मणी - ४
वैवाहिक जीवन व सेवाकाल
विवाहोत्तर काळ आनंदात व मजेत चालला होता. १९४२ च्या ऑगस्ट महिन्यात माझी प्रिय पत्नी सौ. प्रमिलाला दिवस गेल्याची जाणीव मला झाली. सातव्या महिन्यात सुवासिनींना भोजन, वायनदान, डोहाळजेवण आदि सोपस्कार झाले. नागपुरातच बाळंतपण करायचे ठरले. हिची आई वणीहून आली होती. हनुमान जयंतीच्या दिवशी कळा यायला सुरुवात झाली. त्याच दिवशी संध्याकाळी श्रीमती कमलाताई होस्पेटांच्या महाल सुतिकागृहात भरती केले. दुसऱ्या दिवशी चैत्र वद्य द्वितीया, शके १८६५, दि. २१ एप्रिल १९४३ ला रात्री १० वाजून ५० मिनीटांनी ही सुखरूप प्रसूत होऊन पुत्ररत्नाला जन्म देती झाली. बाळाचे वजन ८ पौंड होते. पहिलाच मुलगा झाल्याने आनंदाचे वातावरण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बँडवाल्यांनी आमच्या घरी येऊन बँड वाजविला. महाल सूतिकागृहातही जाऊन बँड वाजविला. बँडच्या निनादाने पुत्रजन्माची वार्ता साऱ्या वेटाळात पसरली. पेढे वाटले गेले. नातलग मंडळी, शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी सूतिकागृहात जाऊन वाळ-बाळंतिणीला भेटून येत. अकराव्या दिवशी बाळ-बाळंतीण सुखरूप घरी आले.
बाराव्या दिवशी थाटामाटाने बारसे केले. पाळण्यात घालून बायांनी 'कुणी गोविंद घ््या, कुणी गोपाळ घ््या' असे म्हणत प्रमोद असे सार्थ नामकरण केले. खरंच सर्वानाच आनंद झाला होता. जवळजवळ ७५ मंडळी जेवली. आमच्या सासूबाई आल्यागेल्यांना मोठ्या अभिमानाने सांगत होत्या, आज लग्नमुंजीसारखाच मोठा सोहळा झाला.
हाच चि. प्रमोद आज पन्नास वर्षांचा झाला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शांतिस्वरूप भटनागर अवॉर्ड प्राप्त झाला आहे. त्याचा Pattern Recognition Transforms हा ग्रंथ इंग्लंडच्या Research Studies Press ने आणि अमेरिकेच्या John Wiley & Sons ने प्रकाशित केला असून त्या द्वारा संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाला आहे. त्याचा सविस्तर वृत्तांत पुढे ओघाने येईलच.
घरी आम्ही दोघेच होतो. आता तिसरा जीव आमच्या सोबतीला आला होता. तान्ह्या बाळाच्या बाललीला पाहण्यात, त्याचे कोडकौतुक करण्यात वेळ कसा निघून जाई ते कळेना. शाळा जवळच असल्याने मधल्या सुटीत मी हटकून घरी येत असे व बाळाचा गोड पापा घेतला की सारा शीण हरपून जात असे. अकराव्या महिन्यात केळीबाग मार्गावरील महालक्ष्मीच्या मंदिरात चि. प्रमोदचे जावळ काढण्यात आले. त्याही प्रसंगी सर्व नातलग मंडळी जेवायला होती. दिवस कसे भराभर निघून जात होते ते कळेना. चि. प्रमोदची मौंज माघ शुद्ध दशमी, दि. २३ फेब्रुवारी १९५३ ला आमच्या वाड्यातच झाली.
चि. गीताचा जन्म ज्येष्ठ वद्य त्रयोदशी, दि. ७ जुलै १९४५ ला वणीला आजोळी झाला. चि. प्रमोदला १९४९ साली आणि चि. गीताला १९५१ साली सी. पी. अॅण्ड बेरार प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात दाखल केले. चि. प्रमोदने पहिल्या व दुसऱ्या वर्गाचे डबल प्रमोशन घेऊन एकदम तिसऱ्या वर्गात प्रवेश घेतला. दोघेही बहीण-भाऊ अतिशय हुशार, बुद्धिमान व अभ्यासू. चि. प्रमोदचा वर्गातून नेहमी प्रथम क्रमांक ठरलेला असायचा. दरवर्षीच्या स्नेहसंमेलनात त्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळे. वक्तृत्व, वादविवाद, निबंधलेखन, गीता आणि दासबोध पाठांतर, सामान्यज्ञान, अंत्याक्षरी स्पर्धा इत्यादीत त्याने प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकाविली. चि. गीताचाही नेहमी वर्गातून प्रथम क्रमांक ठरलेला असायचा. वर उल्लेखिलेल्या सर्व बौद्धिक स्पर्धात, रांगोळी स्पर्धेतही तिला प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाची बक्षिसे मिळत.
चि. विश्रामचा जन्म: वणी येथे माघ शुद्ध दशमी, दि. ८ फेब्रुवारी, १९४९
चि. विजयाचा जन्म: नागपुरला मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. २७ डिसेंबर, १९५१
चि. अरुणचा जन्म: वणी येथे कार्तिक वद्य पंचमी, दि. २५ नोव्हेंबर, १९५३
चि. वृंदाचा जन्म: नागपुर येथे कार्तिक वद्य चतुर्थी, दि. २ डिसेंबर, १९५५
चि. सुधीरचा जन्म: नागपुर येथे सीताबर्डी सुतिकागृहात भाद्रपद शुद्ध चतुर्थी - श्री गणेश चतुर्थी, दि. १४ सप्टेंबर, १९६१, दुपारी २ वाजता
सर्वच मुले बुद्धिमान, हुशार व अभ्यासू होती. सर्वांनाच बौद्धिक स्पर्धात प्रथम वा द्वितीय क्रमांकाची पारितोषिके प्राप्त झाली. चि. वृंदा सोडून सर्वांचे शालेय शिक्षण सी. पी. अॅण्ड बेरार हायस्कूल, महाल, नागपुर येथेच झाले. चि. वृंदाचे प्राथमिक व पूर्वमाध्यमिक शिक्षण श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींच्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षण श्री. दादासाहेब धनवटे नगर विद्यालयात झाले. वर्ग ८ ते ११ तिला हायस्कूल स्कॅालरशिप मिळत होती. तिने इंग्रजी माध्यम घेतले. श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींच्या शाळेत चि. वृंदाचे नाव आदर्श विद्यार्थिनी म्हणून आहे.
सर्व मुलांच्या शैक्षणिक उपलब्धीचा आलेख थोडक्यात खाली एकत्र देत आहे.
चि. प्रमोद - दहावी मॅट्रिकच्या परिक्षेत सर्वप्रथम - १९५८
चि. गीता - दहावी मॅट्रिकच्या परिक्षेत प्रथम श्रेणी - १९६१
चि. विश्राम - दहावी मॅट्रिकच्या परिक्षेत गुणानुक्रमे १६ वा - १९६४
चि. विजया - दहावी मॅट्रिकच्या परिक्षेत प्रथम श्रेणी - १९६७
चि. अरुण - दहावी मॅट्रिकच्या परिक्षेत गुणानुक्रमे १२ वा - १९६९, मराठीत सर्वाधिक गुण - बोर्डाचे १०० रु. चे बक्षिस
चि. वृंदा - अकरावी मॅट्रिकच्या परिक्षेत प्रथम श्रेणी - १९७२
चि. सुधीर - दहावी मॅट्रिकच्या परिक्षेत गुणानुक्रमे २८ वा - १९७७
चि. विश्रामची मौंज वैशाख शुद्ध पंचमी, रविवार दि. २८ एप्रिल १९६३ ला आणि चि. अरुणची मौंज वैशाख शुद्ध षष्ठी, सोमवार दि. २९ एप्रिल १९६३ ला झाली. चि. सुधीरची मौंज वैशाख वद्य दशमी, दि. ४ जून १९७५ ला झाली.
_____________________
मणी - ५
यशोदुंदुभी
वडिलांच्या शेवटच्या आजारपणात ते सुमारे एक वर्ष अंथरुणाला खिळून होते. त्यांची सर्व सेवा शुश्रुषा मी केली. माझे B. Sc. चे वर्ष होते. माझ्या अभ्यासावर विपरित परिणाम होत असल्याचे पाहून त्यांना अतिशय दुःख होत असे.
वडिलांच्या मृत्यूच्या दहाव्या दिवशी पिंडाला कावळा स्पर्श करीना. 'मी आपले सर्व शिक्षण पूर्ण करीन' असे मी बोललो आणि कावळ्याने पिंडाला स्पर्श केला. ती टोचणी सारखी मनाला होती, ते वचन मला पूर्ण करायचे होते. मुले लहान होती तोपर्यंत अभ्यास करून परिक्षेला बसणे शक्य झाले नाही. वडिलांच्या मृत्यूमुळे B. Sc. अंतिम परिक्षेला बसू शकलो नव्हतो. प्रॅक्टिकल वगैरेच्या भानगडीमुळे B. Sc. ला बसणे शक्य नव्हते. म्हणून मी मराठी, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन १९५४ च्या B. A. परीक्षेला खाजगी रीत्या बसलो व उत्तीर्ण झालो. १९५६ मध्ये मराठीत M. A. झालो. १९५४ पर्यंत मी मिडलस्कूल शिक्षक होतो. तरीपण नवव्या वर्गाला गणित व सायन्स विषय शिकवीत होतो. १९५४ पासून मी हायस्कूल शिक्षक झालो. स्वर्गीय वडिलांना दहाव्या दिवशी दिलेले वचन परिस्थितीवश, उशिरा का होईना, पण मी पूर्ण केले, याचे मला सानंद समाधान झाले.
C. P. & Berar High School मध्ये बौद्धिक स्पर्धांचे खाते माझ्याकडे होते. शाळेत विविध स्पर्धा होत. तसेच इतरही आंतरशालेय स्पर्धा होत. गीता मंदिरातर्फे गीता पाठांतर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीतेवरील प्रश्न प्रतियोगिता, भोसला वेदशास्त्र महाविद्यालयातर्फे गीता व दासबोध पाठांतर स्पर्धा, नागपुर महानगर पालिकेतर्फे शिरोळे वक्तृत्व स्पर्धा, ट्रेनिंग कॅालेजतर्फे नाट्यप्रवेश स्पर्धा व शिक्षकंाची वक्तृत्व स्पर्धा ह्या दरवर्षी होत असत. मी विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून घेत असे व त्यांना या स्पर्धात भाग घेण्यास उद्युक्त करीत असे. शाळेला अनेक चषक, ढाली. रथ व विद्यार्थ्यांना अनेक वैयक्तिक पारितोषिके प्राप्त होत असत. शाळेला इतकी विजयचिन्हे मिळाली की ती ठेवायला जागा अपुरी पडू लागली.
शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांकडून नाट्यप्रवेश बसवून घेऊन ते मी सादर केले आहेत. काही वेळेस पूर्ण नाटके बसवून ती सादर केली आहेत. उदा:- श्री. रांगणेकरांचे 'कुलवधू', श्री. वि. भि. कोलत्यांचे 'सोडचिठ्ठी' इत्यादि. या नाटकंाची सर्वतोमुखी प्रशंसा झाली. गडक-यांच्या नाटकातील तळीरामचा प्रवेश, गोकुळचा प्रवेश, संभाजी व औरंगजेबाचा प्रवेश इत्यादि प्रवेशही उत्तम वठले. मधुकर पारळकर, सोहनी, गुंडे, चिपलकट्टी, पाचपोर प्रभृती विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भूमिका वठविल्या.
१९५० च्या स्नेहसंमेलनात मी स्वतः लिहिलेले 'सर्वपक्षीय महिला परिषदेचे अखिल भारतीय अधिवेशन' रंगमंचावर सादर केले होते. ते सर्व विद्यार्थिनींकडून वठवून घेतले होते. त्यात १-काँग्रेस, २-हिंदु महासभा, ३-वुमेन्स सोशालिस्ट पार्टी, ४-अखिल भारतीय प्रौढ कुमारिका संघ, ५-विवाहित स्त्री संघ, ६-वुमेन्स फॅारवर्ड ब्लॉक, ७-राष्ट्रीय स्त्री स्वयंसेविका संघ, ८-पुरुष विरोधी युद्ध मंडळ, ९-मांजर सेना, १०-स्नेह संवर्धक महिला मंडळ, ११-हिंदी युवती संघ, १२-आर्यसंस्कृती रक्षक भगिनी समाज, अशा बारा विविध पक्षांच्या पुढाऱ्यांची भाषणे झाली. हा कार्यक्रम खूपच रंगला व प्रेक्षकंाची दाद मिळवून गेला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भाचे थोर पुढारी व विख्यात नाटककार वीर वामनराव जोशी होते.
आणखी एका वर्षीच्या स्नेहसंमेलनात अध्यक्षांच्या समोर 'या सभेच्या मते स्त्रियांना हल्ली देण्यात येणारे शिक्षण समाज विघातक आहे' या ठरावावर विद्यार्थिनींकडून वठवून घेतलेल्या अनुकुल व प्रतिकूल भाषणांचा वादविवादात्मक कार्यक्रम मंचावर सादर करण्यात आला. हा कार्यक्रमही बराच गाजला. एका वर्षीच्या स्नेहसंमेलनात अविनाश विष्णूपंत बढे ह्या एका हुशार व सभाधीट विद्यार्थ्याला मी एक इंग्रजी भाषण लिहून दिले आणि ते त्याच्याकडून विवक्षित स्थानी आघातासह आणि यथायोग्य हावभावासह वठवून घेतले. ते त्याने पँट, शर्ट, जाकिट, कोट, नेक टाय, मोजे, बूट, हॅट अशा नखशिखांत इंग्रजी पोशाखात मोठया परिणामकारक पद्धतीने श्रोत्यांसमोर सादर केले. ते 'शन'युक्त शानदार भाषण श्रोत्यांच्या श्रवणेंद्रियांना सुखावून गेले. प्रेक्षकंाच्या चक्षूंचेही खास आकर्षण ठरले. ते भाषण जसेच्या तसे येथे उद्धृत करणे अनाठायी होणार नाही.
President, Ladies and Gentlemen!
I need not mention, that gathering is a social function when all meet like the trains at a railway junction. But I must mention and you must sanction, that the success of this function, depends on combined action. It is my conviction, to which you would raise no objection, that the cooperation is the key to the success of this function. We all worked with cooperation, and so I have no hesitation, in saying that you will get perfect satisfaction, at the sight of this successful function. I must here mention, that there was a very small amount in our possession, but our zeal and vigour made the whole compensation. It is my humble suggestion, that with brotherly relation, you should help us on every occasion.
I must mention, my heartfelt congratulation, to the gathering committee on the selection, of a worthy president for today's function.
His love for the nation, is deep like ocean. Service of the nation, in a selfless fashion, has acquired for him a great reputation. He occupies a high position, among the devotees of the nation. We request that with fatherly affection, he will give his benediction, to this institution, which is helping the noble cause of dissemination of education.
We again express our deep satisfaction, at the acceptance of our invitation, by today's president, and finish my oration.
कविता करण्याचा छंद मला लहानपणापासूनच आहे. पहिली कविता मी १९३० साली म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी रचली. माझी बहीण चि. सौ. दुर्गा हिला तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या भाउबीजेला मी ती ओवाळणीत दिली. त्या कवितेचे वैशिष्ट्य असे की तिच्या प्रत्येक ओळीतील आद्याक्षरे यथाक्रम वाचली तर 'पातिव्रत्य हेच स्त्रियांचे जीवन' हे वाक्य तयार होते. ती कविता अशी:
पाळिता सासूसासऱ्यांच्या आज्ञा
तिळमात्रही खेद न वाटो मना
व्रते असती सर्व व्यर्थ जाणा
त्यजिल्या न ती दुरिच्छा ।।१।।
हेमालंकार काय कामाचे
चमके न सच्छील जियेचे
स्त्रियांचे कर्तृत्व साचे
यांमध्येच असे ।।२।।
चेपलेल्यांना वर उचलावे
जीवनी चैतन्य भरावे
वर्तन पवित्र, शुद्ध असावे
नसावा अहंकार अंगी ।।३।।
रामनवमी, जन्माष्टमी, आषाढी व कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री. श्रावण सोमवार हे उपवास मी, माझी मौंज वयाच्या आठव्या वर्षी इ. स. १९२३ साली चैत्रमासात संपन्न झाली, तेव्हापासूनच करीत आलो आहे. श्रीधरस्वामी विरचित श्रीरामविजय, श्रीहरिविजय, महिपती विरचित भक्तिविजय या ग्रंथांची कितीतरी पारायणे मी पंचविशीच्या आतच केली आहेत. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व दासबोध हे ग्रंथही वाचले आहेत. ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवतापेक्षा दासबोध ज्यास्त वेळा वाचला आहे.
मी रचलेली दुसरी कविता 'वरदान'. ती खाली देत आहे.
देई मज वरदान । रघुवरा देई मज वरदान ।।धृ।।
तुझेचि कीर्तन सदा ऐकु दे । माझे दोनहि कान । रघुवरा ।।धृ।।
जिव्हा माझी सदा करू दे । अखंड तव गुणगान । रघुवरा ।।धृ।।
तुझे नाम मज मुखी येऊ दे । सुचो न काहीहि आन । रघुवरा ।।धृ।।
हातचि माझे सदा करू दे । त्वत्पदसेवा जाण । रघुवरा ।।धृ।।
पायचि माझे सदा फिरू दे । करण्या तीर्थस्नान । रघुवरा ।।धृ।।
नासिक माझे सदा करू दे । त्वत्पदकमलाघ्राण । रघुवरा ।।धृ।।
मम हे मानस सदा होउ दे । तुझिया पदि रममाण । रघुवरा ।।धृ।।
दर्शन तुझे सदा घडू दे । नेत्रा माझ्या जाण । रघुवरा ।।धृ।।
मस्तक माझे सदा नमू दे । तुझिया पुढती जाण । रघुवरा ।।धृ।।
अर्चन वंदन तुझेचि रामा । दास्यही निर्व्यवधान । रघुवरा ।।धृ।।
तुझिया सख्यासाठी देवा । वेचिन अपुले प्राण । रघुवरा ।।धृ।।
तुजवाचुनि मी नसे निराळा । होऊ दे हे ज्ञान । रघुवरा ।।धृ।।
ज्योतीमध्ये ज्योति मिळू दे । नुरो कधीही आन । रघुवरा ।।धृ।।
जिवाशिवाचे ऐक्य होउ दे । भक्ति करुणा जाण । रघुवरा ।।धृ।।
आलो तुजला शरण अता रे । न करी लव अनमान । रघुवरा ।।धृ।।
डॉ. विक्रम पत्तरकिने यांच्या मौंजेची व लग्नाची मंगलाष्टके, श्री. अण्णासाहेब गोखले यांच्या मुलीच्या लग्नाची व नातवाच्या मौंजेची मंगलाष्टके, श्री. माधवराव उज्जनकर यांच्या मुलीच्या लग्नाची, श्री. दिनकरराव पांडे यांच्या व त्यांच्या मुलांच्या लग्नाची मंगलाष्टके, श्री. शंकर शिवराम जोशी यांच्या मुलीच्या लग्नाची मंगलाष्टके, श्री. माधव हरि पत्तरकिने व त्यांची कन्या चि. चारुशीला हिच्या लग्नाची मंगलाष्टके मीच रचली. चि. श्याम देशपांडे याच्या मुलाच्या मौंजेची मंगलाष्टके मीच रचली.
मी केलेली काही साहित्य निर्मिती खाली देत आहे.:
१ - श्री गणपती, सरस्वती, श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव व जगदंबा यांच्या स्तुतिपर भक्तिकाव्ये
२ - श्री साईबाबांची आरती
३ - अष्टविनायक गीत
४ - C. P. & Berar Education Society चे रजत महोत्सव गीत आणि सुवर्ण महोत्सव गीत
५ - गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या संगमावरील काव्य, पायातळची जमीन, पोर्णिमा, लोकमान्य टिळकांच्या जन्मशताब्दिप्रसंगी रचलेले काव्य, संक्रांतीचा सुदिन, इत्यादि अनेक स्फुट काव्य रचना
६ - श्री. रघुनाथराव पत्तरकिने यांच्या अमृत महोत्सवाप्रीत्यर्थ रचलेले गीत
७ - श्री. हरिभाउ पत्तरकिने यांच्या षष्ट्यब्दिपूर्ति आणि अमृत महोत्सव प्रसंगी रचलेली काव्ये
८ - श्री. चिंतामणराव देव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त गीत
९ - स्वर्गीय सौ. यशोदा धर्माधिकारी यांच्यावरील मृत्युकाव्य
१० - स्व. ती. नानाजींच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली
११ - ती. सौ. आईच्या ६० व्या स्मृतिदिनानिमित्त गीतात्मक श्रद्धांसुमनांजली
१२ - स्व. मामा कमाविसदार यांचे अल्पचरित्र त्यांच्या अमृतमहोत्सव प्रसंगी
१३ - चि. प्रमोदला शांतिस्वरूप भटनागर अवॉर्ड तत्कालीन पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांच्या शुभहस्ते दिल्लीच्या विज्ञान भवनात १९८८ साली प्रदान करण्यात आला, तत्प्रित्यर्थ रचलेली मराठी व इंग्रजी काव्ये
१४ - माझा डॉ. के. रा. जोशींच्या अध्यक्षतेखाली दि. २ ऑगस्ट १९९० ला प्रसिद्ध झालेला 'अमृतकलश' नामक भक्तिगीत संग्रह
१५ - चि. सुधीरला I. I. T. Bombay कडून Ph. D. मिळाली, तत्प्रीत्यर्थ अभिनंदनपर गीत
१६ - चि. प्रमोदचा ग्रंथ इंग्लंड, अमेरिकेत व तद्वारा साऱ्या जगभर त्याच्या पन्नासाव्या वर्षात प्रसिद्ध झाला, तत्प्रीत्यर्थ अभिनंदनपर गीत
१७ - C. P. & Berar High School च्या रजत महोत्सव पुस्तिकेत प्रसिद्ध झालेली 'माझे बाबा' ही लघुकथा
१८ - स्व. भाउसाहेब देशपांडे (कामठी) यांना श्रद्धांजली, २१ ऑक्टोबर, १९९२
१९ - 'चंदाराणी' आणि 'Elephant and Company' ह्या नाटिका
२० - 'वाचनाचे महत्त्व' आणि अनेक निबंध
२१ - पशुपतिनाथ प्रवास वर्णन
२२ - द्वारका प्रवास वर्णन
२३ - अष्टविनायक प्रवास वर्णन
२४ - ऑल इंडिया रेडिओ वरून ध्वनिक्षेपित झालेले 'निबंध कसा लिहावा' हे भाषण
२५ - ऑल इंडिया रेडिओ, नागपुर वरून ध्वनिक्षेपित झालेली सौ. अनुराधा जोशी यांनी घेतलेली मुलाखत 'एक कुशल अध्यापक', (१९९०)
२६ - स्व. ती. नानाजींच्या ६० व्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजलीपर गीतरचना, (१९९५)
२७ - आमची ज्येष्ठ स्नुषा सौ. मंदाकिनी हिच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गीत, (१९९४)
अध्यापन कार्यात मी आपला जीव ओतला. ते द्रव्यार्जनाचे साधन तर होतेच, पण त्याचा मी धंदा बनविला नाही. ते मी एक पवित्र कार्य समजत असे. एक दोन अपवादात्मक वर्षे वगळता मी विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतल्या नाहीत किंवा शिकवणी वर्गही काढले नाहीत. उलट मी विद्यार्थ्यांना सांगत असे की मी वर्गात शिकवतो तिकडे लक्ष द्या. दुसऱ्या दिवशी वर्गात होणारा पाठ आदल्या दिवशी घरून वाचून या, व घरी गेल्यावर त्याच दिवशी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची उजळणी करा, म्हणजे तुम्ही केव्हाही परीक्षेसाठी तयार राहाल. परीक्षेची भीती तुम्हाला वाटणार नाही. विद्यार्थी शिकवणी वर्ग सुरू करा म्हणून आग्रह करायचे, पण मी त्यांना म्हणायचा की 'शिकवणीची गरज नाही, कशाला पालकंाचे पैसे व्यर्थ घालवता?'. काही कारणवशात् अभ्यासक्रम अपूर्ण राहिला तर शाळेच्या वेळानंतर किंवा सुटीच्या दिवशी मुलांना बोलावून जादा वर्ग घेत असे व अभ्यासक्रम पूर्ण करीत असे. मी माझ्या अध्यापन कार्यात सदैव प्रामाणिक राहिलो. एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊनच मी अध्यापकाचा पेशा पत्करला होता, आणि माझ्या सेवाकालात मी त्याच्याशी इमान राखूनच तो पार पाडला.
वक्तृत्व, वादविवाद, निबंधलेखन, पाठांतर, संवाद, नाट्य इत्यादि अभ्यासेतर कार्यक्रमातही मी बराच रस घेतला. वरील बाबतीत मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मदत केली. भाषण कसे करावे, निबंध कसा लिहावा, वादविवादात विरुद्ध पक्षाचे मुद्दे कसे हिरीरीने खोडून काढावे, हे त्यांना सोदाहरण समजावून सांगितले. शाळेच्या वेळाव्यतिरिक्त बराच वेळ खर्च करून मी नाट्य संवादाच्या व नाटकाच्या तालमी घेतल्या आहेत. पडद्याआडून prompting स्वत: केले आहे. नाटकाचे पडदे लावण्यापासून ते ओढण्यापर्यंत सर्व कामे मी स्वतः केली आहेत. नाटकाच्या साहित्याची जमवाजमव व मांडणी मी केली आहे. मधल्या सुटीत, शाळेच्या वेळानंतर, आणि गरज भासल्यास रात्री सुद्धा नाटकाच्या तालमी मी घेतल्या आहेत. त्याचे पुरेपूर मापही माझ्या पदरात पडले आहे. ज्या स्पर्धांसाठी मुलांना पाठविले तेथे त्यांनी क्रमांक पटकावून पालकंाना आनंदित केले आणि शाळेला चषक वा ढाल मिळवून देऊन शाळेचा गौरव वाढविला आहे.
विद्यार्थ्यांच्या मनात माझ्या विषयी आदराची व आपुलकीची भावना निर्माण झाली. काही विद्यार्थी घरी येऊन अभ्यासातील आपल्या अडचणी विचारीत व मी त्यांची सोडवणूक अगत्याने करीत असे. काही विद्यार्थ्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. ते दसऱ्याच्या दिवशी सोने द्यायला अगत्याने येत. मला सेवानिवृत्त होऊन २० वर्षे लोटली. तरी अजूनही माझा माजी विद्यार्थी सडकेवर जरी भेटला तरी मला वाकून नमस्कार करून आपला आदर व्यक्त करतो. मीही त्याची विचारपूस करतो. तो सध्या कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याच्या कार्यालयात मी काही कामानिमित्त गेलो असता तो आपली खुर्ची सोडून मला नमस्कार करतो. तो त्या कार्यालयात असेल याची मला पूर्वकल्पनाही नसते. मीही मग एवढ्या उच्चपदावर पोचल्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो व स्वत चा आनंद प्रकट करतो. 'शिष्यात् इच्छेत् पराजयम्' असे त्याला म्हणतो. तोही म्हणतो 'सर, आज मी जो काही आहो तो तुमच्या आशिर्वादामुळे, कृपेमुळे, मार्गदर्शनामुळे'. त्याच्या या उद्गाराने मी धन्यता पावतो. हीच माझ्या जीवनाची कमाई.
अशी कितीतरी उदाहरणे मला विद्यार्थ्यांच्या नावानिशी सांगता येतील. पण विस्तारभयास्तव मी कोणाचाही नामनिर्देश करीत नाही.
_____________________
मणी - ६
प्रमोद मॅट्रिकच्या परीक्षेत सर्वप्रथम
माझे लग्न १९४१ साली झाले. दुसऱ्याच वर्षी ९ ऑगस्ट पासून ऑगस्ट क्रांतीची 'चले जाव' चळवळ सुरु झाली. भारतभर सारे नेते पकडले गेले. त्याच दिवशी माझ्या पत्नीला दिवस गेल्याची सुखद चाहूल मला लागली. मी तिला विनोदाने म्हणालो देखील, तुझ्या उदरी बडा क्रंातीवीर जन्माला येणार असे दिसते. ती नुसतीच हसली. 'मौनं संमतिलक्षणम्' असे म्हणतात. पण तिच्या बाबतीत 'स्मितं
संमतिलक्षणम्'. असो.
भाकित यथार्थ ठरले. आज आमचा प्रमोद जागतिक कीर्तीचा वैज्ञानिक होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्याने खरोखरीच आमच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. बालपणात 'आई-वडिलांच्या मृत्यूने परीक्षा गमावलेला, हादरलेला, उदास, उद्वीग्न झालेला मी - आज जेव्हा मी माझ्या सर्वच मुलामुलींनी विद्येच्या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केलेली पाहतो, तेव्हा आपण स्वप्नात तर नाहीना, असे वाटायला लागते.
B. Sc. च्या ऐन परीक्षेच्या वेळी माझे वडील वारले आणि माझ्या शैक्षणिक प्रगतीला खीळ बसली. कधीकधी आजारी पडलो तर आपल्या मुलांच्या बाबतीतही असे तर घडणार नाही ना अशी अभद्र कल्पना मनाला चाटून जायची. पण तसे काही घडले नाही. आतापर्यत सर्व सुरळीत झाले.
माझ्या वडिलांच्याही माझ्या शिक्षणाच्या बाबतीत माझी बुद्धिमत्ता व हुशारी पाहून उच्च अपेक्षा होत्या. पण त्यांच्या मृत्यूने त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. माझ्याही आशा-आकंाक्षावर विरजण पडले. माझ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आज मुलांनी संपादिलेल्या उज्ज्वल यशाने परिपूर्ण झाल्या आहेत. माझे मावस भाऊ श्री. तात्याजी पुराणिक तर मला म्हणतात, 'तू तर विद्वान मुलांची एक बटालियनच्या बटालियनच उभी केली आहेस'.
दिवसामागून दिवस चालले होते. आद्य शंकराचार्यांनी चर्पटपंजरिका स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे:
दिनमपि रजनी सायंप्रातः
शिशिर वसंतौ पुनरायाताः
कालःक्रीडति गच्छत्यायुः
असे कालचक्र अव्याहत सुरू होते.
१९५८ साल उजाडले. आमचे मुख्याध्यापक श्री. अण्णासाहेब गोखले यांच्याही प्रमोदबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. प्रमोद मोहरीर बोर्डातून पहिला येणार असे तेही म्हणू लागले. अखेरीस तो दीर्घप्रतीक्षित दिवस उजाडला. वर्तमानपत्रे विकणारी पोरे पहाटे 'C. P. & Berar चा प्रमोद मोहरीर बोर्डातून सर्वप्रथम' असे ओरडत जाऊ लागली. आमची ती रात्र अतीव उत्कंठावस्थेत गेली होती. आम्ही सर्व मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रे विकत घेतली. आमचा दोघांचाही आनंद गगनात मावेना. गीता, विश्राम, विजया, अरुण, वृंदा सर्वच मोठ्या आनंदात होते. प्रमोदलाही मनातून खूप आनंद झाला असेल, पण तो वर उसळताना दिसत नव्हता. तो जरा गंभीर प्रवृत्तीचाच!
गीता ७वी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. विश्राम प्राथमिक चौथीच्या परीक्षेत नागपुर विभागातील सर्व शाळांतून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. विजया प्राथमिक पहिल्या वर्गाची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. अरुण व वृंदा तर अजून शाळेतही जाऊ लागले नव्हते. पण तेही आनंदाने नाचू लागले. आतापावेतो अकरावी मॅट्रिक असे. १९५८ ची बॅच ही दहावी मॅट्रिकची पहिलीच बॅच होती. चि. प्रमोद हा आमचा पहिलाच मुलगा होता. दहावीच्या पहिल्या बॅचला तो बोर्डातून पहिला आला होता. त्याने पहिल्या क्रमांकाची हॅटट्रिक साधली होती.
काही वृत्तपत्रांचे प्रतिनिधी घरी येऊन गेले. त्यांनी प्रमोदची व आमचीही मुलाखत घेतली. प्रमोदचा फोटोही घेतला. प्रमोदचा फोटो आणि त्याखाली 'The boy aspires to be a scientist', 'प्रमोद मोहरीर वैज्ञानिक होणार' असे वृत्त साऱ्या वृत्तपत्रातून ठळक अक्षरात झळकले. आज ते भाकित अक्षरशः खरे ठरले आहे.
त्या दिवशी आमच्या घरी यात्राच भरली होती. C. P. & Berar Education Society चे कार्यवाह, मुख्याध्यापक, सारे शिक्षक प्रमोदचे त्याच्या उज्ज्वल यशाप्रीत्यर्थ हार्दिक अभिनंदन करायला आले. शेजारच्या सिटी कॅालेज आणि नीलसिटी हायस्कूल मधील आमच्या परिचयाचे प्राध्यापक-अध्यापक अभिनंदन करून गेले. प्रमोदचे मित्र आणि वर्गबंधू यांची तर रीघच लागली होती. वेटाळातले लोक कौतुक बघायला आले. आमचे नातलग आणि परिचयाचे लोक हे एकामागून एक येत होते. शाळेतही अभिनंदनकर्त्यांची रांगच लागली होती. श्री. टामणे हे माझे नीलसिटी हायस्कूल मधील विज्ञानाचे शिक्षक होते. ते अभिनंदन करायला आमच्या शाळेत आले आणि श्री. अण्णासाहेब गोखल्यांना म्हणाले, 'प्रमोदचे वडील माझे विद्यार्थी होते. तेच मॅट्रिकला पहिले येणार अशी आमची अपेक्षा होती. आज त्यांचा मुलगा पहिला आला, यातच मला विशेष आनंद आहे.'. त्या दिवशी आम्हाला जेवण करायलाही फुरसत मिळाली नाही. आम्हाला जेवायला दुपारचे तीन वाजले. १०-१२ किलो पेढे वाटण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकंानीही आमच्या घरी पेढ्याचा डबा आणून दिला. परगावच्या परिचितांच्या अभिनंदनपर तारा-पत्रांची आवक ८-१० दिवस सुरू होती. हा आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस होय असे म्हणण्यास हरकत नाही.
कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी C. P. & Berar High School ने प्रमोदचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. C. P. & Berar Education Society चे अध्यक्ष अधिवक्ता अ. वि. खरे, राजकारणे, श्रीमंत गुजर, श्री. तात्याजी फडणवीस आदि सर्व सभासद, अखिल अध्यापक वर्ग, नागपुरातील निरनिराळ्या शाळांचे मुख्याध्यापक समारंभाला उपस्थित होते. श्री. के. टी. मंगळमूर्ती हे समारंभाचे अध्यक्ष होते. आमची प्रमुख नातलग मंडळी समारंभाला उपस्थित होती. प्रमोद N. C. C. Airwing चा कॅडेट होता. प्रमोदची आदर्श कॅडेट म्हणून निवड झाली होती. N. C. C. च्या गणवेशातील प्रमोदच्या फोटोचे त्याप्रसंगी उद्घाटन झाले. प्रमोदचा आणि आम्हा माता-पित्यांचाही हार घालून सत्कार कण्यात आला. शाळेचे सुपरिंटेंडेंट श्री. गं. स. गोखले यांनी प्रमोदला त्याचा गुणगौरव करणारे अभिनंदन पत्र देऊन सन्मानित केले. समारंभाचे अध्यक्ष श्री. मंगळमूर्ती यांच्या हस्ते प्रमोदला एक बायसिकल भेट देण्यात आली. या प्रसंगी श्री. अण्णासाहेब गोखले यांचे भाषण मोठे मार्मिक झाले. श्री. तात्याजी फडणवीस यांनी 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' म्हणून माझे हार्दिक अभिनंदन केले. प्रमोदचा फोटो आजही शाळेच्या दिवाणखान्यात विराजमान आहे.
त्याच दिवशी रात्री ८ वाजता पाताळेश्वर मार्ग शारदोत्सव मंडळाने देखील प्रमोदचा गौरवपूर्ण सत्कार केला. डॉ. दामले यांचे सुरेख भाषण झाले. त्यानंतर एके दिवशी आम्ही शाळेच्या सर्व अध्यापकंाना आपल्या घरी उपहाराकरिता निमंत्रित केले होते.
प्रमोदने नागपुरच्या शासकीय विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे विषय त्याने घेतले होते. त्याला Government of India Merit Scholarship for post-matriculation studies ही त्याच वर्षापासून सुरू झालेली दरमहा १०० रु. ची शिष्यवृत्ती मिळाली. तो M. Sc. होईपर्यत ती चालू होती. प्रमोदने १९५९ साली Pre-university, १९६० साली B. Sc. Part I, आणि १९६२ साली B. Sc. ह्या सर्व परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या.
प्रमोद विज्ञान महाविद्यालयात B. Sc. Part I ला असतांना १९५९ साली पुण्याच्या वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने महादेव गोविंद रानडे आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा नागपुरच्या धनवटे रंग मंदिरात आयोजित करण्यात आली होती. 'या सभेच्या मते सांसदीय लोकशाही पद्धतीत प्रत्यक्ष प्रतिकार विहित आहे' असा चर्चेचा विषय होता. प्रमोद विषयाच्या बाजूने बोलला. सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरले होते. प्रमोदच्या भाषणात टाळ्या वाजवून श्रोत्यांनी अनेकदा प्रतिसाद दिला. परीक्षकंानी प्रमोदचा पहिला क्रमांक घोषित केला. त्याला १०० रु. चे वैयक्तिक पारितोषिक आणि विज्ञान महाविद्यालयाला फिरता चषक मिळाला.
'दासबोधातील प्रतिपाद्य विषय' या विषयावरील आंतरमहाविद्यालयीन निबंधस्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकही प्रमोदला मिळाले.
M. Sc. ला असतांना प्रमोदने भौतिकशास्त्र हा विषय घेतला होता. Electronics मध्ये तो Specialization करणार होता. M. Sc. ला असतांना एक परिसंवादात त्याचे भाषण झाले. तेथेही त्याला प्रथम क्रमांकाच्या
पारितोषिकादाखल १५० रु. ची पुस्तके मिळाली. नागपुर विद्यापिठाच्या १९६४ च्या M. Sc. (Physics) परिक्षेत तो गुणानुक्रमे तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
प्रमोद M. Tech. करण्याकरिता I. I. T. मुंबईत जाणार होता. त्याने एक दिवस भालेराव, भालचंद्र, देशपांडे, सहस्रबुद्धे, जाजू इत्यादि आपल्या मित्रांना घरी फराळाला बोलावले. आमचाही त्यांच्याशी परिचय झाला. आज ते सर्वजण निरनिराळ्या ठिकाणी मोठ्या पदावर आहेत.
आता आपण काही काळ प्रमोदला बाजूला सारून इतर मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगतीकडे वळू या.
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment