अमृत कलश
अर्पण पत्रिका
माझे परम पूजनीय मातापिता
तीर्थरुप स्व. सौ. राधाबाई मोहरीर (आई)
आणि
तीर्थरुप स्व. मोरेश्वर मार्तंड मोहरीर (नानाजी)
ज्यांनी मला घडविले, मढविले, वाढविले, पढविले,
त्यांच्या प्रेमळ पावन स्मृतीस
सादर समर्पण
_____________________
प्रकाशकाचे मनोगत
खरे म्हणजे मी या संग्रहाचा प्रकाशक नाही. फार तर प्रकाशनात ३-४ वर्षे उशीर करणारा 'विलंबक'. बाबांची कविता, त्याला बेबीची प्रस्तावना, आणि त्यावर माझ्यासारखा 'बाब्या' आणखी काय लिहिणार?
अमृत कलश हस्तलिखित स्वरूपात ५-६ वर्षांपूर्वीच बाबांच्या एका जन्मदिवशी प्रकाशात आला. आता जे हाती येत आहे ते त्याच हस्तलिखिताचे गणकयंत्राच्या मदतीने केलेले मुद्रण.
मी मुळात भाविक नाही. पूजा करावी, स्तोत्र म्हणावे, स्वतःहून देवळात जावे, बसमधून जाताना वाटेत देऊळ पडले की बसमधूनच नमस्कार करावा असे मनापासून वाटत नाही. पण तरीही बाबांची 'शिवोऽहं' किंवा 'उदो हो भवानी' वाचतांना व पहिल्यांदा ती गणकयंत्रावर टाईप करतांना रोमांच उभे राहिले. खरोखरच. वृत्तबध्दता, शब्दांची अचूक निवड, मुग्ध करणारा भाषेचा व विचारांचा ओघ असाधारण आहे. एकंदरीतच त्यात असे काही रसायन आहे की मी बरेचदा मोठ्याने म्हणत कविता टाईप केल्या.
बाबांना साधलेले हे रसायन म्हणजेच अमृत. रूक्षतेत महावृक्ष जोपासण्याचे सामर्थ्य बाळगणारा हा अमृत कलश आईबाबांच्या असंख्य चाहत्यांना भेट देताना आम्हा सर्व मुलाबाळांचा गळा दाटून आल्यास नवल ते काय?
अरुण सदाशिव मोहरीर
२५-११-१९९६
_____________________
मनोगत
प्रस्तुत काव्याने ह्या वृध्दावस्थेत मला बराच धीर व दिलासा दिला. आंतरिक समाधानही लाभले. माणूस प्रसिद्धीच्या झोतात आला की त्याच्या मनाचे व बुध्दीचे पोत बिघडण्याचा संभव असतो, म्हणून हे काव्य मुद्रित करुन प्रकाशित करण्याचे टाळले.
माझा ७५वा वाढदिवस तिथीनुसार गुरुवार, श्रावण शुक्ल एकादशी, शके १९१२ (दि. २ ऑगस्ट १९९०) ला आमचे घरी साजरा करण्यात आला. या प्रसंगी माझे अनेक नातलग, मित्र, चाहते आणि सुह्रद उपस्थित होते. विद्वद्वर्य प्राध्यापक डाॅ. के. रा. जोशी, सेवानिवृत्त संस्कृत विभाग प्रमुख, स्नातकोत्तर शिक्षण विभाग, नागपुर विद्यापीठ, हे अमृत महोत्सव समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्याच हस्ते हस्तलिखित 'अमृत कलश' चे झाकण उघडण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी सादर केलेला लेखी अभिप्राय असा:
"माझे ज्येष्ठ सन्मित्र श्री. सदाशिव मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब मोहरीर यांनी सिद्ध केलेला 'अमृत कलश' त्यांच्या आजच्या पंचाहत्तराव्या वर्धापन मंगल दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व संबंधितांना सादर करण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. यातील भक्तिगीते भावनेच्या ओलाव्याने ओथंबलेली असून श्री. सदाशिवरावांच्या अमृतमधुर इश्वरनिष्ठ अंतःकरणाची साक्ष सदैव देत राहतील."
आज सहा वर्षानंतर लोकाग्रहास्तव 'अमृत कलश' पुस्तकरूपाने प्रकाशित होण्याचा योग जुळून येत आहे. त्याला माझी ज्येष्ठ कन्या प्रा. सौ. संगीता मुकुंदराव पाटखेडकर, एम. ए., साहित्य पारंगत, यांची प्रस्तावना लाभली आहे. ती वाचकांनी अवश्य वाचावी ही विनंती.
सदाशिव मोरेश्वर मोहरीर
२१ ऑगस्ट १९९६
नागपूर
_____________________
प्रस्तावना
'कलश' ही संकल्पना पूजेतील आहे. आपल्यातील कोणतीही महापूजा कलशाची पूजा केल्याशिवाय सिध्द होत नाही. त्यामुळे नावापासूनच सार्थ असणारे आणि केवळ नावातच सार्थता न मानणारे, काव्य गुणांनी त्या नावाची सार्थकता सिद्ध करणारे असे हे एक या कालातील - २० व्या शतकातील अजोड असे काव्य! माझे वडील या काव्याचे प्रणेते आहेत म्हणून ही सर्व स्तुती त्या काव्याला लावण्यात येत आहे, असा चुकूनही गैरसमज होऊ नये. अथपासून इतिपर्यंत कोणतेही गीत वाचायला घेतले तरी याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही.
श्री गणेश महिमा हे पहिले काव्य:-
गणपति, सरस्वती, गुरु या सर्वांना धर्मग्रंथाच्या प्रारंभी वंदन करण्याची - त्यांची स्तुती करण्याची पूर्वापार परंपरा सांभाळण्याचे कवीला भान आहे.
श्री. स. मो. मोहरीर (श्री सदाशिव मोरेश्वर मोहरीर) हे अतिशय ख्यातनाम, आपल्या विषयात पारंगत व अध्यापनात कुशल असणारे असे व्यक्तित्व आहे. सी. पी. अॅड बेरार विद्यालय (महाल शाखा) नागपूर येथे इमानेइतबारे विद्यार्थ्यांना शिकवितांना साहित्याची सेवा त्यांच्या हातून तर घडलीच; पण एकूणच मनाची धार्मिक वृत्ती संतसाहित्याच्या प्रांगणात रमणारी असल्यामुळे जागोजागी संतसाहित्याच्या अभ्यासाचे पडसाद या काव्यात आपल्याला ठिकठिकाणी दृष्टिगोचर होतात. नमुन्यादाखल उदाहरणे घ््यावयाची म्हटले तर ते अशक्यच आहे. तरी काही उदाहरणे उद्धृत करण्याचा मोह आवरता आवरत नाही.
१)
जगाच्या कल्याणार्थ अवतरती
पृथ्वीवरती संत महंत
नाही क्षणाची उसंत त्यांना
परोपकार हेच तयांचे व्रत
"जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देहे कष्टविती उपकारे" हे येथे आठवल्यावाचून राहील का?
२)
पुंडलिका भेटी आले परब्रह्म
भक्तासाठी सगुण सुगम
विटेवर कटी कर नटसम
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
भक्तांची पुरविण्या हो आस
"युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांकी रुक्माई नित्य करी शोभा ।
पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उध्दरी जगा"
या सुप्रसिद्ध विठ्ठल आरतीची येथे आठवण येणे अपरिहार्य आहे.
३)
तोच तुझा माता पिता
तोच तुजला संकटी त्राता
तोच तव बा रक्षणकर्ता
"त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव"
हा श्लोक इथे वाचकांना आवर्जून आठवेल.
असे पदोपदी संस्कार प्रकट करणारे हे काव्य तर आहेच पण त्याचा अर्थ हा नव्हे की विचार उसने घेऊन काव्याचा परिपोष झाला आहे. अनुवादित काव्याला गौण मानणारे मानोत पण अनुवादक जर प्रतिभाशाली असेल तर तो अनुवादही नवनवोन्मेष शालिनी प्रतिभेचा वारसदार ठरतो. तसेच, विचार उसने वाटले तरी त्याचे आविष्करण उसने वाटत नाही. तो कवीचा अभ्यास आहे असे म्हणा हवे तर! मला तर या काव्यातील गुणांचे प्रकटीकरण करतांना माझीच भाषा व विचार शक्ती तोकडी पडते की काय असे वाटायला लागले आहे. भाषेची तारीफ करावी की ज्या वृत्तात कविता लिहिण्यात आली ते वृत्त अथपासून इतिपर्यंत इतके सुसंगत ओघवती सिद्ध होत गेले याचे आश्चर्य करावे, कवीच्या संस्कृतवरील प्रभुत्वाचा परामर्श घ््यावा की केलेल्या वर्णनाचे सजीव रूप आपल्यासमोर साकार करणा-या कवीच्या व्यक्तित्वाचा व एकुणच प्रतिभेचा वेध घ््यावा - कोणता मुद्दा सविस्तर वर्णावा व कोणत्या मुद्याला बगल द्यावी असे चक्र मनात निर्माण करणारे हे काव्य वाचकांच्या मनात तेव्हाच घर करते.
सिनेमाची आचरट गाणी आणि 'ट ला ट, री ला री' जुळवणा-या फसव्या शब्दकला यांच्या आवर्तात सापडणा-या आजच्या समाजाला या काव्याची गुणवत्ता समजण्यासाठी त्या पायरीप्रत अगोदर पोचावे लागेल. कवी हा तर निर्माता असतोच, पण त्या काव्याचा आस्वादक आणि त्याची समीक्षा करणारा समीक्षक हाही समिक्षेतून नवनिर्मितीच करत असतो. समीक्षकाला कवीची पातळी गाठता यावी लागते तरच ते समीक्षण आस्वादक ठरते. या काव्याची विशेषता ही की मूळतत्व हाती गवसले असे म्हणता म्हणता समीक्षकाच्या हातातून ते कधी निसटून जाईल हे कळणार सुद्धा नाही. कारण कवीची श्रेणी उच्च दर्जाची आहे. यासाठीही काही उदाहरणे प्रस्तुत करण्याचा मोह आवरत नाही.
'शिवोऽहम्' या कवितेचे आपण उदाहरण घेऊ. केदारेश्वर व पशुपतिनाथ यांच्या यात्रा अनेक भाविक करतात. पण ही कविता मूळातून तुम्ही वाचून बघा. तुम्हाला कवीच्या अनेक अंगभूत गुणांचा व त्यांच्या ठिकाणी असणा-या व्यवच्छेदक प्रतिभेचा तत्काल प्रत्यय येईल. ३३ श्लोकांचे हे काव्य विस्तृत असून कवीची शब्दकला कुठेही थिटी पडत नाही. शिवस्तुती, रामस्तुती, श्रीकृष्णस्तुती करणारे अनेक प्राचीन संत, पंत, तंत कवी होऊन गेले. 'श्रीधर' कवींचे रामविजय - हरिविजय प्रसिद्धच आहेत. पण थोडक्यात परमेश्वराची आळवणी कराविशी वाटल्यास भाविकाला हे काव्य वाचले व आळवून म्हटले तर आंतरीक आनंदाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही.
ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्यासारखे कवी झाले नाहीत व होणार नाहीत असे म्हटले जाते. आणि ते खरेही आहे. पण हे काव्य वाचून बघितले, त्याचे आलोकन केले तर मला तरी असे म्हणावेसे वाटते की तीच आत्मानुभुती व्यक्त करू शकणारे व्यक्तित्व या कवीच्या ठिकाणी लीलया अंतर्भूत आहे.
'उदो हो भवानी' हे काव्य बघा. भवानीच्या अनेक आरत्या प्रसिद्ध आहेत व पूजेत आपण त्या म्हणतोही. पण 'उदो हो भवानी' या काव्याला आरतीत स्थान मिळण्यास प्रत्यवाय नसावा, इतकी ती श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. 'आरती ' म्हटले की मनोभावे केलेली देवाची आळवणी. 'देव आपल्याला प्रसन्न व्हावे' ही त्यामागे अंतर्भूत इच्छा तर असतेच. कवीलाही पदोपदी असे वाटते. अनेक ठिकाणी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली आहे की या संसारसागरातून पैलतीर जर गाठावयाचे असेल तर ईश्वर हाच खरा नावाडी आहे. या आरतीतील काही ओळी मी उद्धृत करते -
"प्राची पश्चिम सागरा मिळतसे हिंदी महासागर।सामुद्रत्रय संगमी विलसते हे दक्षिणी भूशिर।त्याचा दक्षिण बिंदु ख्यात जगती कन्याकुमारी असे।
उग्रातीशय त्या तपार्थ नगजा कन्याकुमारी बसे॥
ऐसे हे स्थळ रम्य लोभस अती आहे महत्पावन।दृष्टीला मधु मेजवानिच घडे हालो नये येथुन। वृक्षाभूषित आसमंत अवघा अत्युच्च त्या पोफळी।
ताडांनी अणि माड वृक्षि रचिली स्पर्धा नभोमंडळी।
किती म्हणून उदाहरणे द्यावीत? स्वभावोक्ति अलंकाराचे याहून सुंदर उदाहरण दुसरे कोणते देता येईल काय?
विषयांची विविधता हेही या काव्याचे एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. नुसते मथळे जरी वाचले तरी एकुणच कवीच्या आध्यात्मिक, भाविक वृत्तीची कल्पना येते. प्रत्येक कविता मूळातूनच वाचावी असा आग्रह आवर्जून करावासा वाटतो.
१) संस्कृतचे नादमाधुर्य लेऊन बनलेली ललित मधुर ओघवती रसाळ शैली.
२) ओवी, अभंग, श्लोक, आरती, गौळण अशा विविध वृत्तांचे लीलया अवगाहन पेलू शकणारी प्रतिभा.
३) पदोपदी जाणवणारा अभ्यासाचा प्रत्ययदर्शीपणा.
४) विविध विषयांना कवेत घेऊ पाहणारी आध्यात्मिकता. हे विषय आध्यात्मिकच आहेत. कारण विविधता या नावाखाली कोणत्याही सर्वसामान्य थरावरील विषयाला कवीने प्राधान्य दिलेले नाही. म्हणून मूलतः आध्यात्मिक काव्य असाच या संग्रहाचा गुणगौरव करावा लागेल.
५) केलेले वर्णन सहज डोळ्यासमोर उभे करण्याची कवीची सूक्ष्मदर्शी प्रत्ययशीलता.
........ अशा अनेकानेक अंगांनी या काव्याचा आस्वाद घ््यावा लागेल.
येरांनी सांगावी रेमट कहाणी
चित्ता रंजवणी करावया
तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे
येरागबाळ्याचे काम नोहे
असे म्हणणारे संतश्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे कळस ठरणारे तुकोबाराय असोत, किंवा
स्वानुभूत वासाचे दान
जोवरि कविला करिता ये न
तोवरि कविता लतिके वरती
कर्णिकार सुमनांची भरती
असे म्हणणारे साने गुरूजी असोत. सांगायचा बोध एवढाच की 'हे तो प्रत्ययाचे बोलणे' असे उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडावेत असे विविध गुणांनी अलंकृत असे हे 'अमृत कलश' काव्य मूळातून सर्वांनी वाचावे.
सुसंस्कार हे अंतःकरण शुद्धीचा परिपोष करणारे असतात. सतत सन्मार्गाचा ध्यास देणारे असे काव्य वाचल्यानंतर वृत्ती आंतरिक आनंदाने न्हाऊन निघते.
सूज्ञांना अधिक सांगणे न-लगे!
सौ. संगीता मुकुंदराव पाटखेडकर
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment