११. देई दर्शन
हे अयोध्याधिशा रामचंद्रा, हे करुणाकरा राघवेंद्रा
हे अपार दयासमुद्रा, देई दर्शन मज देवा
हे दयाळा रघुकुळटिळका, हे कौसल्यात्मज जानकीनाथा
हे दशरथनंदन सीताकांता, देई दर्शन मज देवा
हे पितृवचन प्रतिपाळका, हे भरताग्रज सुग्रीवसखा
हे खरदूषणवालिनिर्दालका, देई दर्शन मज देवा
हे मर्यादा पुरुषोत्तमा, हे भक्तजनमनविश्रामा
हे कौसल्यानयनाभिरामा, देई दर्शन मज देवा
हे मिथिलेश जनकजामाता, हे लंकापति रावणहन्ता
हे सीतापति जगन्नियंता , देई दर्शन मज देवा
हे योगीजनमानसहंसा, हे साकेतविहारी परमेशा
हे शरयूतटनिवासा, देई दर्शन मज देवा
हे दीनवत्सल करूणासिंधू, हे कृपानिधी लक्ष्मणबंधू
हे त्राटिकांतक हनुमत्प्रभू, देई दर्शन मज देवा
हे लीलाविग्रही पुरुषोत्तमा, हे पतितपावन आत्मारामा
हे विश्वामित्र मखरक्षका, देई दर्शन मज देवा
हे देवबंध विमोचका, हे न्यायनीतीसंवर्धका
हे सध्दर्म संस्थापका, देई दर्शन मज देवा
हे विभीषण राज्यदायका, हे लंकेशप्राणहारका
हे लवांकुशजनका, देई दर्शन मज देवा
हे प्रजानुरंजन व्रतधारी, हे भक्तजनक्लेशनिवारी
हे श्रीराम पीतांबरधारी, देई दर्शन मज देवा
हे अहिल्या शिलोध्दारका, हे शिवधनुष्यभंजका
हे भक्तजनसंरक्षका, देई दर्शन मज देवा
हे वनवासी वल्कलधारी, हे एकबाणी धनुर्धारी
हे भक्तजनसंकटहारी, देई दर्शन मज देवा
हे त्रैलोक्यपती ब्रह्मांडनायका, हे राजाराम प्रजापालका
हे राजाधिराज अयोध्याधिशा, देई दर्शन मज देवा
हे श्रीराम जय राम जय जय राम रघुपति राघव राजाराम
हे पतित पावन सीताराम, देई दर्शन मज देवा
हे करूणानिधी कृपाळा, हे दयार्णवा दयाळा
हे घनश्याम घननीळा, देई दर्शन मज देवा
_____________________
१२. अगा पांडुरंगा
अगा पंढरीच्या पांडुरंगा, चंद्रभागा तव चरणी गंगा
विटेवरी समचरण उभा, दे मजला तव चरणी जागा
मातृपितृसेवेमध्ये पुंडलीक झाला दंग
भंगू नये त्याचा रंग म्हणुनी विटेवर श्रीरंग
तू लावण्याचा गाभा, मुखी कोटी सूर्यप्रभा
पीतांबराची सुंदर शोभा वर्णू न शके माझी प्रतिभा
आळंदीचे ज्ञानदेव, पैठणचे एकनाथ
देहूचे ते तुकाराम, यांची तुजला नित्य साथ
ज्ञानदेवे रचिली ओवी, तुकारामे अभंग गाथा
नामदेव कीर्तन करी, गोडी भक्तीची एकनाथा
सावता माळी, गोरा कुंभार, सेना न्हावी, चोखा महार
सज्जन कसाई, नरहरी सोनार, नरसी मेहता, रोहिदास चांभार
संत सखू, जनाबाई, बह्यनाबाई, मीराबाई
कान्होपात्रा, मुक्ताबाई सारे भक्त तुझे विठाई
लक्षावधी भक्त वारकरी नाचती चंद्रभागा तिरी
विठ्ठल विठ्ठल नाम गजरी अवघी दुमदुमली पंढरी
आषाढी कार्तिकी एकादशी कोंदे अंबर नामघोषी
नर नारी जातीभेद नुरला कोठे औषधासी
टाळ वीणा मृदंग भेरी भजन कीर्तन रंगत न्यारी
भक्त गर्जती महाद्वारी, जय जय राम कृष्ण हरी
फेर धरूनी नाचती भक्त, गाती मुखे विठ्ठल नाम
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
अनुपम नगर पंढरपुरी लोटे यात्रा महाभारी
होउनि भक्तीमार्गे प्रचार नाम महिमा वाढे थोर
आषाढी कार्तिकी पंढरपुरी लोटे यात्रा महाभारी
दिंड्या पताका घेऊन हाती विसरती देहभान विठ्ठल गजरी
जय जय रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी
विठ्ठल आत विठ्ठल बाहेरी, तोच व्यापला सर्व चराचरी
नाते गोते विरून जाते, परब्रह्माशी जुळते नाते
सगुणातुनी निर्गुण कळते, निर्गुण सगुणाकडे वळते
ज्ञानेश्वर ज्ञानी थोर, नामदेव भक्त थोर
दोघांची ऊर भेट झाली जेथे, तेच हे पंढरपूर
ज्ञानदेवे अभंग रचिले, नामदेवा ज्ञान झाले
दोघे दिसती वेगळाले, परी ते अंतरी मिळाले
तुमच्या द्वारी आलो देवा, कृपादृष्टी मजवर ठेवा
विसर ना तव कदापि व्हावा, द्यावे दान सदाशिवा
_____________________
१३. अमृत कलश
एकदा पंढरपुरि जाच । सुटेल जन्ममरणाचा जाच ॥ धृ ॥
सावळा विठ्ठल विटेवर उभा
मुखावरती झळके प्रभा
ब्रह्म चैतन्याचा गाभा
दर्शन होता मनास वाटे । अवतरले भूवर वैकुंठ साच ॥ धृ ॥
पुंडलिका भेटी आले परब्रह्म
भक्तासाठी सगुण सुगम
विटेवर कटी कर नटसम
युगे अठ्ठावीस उभा । भक्तांची पुरविण्या हो आस ॥ धृ ॥
गर्जती भक्त महाद्वारी
ध्याउनी मनी ब्रह्मरूप हरी
टाळ वीणा मृदंग भेरी
कोंदले अंबर विठ्ठल गजरी । सर्वत्र पांडुरंग घोष ॥ धृ ॥
विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई
भक्तांची माउली प्रिय विठाई
कृपेची साउली दे मज आई
अनन्य शरण तुज मी विठोबा । तव चरणाची मज नित्य आस ॥ धृ ॥
भीमा आणि चंद्रभागा
तुझ्या चरणीच्या गंगा
स्नाने उध्दरीती जगा
दाटी वारक-यांची होई । आषाढी कार्तिकीच्या समयास ॥ धृ ॥
विठ्ठल चैतन्याची मूस
दर्शने दाटे भक्तिरस
माते प्रेममय तव कूस
कुशीत तव गे दे मज थारा । फेडुनि टाकी सकलही दोष ॥ धृ ॥
माता घेई बाळ कडेवर
रडे पळूनी जाई दूर
लाड पुरवी वारंवार
आशा मनि मी धरुनी आलो । नको लोटू गे मजसी दूर ॥ धृ ॥
मुखे विठ्ठल नामघोष
जळून जाई अवघे किल्मिष
जीवन्मुक्तीचा अमृत कलश
प्राप्त होतसे सद्भक्ताला । तारी तारी सदाशिवास ॥ धृ ॥
_____________________
१४. भेटीची ओढ
भेटीची तव ओढ कुणा सांगू सख्या तुजविण
तळमळतो जीव गड्या जसा मीन पाण्याविण
तू आणि मी एक असुनि विरह कसा नशिबी आला
कळेना काही कसा पडला दैवाचा हा अवचित घाला
उद्भवली ही कुठून माया, स्वस्वरूपा विसरलो मी
अनेक योनी अनेक जन्मी भ्रमता भ्रमता श्रमलो मी
पडलो, रडलो, थकलो, दमलो, झालो बहु कासावीस
भेटीसाठी तुझ्या कष्टलो, लोक करिति मम उपहास
जळतो मी आत आत, भेटीची तव एक आर्त
धाव पाव देई दर्शन, ब्रीद आपुले करी सार्थ
काही तरी पूर्व पुण्य गाठी म्हणुनी येते नाम ओठी
नको आता अंत पाहू, झुरतो निशिदिन तुझ्याच साठी
तुझे स्वरूप सगुण सावळे पाहता भरून येती डोळे
तुझे गुण लीला आठवता येती प्रेमाचे उमाळे
तव गुण संकीर्तन श्रवणे, मम कंठ दाटून येणे
रोमांच शरीरी उभे ठाकणे, हे तर नित्याचे गाऱ्हाणे
तुझा विरह असह्य होता सुटतो शरीरा कंप अवचिता
काया होते स्तंभित मूर्च्छित, भान हरपे वृत्ति गोठता
काय होते, कसे होते, काय सांगू, कसे सांगू
काही तरी विचित्र होते, माथा पाहतसे भंगू
माझ्या अंतरीची व्यथा का न दिसे तुज पंढरिनाथा
दीनांचा दयाळू तुजला म्हणती, सोड बा ही वृत्ति त्रयस्था
धाव धाव पंढरिरावो, तुझा दास फोडित टाहो
देह जावो अथवा राहो, तुझ्या दर्शनाचा लाहो
गेली नववधू सासरी, चित्त गुंतले परि माहेरी
आलो तुज सोडुन संसारी, परि चित्त मुरारी तुझ्याच दारी
गाय जाते चरण्या राना, वत्स पहाता सुटतो पान्हा
तू तर गोकुळीचा कान्हा, भक्ता पाज प्रेम पान्हा
पक्षिणी उडतसे अंबरी, परि चित्त तिचे पिलावरी
हरिणी हिंडतसे कांतारी, परि पाडस न विसरे क्षणभरी
ऐसे तुझे माझे नाते, का विसरलीस बाळा माते
विठू माउली गे येई वेगे, घे मज अपुल्या पदरी माते
जन्मोजन्मी मी तुझाच दास, तुझ्या दर्शनाची आस
आलो तुज दारी आता, सोडीन नच तव चरणास
अगा सख्या पांडुरंगा, तव चरणी चंद्रभागा
आस अंतरीची एक, हरावे मी-तू पण श्रीरंगा
क्षेमालिंगन मजला द्यावे, मिठीत मजला अपुल्या घ््यावे
द्वैतभाव गळून सारा भक्तीत अखंड तुझ्या रमावे
_____________________
१५. संदेश
संदेश पावला देवा, निघालो मी तुझ्याकडे
प्रस्थान ठेविले येथे, घालीन तुज साकडे
नुरली आसही काही, पदी तव धावही घेई
दमलो कष्टलो भारी, पदी तव आसरा देई
नको आता येरझारा जन्म मरणाच्या सख्या
तव पदी मागणे एक, मुक्ति दे रघुनायका
घेईन लोळण पायावरी, आळवीन तुज परोपरी
दूर लोटशिल जरि तू मजला, क्षणहि न होईन परी दुरी
माथा घाशिन तुझिया चरणी, नतमस्तक मी होउन राहिन
क्षणहि न विसंबिन तुझिया चरणा, अनन्य सेवक तुझाच होइन
अनन्य शरण तुला आलो, परतणार मी नाही मागे
तारी अथवा मारी देवा, पदी गुंतले तुझ्याच धागे
शरण तुला जो अनन्यभावे, रक्षण त्याचे जीवे भावे
करावे, ब्रीद तुझे हे देवा तेवढे तरी सांभाळावे
लोटशील जर मजला दूरी, ब्रीद तुझे हे वृथाचि होइल
पतितपावन तुज सज्जन म्हणती, कीर्ति तुझी ही विलया जाइल
हा बघ आलो तुझ्याच दारी, उघड दार आता देवा
अपराध माझे घाल पोटी, गोड करून घेई सेवा
तुझ्या मते मी मुक्तीचा जरी नसेन अधिकारी
काही न अडे मुक्तीवाचुनि, भक्ती मजला देइ तरी
अखंड भक्ती असता साथ नाही भीत जन्म मरणा
सुखे घालावे गर्भवासी, जाण अंतरीच्या खुणा
घडावा साधुसंग सदा, न चुकावी तव भक्ती कदा
येवोत आल्यात जरी आपदा, सोडावे कदा न तव पदा
पुंडलीक वरदा असा वर देई तव भक्ती निरंतर
जन्मोजन्मी तव उपकार कदापि नाही विसरणार
हे पतितपावन रामचंद्रा करूणाकरा दयासमुद्रा
भक्तवत्सला राघवेंद्रा,उध्दर हरूनी मोहनिद्रा
अहा देवा तव दर्शन झाले, अवघे पुण्य फळास आले
नर जन्माचे सार्थक झाले, अंतःकरण मम मोहरले
साठविले तुज मी अंतरी, प्रस्थापिले ह्रन्मंदिरी
तूच एक अंतर्बाह्य चराचरी नि दिगंतरी
अवघे एकरूप झाले, द्वैताचे दुखणे फिटले
मायाब्रह्म वादहि मिटले, ब्रह्म विश्वरूप झाले
असा प्रत्यय आला ज्याला तो ब्रह्मरूपाते मिळाला
जन्ममरणा कोळुन प्याला, सच्चिदानंद स्वयं झाला
_____________________
१६. श्री गणेश स्तुती
जय श्री गणेश गिरिजानंदन गजवदना देवा
दीन दास तव सदाशिवावर कृपादृष्टि ठेवा
उमामहेश्वरनंदन गणपति सुखकारक ईशा
सुरासुरैर्वंदित प्रार्थित तुज प्रणाम परमेशा
महन्मंगला मंगलमूर्ती मंगलकारक तू
विघ््नविनाशक बहुसुखकारक सत्यविनायक तू
कार्यारंभी सकल लोक तव पूजन बा करिती
साभिषेक तुज प्रार्थुनि देवा पुष्पांजलि अर्पिती
सुखकर्ता तू, दुखहर्ता तू, भक्त काम पुरयिता
रक्तपुष्प शमि दुर्वांकुर प्रिय सिंदुरासुर हन्ता
गणाधीश गणनायक गणपती गंगाधर तनया
मूषकवाहन गौरीनंदन विद्याधर मोरया
ब्रह्मणस्पती तू, वेदवंद्या ऋध्दीसिध्दिप्रिया
वक्रतुंड तू, महाकाय तू, सिंदुरासुर विजया
सूर्यकोटीसम प्रकाशक सर्वकार्यी जयप्रदा
भालचंद्रा परशुधरा हे । धूम्रकेतू गजानना
एकदंत तू, विघ््नहारि तू, पार्वतिनंदन परमेशा
लंबोदर तू, शूर्पकर्ण तू, कोटी प्रणाम तुज ईशा
चतुर्भुज शुक्लांबरधारी प्रसन्नमुख शशिवर्णा
अपर्णासुत हस्ती मोदक ब्रह्म सनातन पूर्णा
सिध्दिविनायक चिंतामणि तू, वरदविनायक देवा
ध्याती तुजला भक्त मनी जे लाभे मोक्षाचा ठेवा
बल्लाळेश्वर विघ््नेश्वर तू, लेण्याद्री गिरिजात्मक
मोरेश्वर अन् महागणपती ध्यातो अष्टविनायक
सुमुख कपिल अन् गणाध्यक्ष तू, विकटो गजकर्णकः
अनंत नामे तुजला प्रभु हो, विघ््ननाशो गणाधिपः
देवाधिदेव श्री गणराया अष्टनायिकाधीशा
सर्वविघ््नहर शंकरतनया गणाधिपति परमेशा
सगुण मूर्ती तव अतीव सुंदर, भाळी चंद्रकोर बरवी
रत्नजडित स्वर्णमुकुट शिरी, नेत्री चंद्रप्रभा मिरवी
कंठी माळा मणिमय शोभे, गळा मंदार पुष्पमाला
पायी नूपुर तोडर गर्जती, अनुपम तांडव सोहळा
_____________________
१७. अरे मना
अरे मना असा का भ्रमसी, असा का फिरसी,
जा शरण प्रभूचरणाशी ॥धृ॥
तोच पुरविल तुझी आळ
तोच करील तव सांभाळ
असे तो भक्तांचा लडिवाळ
जो तयाला शरण गेला, उणे न काही त्यासी ॥धृ॥
अढळ पदी ध्रुव बैसविला
सारथी अर्जुनाचा झाला
हनुमंत तो चिरंजीव केला
त्याने ज्याला हाती धरले तो जाय पैलतिरासी ॥धृ॥
तोच तुझा माता पिता
तोच तुजला संकटि त्राता
तोच तव बा रक्षणकर्ता
जनलज्जा बा सारी सोडुनी भज निरंतर रामासी ॥धृ॥
संसारी का व्यर्थची रमतो
विषयकर्दमी फसुनी जातो
मायापाशी पुरा जखडतो
मृगजळ भागवि कधि का वेड्या हरिण तृष्णेसी ॥धृ॥
जग हे सारे आहे नश्वर
एक चिरंतन तो जगदीश्वर
व्यापुनि उरला सर्व चराचर
तुहि त्याचा अंश असुनी का स्वतःला विसरशी ॥धृ॥
घेई निरंतर नाम प्रभूचे
साठवि चित्ती रूप प्रभूचे
अखंड कीर्तन गुण लीलांचे
मनी ध्यानी स्वप्नी तोची, क्षण एक विसंबि न त्यासी ॥धृ॥
भाग्ये हा नरजन्म लाधला
मृत्यु कुणाला कधि ना टळला
नकोस दवडू किमपि क्षणाला
सार्थक अपुल्या जन्माचे करि, आकळ भक्तीने त्या प्रभुसी ॥धृ॥
जन्मा त्याने तुला घातले
धारण पोषण रक्षण केले
कठिण प्रसंगी सांभाळीले
शरणागती संपुर्ण पत्करी तू, राखिल तो स्वब्रीदासी ॥धृ॥
भक्ता त्याने अव्हेरीले
असे ना कधी कोठे घडले
मग तुलाच का बा कोडे पडले
सोडी संशय, करि बा निश्चय, धरी दृढ श्रीरामपदासी ॥धृ॥
_____________________
१८. जिवा शिवाचे ऐक्य
मनाला स्थीर करण्या या भज अहर्निश रघुराया/यदुराया ॥धृ॥
मन हे खट्याळ चंचल भारी
सदा धावे विषयावरी
न राहे स्थिर ते क्षणभरी
आवर त्याला घाली बा रे, करी प्रभुपदी एकाग्र तया ॥धृ॥
मान पान धन संपत्ती
आज आहे, उद्या जाती
नसे कश्याची काही शाश्वती
क्षणिकाच्या या मागे लागुनि का दवडसी नर तनु वाया ॥धृ॥
अनेक राजे आले गेले
नाव न त्यांचे कुठे राहिले
संत महात्मे अमरचि झाले
भक्तिरसायन पिउनी प्राण्या सार्थक करि ही मानव काया ॥धृ॥
जीवन ध्येय भगवत्प्राप्ती
संसारातुनि होई मुक्ती
साधन एकच त्याला भक्ती
फलाशाविरहित कर्मफुलांची माला अर्पी त्या रघुराया ॥धृ॥
सगे सोयरे साथि सुखाचे
नाही दुःखि कुणी कामाचे
नाम मुखाने घेई हरिचे
तोच तुला तारिल संकटि, नामच औषध भवरोग हराया ॥धृ॥
नामापरते साधन नाही
भक्तीविना मार्ग नाही
केल्याविण काही होत नाही
करि तर भक्ती, दृढ धर चित्ती पंढरिराया ॥धृ॥
सदा हरिकथा श्रवण करी
भगवत्लीला कीर्तन करी
वाचे नामस्मरण करी
विठ्ठल पायी सर्वहि वाहुन रंगुन जाई प्रेमरंगि या ॥धृ॥
संशय चित्तीचा तू निरसी
अनन्य भावे भज त्या प्रभुसी
तरीच भवसागर हा तरसी
जिवाशिवाचे ऐक्य साधुनी मिळून जाशी ब्रह्मपदा या ॥धृ॥
_____________________
१९. सुखाचा ठेवा
जगी या सर्व सुखी कोण असे बा आजवरि झाला ॥धृ॥
कुणाला वेड कनकाचे
कुणाला कामिनी जाचे
कुणाला नाहि मुलबाळ
मनी तो झुरतची बसला ॥धृ॥
आज मी मिळविले एक
मिळवीन उद्या मी दुसरे
नव नित्य वाढते तृष्णा
लोभ ना कुणाचा सुटला ॥धृ॥
जिंकले आज मी राज्य
जिंकीन उद्या मी दुसरे
परस्पर वाढली स्पर्धा
इतिहास रक्तमय झाला ॥धृ॥
लोभाने वाढते पाप
ईर्ष्या असुया बळावते
क्रोधाला चढतो जोर
त्वेषही अनावर झाला ॥धृ॥
धडपडे सुखास्तव जीव
लाभेना सुख कोणाला
क्षण एक जरी ते लाभे
दुःखात पुनरपी बुडला ॥धृ॥
सुखदुःखाचा हा लपंडाव
चाले जीवनात सदैव
चिरंतन शाश्वत नाही काही
व्यर्थचि का रे संसारी भ्रमला ॥धृ॥
परब्रह्म ते एकचि शाश्वत
चिरंतन ते एकचि सत्य
जगती सारे क्षणिक अशाश्वत
जीव हा मायावर्ती भ्रमला ॥धृ॥
धरी काही अता सोय
भक्तीमार्गी लावी जीव
भज भज रे तो पंढरीराव
गवसेल सुखाचा ठेवा तुजला ॥धृ॥
_____________________
२०. सुखाचा मूलमंत्र
नको करू धागा दोरा गंडा । घे हरिनाम सुखाचा हंडा ॥धृ॥
हरिनाम सुखाचा मूलमंत्र
चित्तशांतीचे ते तंत्र
त्रिताप हरण्याचे यंत्र
चिंता सारी त्यजूनि बा रे । घेई नाम हरि कृष्ण मुकुंदा ॥धृ॥
चिंता करिता व्यर्थची कष्ट
येणारे न चुके संकष्ट
न मिळता इप्सित होसी रुष्ट
पापाचे मुळ लोभा सोडुनि । नाम जपाच्या घेई छंदा ॥धृ॥
धरूनि फलाशा करिसी कर्म
फळ ना मिळता होसी खिन्न
होता फलप्राप्ती गर्व
कर्तव्य बुध्दिने कर्म करी बा । पडावे न फलाशा फंदा ॥धृ॥
नामापरते साधन नाही
वेचे न पदरीचे काही
नरजन्माचे सार्थक होई
संत महात्मे सांगति सर्व । ध्या मनि राधारमण गोविंदा ॥धृ॥
पाया भागवत धर्माचा
ज्ञानदेवे रचिला साचा
तुकोबांना मान कळसाचा
एकनाथ नामदेव गाती सदा । जय हरि विठ्ठल पुंडलिक वरदा ॥धृ॥
रामदासे रचिला दासबोध
केला त्यांनी मनास बोध
करुणाष्टके त्यांची प्रसिद्ध
सांगती रामदास समर्थ । ध्या मनि रामा सदा सर्वदा ॥धृ॥
ईशप्राप्तिचे अनेक मार्ग
कर्मज्ञान भक्तियोग
भक्तिमार्गाचे अंतरंग
व्हावे नाम स्मरणी दंग । वदा हरहर महादेव सदा ॥धृ॥
ओम् नमो भगवते वासुदेवाय
ओम् नमःशिवाय नमःशिवाय
ओम् नमः सिध्दि विनायकाय
आपआपल्या आवडीनुसार । ध्या मुखि भगवन्नाम सदा ॥धृ॥
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment