १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत आमचे मामा १२ व्या युद्धमंडळाचे सेक्रेटरी होते. ते त्यावेळी सध्या राजविलास टाॅकीज आहे, त्याच्या जवळच्या श्री. खोलकुटे वकिलांच्या घरी किरायाने राहत असत. त्यांचे चिटणीस पार्कात भाषण झाले. दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या घरून पकडून नेण्यात आले. बराच लोकसमुदाय जमला होता. मीही त्यावेळी तेथे होतो. मामांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. १९३० च्या चळवळीत माझे मावसभाऊ श्री. हरिभाऊ पत्तरकिने यांनी आपल्या घरी खादीचा कारखाना काढला. मीही तेथून एक खादीची धोतरजोडी विकत घेतली. मी स्वतः खादीच वापरीत असे. माझे दुसरे मावसभाऊ श्री तात्याजी पुराणिक आणि थोरले मामा श्री. यादवराव कमाविसदार यांनाही जंगलचा कायदा तोडल्यामुळे पकडण्यात आले.
सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचे काँग्रेसने ठरविले. नागपुरलाही सायमन कमिशन येणार होते. आदल्या रात्रभर लोकांची तयारी चालू होती. काळे झेंडे घेऊन सायमन भाग जाव, Simon, go back ह्या घोषणांनी त्यांचे नागपुर स्थानकावर स्वागत होणार होते. काळ्या पताका घेऊन 'सायमन भाग जाव' च्या घोषणा देत मोठी मिरवणूक निघाली. ती लोखंडी पुलाजवळ अडविण्यात आली. अशीच एक मिरवणूक लाहोरला पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निघाली. तिच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. यात लाला लजपतराय जखमी होऊन त्यातच त्यांचा अंत झाला
८ ऑगस्ट १९३० ला १४४ कलम लावले असतांनाही नागपुरला गढवाल दिनाची मिरवणूक निघाली. ती कोतवाली जवळ अडविण्यात आली. मिरवणुकीतील लोक तेथेच ठाण मांडून बसले. रात्री बारा वाजेपर्यंत ते तसेच तेथे बसून होते. नागपुर शहर पाहायला लोटले. आमच्या शाळेजवळच सशस्त्र सैनिकांचा तळ पडला होता. रात्री बारा वाजता १४४ कलमाची मुदत संपली म्हणून मिरवणुकीचा अडथळा काढून घेण्यात आला. नागपुरचे तत्कालीन डी. सी. श्री. त्रिवेदी यांच्या समजूतदारपणामुळे त्या दिवशीचा गोळीबाराचा प्रसंग टळला. परदेशी कापडांच्या दुकानांवर आणि दारूच्या गुत्त्यांवर पिकेटिंग चालू होते. रोज हजारो स्वयंसेवक पकडले जात होते. असा तो झपाटलेला काळ होता. टाउन हॉल, पटवर्धन ग्राउंड, चिटणीस पार्क येथे मोठमोठ्या जाहीर सभा होत. मी बहुतेक सभांना जात असे. माझे वडीलही माझ्या बरोबर येत असत. तेही खादी वापरू लागले होते. ह्या अशा वातावरणात मी परकीय सरकारची नोकरी न करण्याचा निश्चय केला.
विसावे शतक हे साऱ्या जगातच क्रांतिकारक ठरले. रशियातील झारशाही नष्ट होऊन कम्युनिस्ट राजवट अस्तित्वात आली. लेनिन, स्टॅलिन, खृश्चेव्ह, गोर्बचेव्ह, येल्तसिन ही स्थित्यंतरे रशियाने व साऱ्या जगाने पाहिली. आणि आता अध्यक्ष आणि रशियन संसद यांच्यातच संघर्ष सुरू झाला आहे.
भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर जगातीत अनेक लहानमोठे देश एकामागून एक स्वतंत्र होत गेले. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी लढ्याची सुरुवात केली. नंतर कित्येक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर नेल्सन मंडेलाची सुटका झाली. आता दक्षिण आफ्रिकेतही लोकशाहीच्या स्थापनेची चिन्हे दिसत आहेत.
युनियन ऑफ सोव्हियेत सोशालिस्ट रिपब्लिक (USSR) दुभंगून छोटी छोटी स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली आहेत.
१९१४ च्या महायुद्धानंतर विलग झालेले पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी पुनश्च एक झालेले आहेत.
आतापर्यंत अमेरिका व रशिया ही दोन बलाढ्य व समृद्ध राष्ट्रे जगात अस्तित्वात होती. रशियाच्या विघटनानंतर आता अमेरिका हे एकच बलाढ्य व समृद्ध राष्ट्र उरले आहे.
सामाजिक क्षेत्रातही विसाव्या शतकात क्रांती घडून आली आहे. आफ्रिकेतील आणि अमेरिकेतील वर्णविद्वेषाची धार बरीच बोथट झाली आहे. भारतातील अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट झाली नसली तरी महात्मा गांधी, सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, इत्यादींच्या अथक प्रयत्नांमुळे व प्रचारामुळे तिचे पूर्वीचे भयानक स्वरूप आता शिल्लक राहिले नाही. सार्वजनिक क्षेत्रात तर ती नष्टप्रायच झाली आहे.
स्त्री शिक्षणाच्या बाबतीतही बराच बदल घडून आला आहे. मी सायन्स कॅालेज मध्ये असताना इंटरमिजिएटच्या वर्गात फक्त तीनच मुली होत्या. B. Sc. च्या वर्गात फक्त एकच मुलगी होती. आता विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या जवळजवळ समान असते. स्त्री शिक्षणाच्या एवढ्या प्रसाराचे श्रेय महर्षी कर्वे यांनाच आहे.
शिक्षणाच्या सर्व शाखात आता मुली आहेत. तसेच नोकरी आणि उद्योगाच्या सर्व क्षेत्रात स्त्रिया दिसून येतात.
आर्थिक क्षेत्रात तर भारतात विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मोठी क्रांतीच घडून येत आहे. भारताचे नवे आर्थिक धोरण हा मोठा वादाचा विषय झालेला आहे. स्वदेशी मालाला उत्तेजन द्यायचे म्हणून परदेशी मालावर जबर जकात बसविली जात असे. पण आता लंबकाने उलट टोक गाठण्याची चिन्हे दिसत आहेत. परदेशी मालावरील कर कमी करण्यात येत आहेत. खुल्या व्यापाराचा पुरस्कार करण्यात येत आहे. इंग्रज हातात तराजू घेऊन व्यापाराच्या मिषाने भारतात घुसले आणि राज्य बळकावून बसले, ह्या साऱ्या इतिहासकडे डोळेझाक करून देशोदेशी दौरे काढून परकीयांना भारतात भांडवल गुंतविण्यास, कारखाने काढण्यास, व्यापार करण्यास आपले शासन आग्रहपूर्वक निमंत्रण देत आहे. जेथे परदेशी कापडाच्या होळ्या पेटल्या, परदेशी कापडाच्या दुकानासमोर स्त्रियांनी सुद्धा पिकेटिंग केले, कारावास भोगला, पोलीसांच्या दंडुक्यांचा मार सहन केला, परदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर आडवे पडून बाबू गेनूने आत्मबलिदान केले, तेथेच आता माझी साडी इंपोर्टेड आहे असे सांगण्यात भारतीय नारीला भूषण वाटत आहे. स्वदेशी चळवळ करू नका, केल्यास आमच्या खुल्या आर्थिक धोरणात बाधा निर्माण होईल, परदेशी तंत्रज्ञान आपल्याला मिळणार नाही, असे आपले तथाकथित पुढारी म्हणत आहेत. महात्मा गांधींनी दारुबंदीची केवढी प्रचंड चळवळ उभारली होती! दारूच्या गुत्त्यांवर पिकेटिंग केल्यामुळे हजारो कार्यकर्त्यांना कारावास भोगावा लागला. त्याच देशात आता तथाकथित राजकीय पुढाऱ्यांना दारूच्या दुकानाचे लायसंस देण्यात येत आहेत. रस्तोरस्ती शिक्षण संस्थांच्या शेजारी बीअर बार, डायरेक्टर्स स्पेशल अशी सोज्वळ नावे धारण करून दारूची दुकाने उजळ माथ्याने फिरत आहेत. ही प्रगती की अधोगती? दारू पिणे ही तर उच्चभ्रू लोकांची फॅशन झाली आहे. महात्मा गांधींची सारी चळवळ वाया गेली असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. परदेशी कर्जाचा डोंगर सारखा वाढतोच आहे. देश कर्जबाजारी झाला आहे. परदेशाकडे तो गहाण टाकण्याचे हे भिकेचे डोहाळे तर नव्हेत ना? एकविसाव्या शतकात प्रवेश करण्याची अशी जोरदार तयारी सुरू आहे.
मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे यासाठी जोरदार चळवळ देशात निर्माण झाली होती. पण आता पूर्व माध्यमिक स्तरापासून इंग्रजी माध्यम मुलांना देणे सुरू आहे.
वैज्ञानिक क्षेत्रात तर प्रचंड प्रगती दिसून येते. टेलीव्हीजन आणि मोटरकार आता चैनीच्या वस्तू राहिल्या नसून आवश्यक गरजा झाल्या आहेत. संगणक सर्व कारखान्यातून, कार्यालयातून, रेल्वेच्या आरक्षण कक्षातून जोरात मुसंडी मारत आहेत. चंद्रावर माणूस पोचला आहे. उपग्रह आकाशात सोडले जात आहेत. त्यावरून येणाऱ्या चित्रांवरून हवामानाचे भाकित वर्तविण्यात येत आहे. यंत्रमानवाची कामगिरी तर आश्वर्यकारक आहे. विनाशक शस्त्रांची आगेकूच सुरू आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या स्कूटर्स आणि मोटरगाड्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांचे आयुर्मान घटत आहे, आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
'यंत्र हे शाप की वरदान' ह्या प्रश्नाच्या कक्षा वाढून 'विज्ञान हे शाप की वरदान' असे विस्तृत स्वरूप त्याला प्राप्त होऊ पाहत आहे. पर्यावरणाचा प्रश्न अतिशय भेडसावू लागला आहे. पर्यावरणाचे प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल बिघडू पाहत आहे. हे प्रदूषण थांबले नाही तर जगाच्या नंदनवनाचे स्मशानात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. वैज्ञानिक शोध आणि निसर्ग यांचे अघोषित युद्ध सुरू आहे. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. माणसाची मानसिकता बिघडल्यामुळे विज्ञानाचा उपयोग निसर्गाच्या रक्षणासाठी न होता भक्षणासाठी होत आहे आणि त्यामुळे या जगाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मुंबईत शुक्रवार दि. १२ मार्च १९९३ रोजी १३ ठिकाणी झालेले बाँबस्फोट हे माणसाच्या विकृत मानसिकतेचे ज्वलंत उदाहरण आहे. विज्ञान हे शाप कसे ठरू शकते, याचेही ते गमक आहे.
समाजाची मानसिकताच विसाच्या शतकात बिघडत चालली आहे. महात्मा गांधींसारख्या अहिंसेच्या पुजाऱ्याने १२ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक दांडी यात्रेला प्रस्थान केले. त्याच तारखेला ६३ वर्षांनंतर समाजविध्वंसक दुरात्म्यांनी मुंबईत जीवंत माणसांची होळी पेटविणारे बाँबस्फोट घडवून आणावे हा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल.
पुण्य-पाप, स्वर्ग-नरक ह्या कल्पना लयाला गेल्या. नीतिन्याय उरला नाही. भोगवाद बोकाळला. 'मनःपूतं समाचरेत्' या वचनाचा विकृत अर्थ रूढ होऊ लागला. पूत म्हणजे पवित्र. मनाला जे पवित्र आणि श्रेयस वाटेल ते आचरावे असा या वचनाचा खरा अर्थ. पण मनास येईल तसे स्वैर वागावे, अनियंत्रित वागावे असा विपरीत अर्थ लावण्यात येऊ लागला. साधनशुचिता अव्यवहार्य ठरली. श्रमाची थोरवी ही कल्पना लयाला जाऊन अभ्यासावाचून परीक्षेत यश, गुणवत्तेवाचून महाविद्यालयात प्रवेश, परिश्रमावाचून पैसा, जनसेवेवाचून पुढारीपण, काही कार्य न करता मानसन्मान, त्यागाशिवाय कीर्ति, कशी मिळवता येईल यासाठी बुद्धी खर्च होऊ लागली. त्यातून मग परीक्षेत काॅपी, परीक्षकास लाच, कॅपिटेशन फी, काळा पैसा, काळा पैसा दडविण्यासाठी देवदर्शनास गर्दी व गुप्त पेटीत दान इत्यादि प्रकारास वारेमाप ऊत आला आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रात भष्टाचार बोकाळत आहे. विद्येचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अस्सल मागे पडून नक्कल वाढत चालली आहे. परीक्षेत अक्कल कामास न येता शक्कल लाभदायक ठरू लागली आहे. राजकारणात ठगांची व गुंडांची गर्दी वाढत आहे. अध्यात्मात भोंदुगिरी व फसवेगिरी बोकाळत आहे. विद्वत्ता, नीती, शील, चारित्र्य यांचे महत्त्व कमी होऊन पैसा हेच आराध्य दैवत झाले आहे. अर्थार्जनाच्या बाबतीत सारासार विचार बाजूला राहून येनकेन प्रकारेण प्रसंगी दुसऱ्याला लुबाडून, फसवून किंवा खड्ड्यात घालून सुद्धा पैसा मिळविणे यात काहीही गैर वाटेनासे झाले आहे. 'शीलं परं भूषणम्' हे सुभाषित कालबाह्य ठरू पाहत आहे. पैसा हेच मूल्य झाले आहे.
मूल्यात बदल म्हणजे क्रांती अशी साने गुरूजींनी क्रांतीची व्याख्या केली आहे. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. महात्मा गांधींचा साधनशुचितेच्या बाबतीत केवढा कटाक्ष होता! पण ते सारे लयाला जाऊन विसाव्या शतकाच्या या अखेरच्या दशकात विपरीत अर्थाने क्रांती घडून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
ज्या विसाव्या शतकात स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा भावे, पं. जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ ठाकूर, सरदार वल्लभभाई पटेल, बाबू राजेंद्र प्रसाद, यांच्या सारख्या थोर विभूती होऊन गेल्या, त्याच विसाव्या शतकाने जाता जाता अशा दुगाण्या का झाडाव्या तेच कळत नाही.
Every cloud has a silver lining ह्या उक्तीप्रमाणे सध्याच्या तमोमय ढगाळ वातावरणातूनच महापुरुषांनी आपल्या उराशी बाळगलेले चंदेरी स्वप्न साकार होईल, असा आशावाद आपण बाळगू या. 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' हे कविवचन खरे ठरून २१ व्या शतकाची तेजोमय पहाट नजीकच्या भविष्यात पाहायला मिळेल अशी सदिच्छा प्रकट करून ही द्वादश मण्यांची सूत्रबद्ध केलेली मज्जीवनमणिमाला हातावेगळी करतो. हे आत्मचरित्र लेखनाचे अघटित माझ्या हातून घडले. म्हणून अमृतकलश नामक माझ्या भक्तीगीतसंग्रहातील अघटित नामक गवळणीनेच अघटिताची सांगता करीत आहे.
।। अघटित ।।
असं कसं बाई अघटित घडलं । चित्त माझं हरिनं चोरलं ॥धृ॥
काही सुचेना कामधंदा
निशिदिन वाचे हरि गोविंदा
काय करावे असल्या छंदा
प्रेम असं हे विपरित जडलं ॥धृ॥
गोकुळिचा हा अजब कान्हा
मुरलीच्या अति मंजुळ ताना
वेळी अवेळी पडती श्रवणा
देहभान सखे मम हारपलं ॥धृ॥
मयुर पिसांचा शिरी मुकुट तो
वन पुष्पांचा वरि तुरा शोभतो
कदंब शाखेवरती बैसतो
रूप सावळं मम मनी बिंबलं ॥धृ॥
वृंदावनि गे यमुना तीरी
गायी चारी अधरि बासरी
पायी आढी मुरली धारी
ध्यान असं गे मम ह्रदयी ठसलं ॥धृ॥
कटी पितांबर, वरती शेला
कंठी शोभती बकुळी माळा
अलंकार हस्ती चरणि गळा
मोहरून मम मन सखि गेलं ॥धृ॥
पौर्णिमेची रात्र चांदणी
यमुनातीरी वृंदावनी
रास रची तो नटुनी थटुनी
वेडावुन मम मन मग गेलं ॥धृ॥
सोडुनि सारी लज्जा लाज
निमाला द्वैतभावचि आज
हाती हरिच्या हात गुंफुनी
मनसोक्त नाचले शरीर दमलं ॥धृ॥
श्रीकृष्णाचा अवखळ चाळा
लावि मनाला लळा आगळा
द्वैतभाव गळला सगळा
मम रूप कृष्ण स्वरूपि मिळालं ॥धृ॥
आलं आलं हाती आलं
परब्रह्म गे मला गवसलं
काय सांगू, कसं मी सांगू
मम जन्माचं सार्थक झालं ॥धृ॥
_____________________
मणी - १३
पुढचे पाऊल
ह्या तीन वर्षातील काही घटनांचा उल्लेख केल्याशिवाय ह्या जीवनवृत्ताला अद्ययावत स्वरूप प्राप्त होणार नाही.
माझ्या सासूबाईंनी नव्वदी ओलांडली होती. त्या दिवसेंदिवस थकत चालल्या होत्या. १२ ऑगस्ट १९९३ ला रात्री त्यांच्या अंगात ताप भरला. त्यांनी यावेळी जे अंथरूण धरले ते कायमचेच. प्रकृती उत्तरोत्तर क्षीण होत गेली. उठणे बसणे मुश्किल झाले. वैद्यकीय उपचार सुरूच होते. पण उत्तरोत्तर त्यांनाही त्या दाद देईनाश्या झाल्या. अशा स्थितीत ६ महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेरीस १२ फेब्रुवारी १९९४ चा दिवस उजाडला. त्याच दिवशी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
माझ्यावर व माझ्या मुलामुलींवर, सुनांवर, जावयांवर आणि नातवंडांवर त्यांची अतिशय माया होती. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ पिढीतील एक अत्यंत मायाळू, प्रेमळ आणि सच्चरित व्यक्तिमत्व हरपले. आम्हा सर्वांनाच अतिशय शोक आणि दु ख झाले हे सांगणे न लगे. योगायोगाची गोष्ट अशी की माझे श्वशुर स्व. मुरलीधरपंत सास्तीकर हे १९८४ साली वयाच्या ९४ व्या वर्षी वारले आणि माझ्या सासुबाई देखील तदनंतर १० वर्षांनी १९९४ साली वयाच्या ९४ व्या वर्षीच वारल्या. दोघांनाही समान आयुष्य लाभले.
माझा ज्येष्ठ मुलगा चि. प्रमोद ह्याचा एक वैज्ञानिक ग्रंथ इंग्लंड व अमेरिकेत प्रसिद्ध झाला. त्यानिमित्त प्रमोदच्या ५० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून आम्ही आमच्या घरी एक मोठा स्वागत समारंभ आयोजित केला होता. इंग्लंड मधील Research Studies Press ने हा ग्रंथ प्रकाशित केला होता. त्याच संस्थेच्या प्रमुखांनी ह्या वर्षी प्रमोदला 'पुन्हा आपण दुसरा ग्रंथ लिहा, आम्ही तो प्रसिद्ध करू' असे पत्र पाठविले. प्रमोदने त्यांना आपले Proposal पाठविले व त्यांनी ते मान्यही केले. ह्या दुसऱ्या ग्रंथाचे लेखनकार्य प्रमोदने सुरू केले आहे. त्याची थोरली मुलगी चि. वैशाली यंदा आंध्रप्रदेशच्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी मॅट्रिकच्या परीक्षेत ९०% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिने पुढील शिक्षणाकरिता सिकंदराबादच्या St. Francis' College मध्ये प्रवेश घेतला आहे.
कु. वैशालीचा धाकटा भाऊ चि. कौस्तुभ हा सहाव्या वर्गाच्या वार्षिक परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सातव्या वर्गात गेला आहे.
माझी ज्येष्ठ कन्या चि. सौ. गीता हिची मुलगी कु. मृदुला ही यंदा अमरावती माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत ६४. ८३% गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तिचा मुलगा चि. अमोल हा १० वी मॅट्रिकच्या परीक्षेत ८२% गुण मिळवून प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला. तिचा धाकटा मुलगा चि. विशाल हा १० वी मॅट्रिकच्या परीक्षेत द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला.
माझा दुसरा मुलगा चि. विश्राम हा बँक ऑफ बडोदाच्या गोवा राज्यातील मडगाव शाखेत आहे. त्याचा मोठा मुलगा चि. अभिजीत हा Mechanical Engineering च्या Final Year ला आहे. दुसरा मुलगा चि. पराग हा बारावी मॅट्रिकच्या परीक्षेत ७८% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याने आता रामदेवबाबा इंजिनीअरिंग कॅालेजमध्ये Mining Engineering ला प्रवेश घेतला आहे. चि. विश्रामची आता १९९६ च्या सुरुवातीला पुण्याला बदली झाली असून त्याच्याकडे शाखांच्या तपासणीचे काम आहे.
माझी दुसरी मुलगी चि. विजया हिचा पहिला मुलगा चि. आशुतोष हा यंदा १० वी मॅट्रिकच्या परीक्षेला ६५% गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला व दुसरा मुलगा चि. श्रीनिवास हा सातवीत गेला आहे.
माझा तिसरा मुलगा चि. अरुण हा मुंबई आय. आय. टी. त Chemical Engineering चा प्रोफेसर असून त्याची मोठी मुलगी चि. शरयू अतिशय बुद्धिमान असून तिने यंदा वार्षिक परीक्षेत १००% गुण मिळवून माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला आहे. त्याची दुसरी मुलगी चि. मंजिरी यंदापासूनच शाळेत जाऊ लागली आहे.
माझी कनिष्ठ कन्या चि. सौ. वृंदा हिची मुलगी चि. जयश्री व मुलगा चि. ऋषिकेश हे दाघेही बुद्धिमान असून अनुक्रमे अकरावीत व सातवीत गेले आहेत. चि. जयश्रीने १९९६ च्या दहावी मॅट्रिकच्या परीक्षेत ८०.५% गुण प्राप्त केले. तिला चार विषयात प्राविण्ये आहेत.
माझा धाकटा मुलगा चि. सुधीर हा मुंबई आय. आय. टी. तून Ph. D. प्राप्त करून तेथेच Senior Research Engineer आहे असे मागे सांगितले आहे. त्याने दिल्लीच्या SGS Thomson Micro Electronics ह्या कंपनीत अर्ज केला. तेथे त्याचा फेब्रुवारी १९९४ मध्ये साक्षात्कार होऊन त्याला घेण्यात आले. तो त्या कंपनीत १५ मार्च १९९४ ला रुजू झाला. त्यावेळी कंपनीचे कार्यालय नवी दिलीच्या नेहरू प्लेस मध्ये International Trade Tower मध्ये होते. म्हणून चि. सुधीरने नवी दिल्लीत किरायाने घर घेतले होते. मी सपत्नीक माझे जावई श्री. आमोदराव देव व कन्या सौ. वृंदा यांच्यासह चि. सुधीरकडे ५ जून १९९४ ला गेलो आणि तेथे २५ दिवस राहून विमानाने नागपुरला परत आलो. माझे जावई व मुलगी २-३ दिवस दिल्लीला राहून तेथून कुलू मनाली व सिमला पाहून नागपुरला परत आले होते. त्यावेळी सुधीरने आम्हा सर्वांना त्याच्या कंपनीचे कार्यालय दाखविले. ही कंपनी इटली व फ्रांस यांच्या सहकार्याने चालणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तेथे काँप्युटरच्या मेमरीत आवश्यक असलेले भाग तयार करण्यात येतात. सुधीर तेथे प्रोजेक्ट लीडर या पदावर कार्यरत आहे.
आम्ही दिल्लीला गेलो त्यावेळेस कंपनीची स्वतःच्या मालकीची तीन मजली नवीन इमारत तयार होत होती. आम्ही ती त्या अवस्थेत पाहून आलो होतो. बांधकाम संपूर्ण झाल्यावर कंपनीचे कार्यालय तेथे स्थलांतरित झाले. प्रस्तुत इमारतीचे एकंदर बांधकाम अतिशय सुरेख असून ती वातानुकूलित आहे. तेथून यमुनेचे पात्र दिसते. वरच्या गच्चीवरून सभोवतालचे दृश्य अति मनोरम दिसते. ही इमारत नवी दिल्लीहून जवळ असलेल्या 'नोइडा' ह्या नवीन वृद्धींगत होत असलेल्या शहरात बांधण्यात आली आहे. नोइडातील इमारती, घरे व रस्तेही छान आहेत. कंपनीचे कार्यालय नोइडात गेल्यामुळे सुधीरनेही नोइडातच घर घेतले होते.
आम्ही उभयता ८ एप्रिल १९९५ ला नागपुरहून निघून दि. ९ एप्रिल रामनवमीच्या दिवशी सकाळी नवी दिल्लीला पोचलो. सुधीर आम्हाला घ््यायला आला होता. आम्ही तेधून टॅक्सीने त्याच्या नोइडातील घरी गेलो. या मुक्कामात आम्ही महात्मा गांधींची राजघाट येथील समाधी, पं. नेहरू यांची शांतिवन येथील समाधी, इंदिरा गांधी, लालबहादुर शास्त्री यांच्या समाध्या इत्यादि थोर राजकीय स्मारकांचे दर्शन घेऊन आलो. आम्ही नोइडाहून दि. २ मे १९९५ ला निघून ३ मे १९९५ ला नागपुरला परतलो. सुधीरकडे सध्या कंपनीची प्रयोगशाळा सर्व आवश्यक उपकरणांनी व साधन सामग्रीने सुसज्ज करण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्याकरिता त्याला आवश्यक ती खरेदी करण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.
कंपनीचे मुख्य कार्यालय इटलीत आहे. कंपनीने सुधीरला इटलीला पाठविण्याचे ठरविले. तो दि. १०-६-९५ ला विमानाने दिल्लीहून स्वीत्झर्लंड मधील झुरिच या शहरी गेला व तेथून इटलीतील मिलॅन या सुप्रसिद्ध शहरी गेला. तेथून तो कंपनीच्या कारने Jolly Touring Hotel मध्ये गेला. तेथेच त्याची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कंपनीचे मुख्य कार्यालय Agrate या शहरात आहे. दोन दिवस हॉटेलात राहून तिसऱ्या दिवसापासून कंपनीच्या कारने त्याला रोज Agrate येथील कंपनीच्या कार्यालयात जावे लागले. कार्यालयात सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय, तेथील प्रयोगशाळेचे निरीक्षण, नोइडातील प्रयोगशाळेसाठी १९९५ या वर्षात काय काय साधनसामुग्री विकत घ््यायची या संबंधी बोलणी इत्यादि कामे झाली. सायंकाळी त्याला कंपनीची कार मिलॅन मधल्या हॉटेलात आणून सोडत असे. एक दिवस सुधीर आपल्या सहकाऱ्यांसोबत इटलीतील व्हेनिस हे बेटांचे सुंदर शहर पाहून आला. मिलॅनहून व्हेनिसला जाणे-येणे त्याने आगगाडीने केले. कंपनीने सोपविलेली सर्व कामे आटोपून दि. १९-६-९५ ला तो विमानाने दिल्लीला परत आला.
चि. सुधीरची पत्नी सौ. कविता तिच्या माहेरी मध्यप्रदेशातील भिलई या औद्योगिक शहरी दवाखान्यात शनिवार, आषाढ कृष्ण तृतीया दि. १५ जुलै १९९५ ला सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. आम्हाला नात झाली. एक आनंददायक घटना. आमच्या घरी तिचे दि. ७ सप्टेंबर ९५ ला बारसे होऊन 'अंजली' हे नाव ठेवण्यात आले. दि १५ जानेवारी १९९६ ला चि. सुधीर बंगलोरच्या Cypress Semiconductors [I] Pvt. Ltd. ह्या संगणकाच्या मेमरीतील साहित्य बनविणाऱ्या अमेरीकन कंपनीत Design Engineer च्या पदावर रुजू झाला. दि. १४ जुलै ९६ ला चि. अंजलीचा वाढदिवस बंगलोरला साजरा झाला. मी गेलो होतो.
Cypress या कंपनीने चि. सुधीरची बदली आपल्या अमेरिकेतील मिसिसिपी स्टेटमधील Stark Ville येथील शाखेत केली आहे. तो बहुधा जुलै १९९७ मध्ये अमेरिकेत जाऊन तेथे रूजू होईल.
अशा प्रकारे मी आणि माझ्या सर्व मुलामुलींनी विद्याध्ययन व अध्यापन क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. प्रमोदला त्याच्या संशोधनाप्रीत्यर्थ आंतराष्ट्रीय ख्यातीचा 'शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचा एक ग्रंथ इंग्लंड आणि अमेरिकेत प्रसिद्ध झाला आहे. दुसरा प्रकाशनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अरुणने हवेतून प्राणवायू वेगळा करण्याचे अत्यंत उपयुक्त यंत्र तयार केले आहे. तो प्रतिवर्षी ३-४ दा Piping Engineering Course चे आयोजन करतो. भारतातील व परदेशातील अनेक विद्यार्थी शिकायला येतात. प्रमोद आणि अरुण ह्या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली अनेकांनी Ph. D. पदवी प्राप्त केली आहे. ते दोघेही Ph. D. विद्यार्थ्यांचे परीक्षक असतात. प्रमोदने आपला पहिला वैज्ञानिक ग्रंथ आम्हाला अर्पण केला आहे. माझा एक विद्यार्थी डॉ. विजय पांढरीपांडे, प्राध्यापक, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद याने आपली स्वलिखित कादंबरी 'जो तो पथ चुकलेला' ही मला गुरुदक्षिणा म्हणून ऋणनिर्देशपूर्वक सादर अर्पण केली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे आमची तिसरी पिढी - आमचे नातू व नाती देखील - बुद्धीमान व साक्षेपी असून कुलकीर्तीत मोलाची भर घालतील अशी पदचिन्हे दिसत आहेत.
आमच्या चारही सुना पदवीधर असून विद्याविनयसंपन्न आहेत. प्रत्येकीच्या अंगी काही ना काही तरी कला आहे. पहिली स्नुषा सौ. मंदा ही चित्रकला व रंगकाम यात प्रवीण आहे. ती विवाहापूर्वी शिक्षिका होती. तिच्या आई देखील शिक्षिका होत्या. तिचे वडील धारवाडच्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. दुसरी स्नुषा सौ. वीणा ही सुद्धा मुलामुलींच्या शिकवण्या करते. ती शिवणकाम, विणकाम, भरतकाम यात प्रवीण आहे. तिच्या आई देखील सेवासदन हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. आता सेवानिवृत्त झाल्या आहेत. माझ्या तिसऱ्या सुनेने (सौ. सरिता) देखील विवाहापूर्वी काही मुलींना शिकविले आहे. विवाहाच्या वेळी ती रसायनशास्त्रात M. Sc. होतीच, पण विवाहानंतर 'काॅम्प्युटर सायंस' चा पदव्युत्तर डिप्लोमाही प्राप्त केला आणि मुंबई आय. आय. टी. त एका प्रोजेक्टवरही काम केले. चौथी स्नुषा कविता ही विवाहापूर्वी M. Sc. आणि B. Ed. होती. विवाहानंतर मुंबईच्या चेंबूरमधील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात प्राध्यापिका होती. चि. सुधीर दिल्लीला गेल्यावर तेथेही तिने एक कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिकेचे काम केले. सौ. सरिता व सौ. कविता ह्या दोघीही शिवणकाम, विणकाम, भरतकाम, चित्रकला यांत प्रवीण आहेत. सर्वच जणी गृहकार्यात दक्ष असून अंगात काही ना काही कला बाळगून आहेत, परिश्रमी आहेत, सुशील आहेत आणि निगर्वी आहेत. माझ्या धर्मपत्नीने आपल्या आचरणाने व कृतीने सर्व मुलामुलींवर व सुनांवर जे सुसंस्कार केले आणि आपल्या सर्व अपत्यांना विद्यार्जनाच्या कार्यात जे प्रोत्साहन व उत्तेजन दिले त्याचेच हे फलित होय. यापेक्षा जीवन साफल्याचे दुसरे समाधान ते काय असणार?
शील व चारित्र्यावर माझा सतत भर राहिला आहे. ते नसेल तर विद्वत्ता, पांडित्य, संपत्ती, बल, सत्ता, अधिकार सर्व कवडीमोल आहेत असे मी मानतो व त्याप्रमाणेच वागतो.
माझी पत्नी सौ. प्रमिला हिने तारखेनुसार १४ जुलै १९९५ ला व तिथीनुसार आषाढ वद्य नवमीला आपल्या वयाची ७० वर्षे पूर्ण करून ७१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. माझ्या ज्येष्ठ मुलाने व मुलीने वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मी तिथीनुसार श्रावण शुद्ध एकादशी व तारखेनुसार २१ ऑगस्ट १९९५ ला वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सहस्रचंद्रदर्शन सोहळा माझी प्रतीक्षा करीत आहे
माझा 'अमृतकलश' नामक भक्तीगीत संग्रह व 'मज्जीवनमणिमाला' नामक आत्मचरित्र ही दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. ती माझ्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या सुमुहूर्तावर प्रसिद्ध होतील.
१९९५ सालचे वैशिष्ट्य असे की ते माझे ८१ व्या वर्षात पदार्पण करण्याचे वर्ष आहे. तसेच ते माझ्या धर्मपत्नीचे ७१ व्या वर्षात पदार्पण करण्याचे वर्ष आहे. एवढेच नव्हे तर माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचे म्हणजे माझ्या आईचे ते जन्मशताब्दी वर्ष आहे आणि वडीलांचे १२१ व्या जन्मसंवत्सरीचे वर्ष आहे. हे चारही समारंभ रविवारच्या सुटीच्या सोईने दि. २० ऑगस्ट, १९९५ ला एकसमयावच्छेदेकरुन संपन्न झाले. सकाळी धार्मिक विधी झाला. दुपारी ५० लोक भोजनाला व संध्याकळी ५० लोक फराळाला होते. दि. १० मार्च १९९६ ला ती. सौ. आईची जन्मशताब्दी स्वतंत्ररीत्या साजरी करण्यात आली.
C. P. & Berar High School च्या ७१-७२ च्या बॅचने त्यांच्या रजत महोत्सवाप्रीत्यर्थ दि. २५ नोव्हेंबर १९९५ ला एक समारंभ आयोजित केला. समारंभाचे अध्यक्ष संस्कृतचे गाढे विद्वान, ख्यातनाम वक्ते व साहित्यिक डॉ. मधुकर आष्टीकर यांच्या हस्ते माझा वस्त्र, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दि. १४ ऑगस्ट १९९६ ला माझी द्वितीय कन्या चि. विजया हिची C. P. & Berar High School and Junior College, Ravi Nagar, Nagpur येथे मराठीची पूर्णकालीन कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापिका या पदावर नेमणूक करण्यात येऊन पदोन्नती देण्यात आली.
वयोमानापरत्वे आता माझे शरीर थकत चालले आहे. पण मनाची उभारी कायम आहे. शरीर थकत चालले यात विषाद मानण्यासारखे काही नाही. ती निसर्गाची प्रक्रिया आहे. तो आपले कार्य करील. त्यात भीती किंवा खेद वाटण्यासारखे काहीच नाही. जन्म, बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व ह्या नैसर्गिक अवस्थांच्या पुढचीच मृत्यू ही अवस्था आहे. काही नियत काळासाठी आपण या जगात आलो. परमेश्वराच्या मनात असेल तोपर्यंत सुखसमाधानाने जगावे एवढेच फक्त आपल्या हाती आहे. मरण म्हणजे स्वगृही परत जाणे, निजधामाला जाणे. 'याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा' ह्या संतवाणीप्रमाणे आपले आचरण असले म्हणजे मग मरणाची काय तमा?
माझ्या गतजीवनाचे मी जेव्हा सिंहावलोकन करतो तेव्हा माझ्या अंगी पूर्ण समाधान बाणते. मला कशाचाही पश्चात्ताप होत नाही. मी कोणाचा द्वेष केला नाही. कोणाचेही वाईट चिंतिले नाही. आपल्या स्वार्थासाठी कोणाचाही घात केला नाही. हे सात्विक समाधान मला आहे. मला परमेश्वराने माझी योग्यता नसतांना बरेच काही दिले. आयुष्यही वाजवीपेक्षा जास्त दिले. काही अडचणी आल्या, संकटे झाली. पण ती सर्व परमेश्वर कृपेने निवारण झाली. 'सदा सर्वदा देव सन्नीध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे' या श्री समर्थ रामदास स्वामींच्या वचनाचा मला पदोपदी प्रत्यय येतो.
तेव्हा आता मला असेच म्हणावे लागते की 'बा मृत्यो! तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये. तुझ्या स्वागतासाठी मी सिद्ध आहे.'. आता माझे पुढचे पाऊल मृत्यूच्या दारीच. मज्जीवनमणिमालेचा जप येथेच संपवितो.
।। इति मज्जीवनमणिमाला समाप्ता ।।
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment