Thursday, 22 October 2015


अध्यक्ष महाराज!



सदाशिव मोरेश्वर मोहरीर




_____________________








अर्पण पत्रिका



प्रणम्य मातरं राधाम्
जनकं तु मोरेश्वरम्
स्वरचितं प्रस्तुतं ग्रंथम्
मातृपितृस्मृतिसमर्पितम् ।




सदाशिव मोरेश्वर मोहरीर
वर्षप्रतिपदा, दि. २८ मार्च १९९८



_____________________



प्रकाशकाचे मनोगत


'अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि बंधुभगिनींनो!', मोठ्या आवेशात शाळेच्या एका स्नेहसंमेलनात मी आपल्या भाषणाला सुरुवात केली. 'भाषणाचा विषय अमुक अमुक आहे.' असेही सांगून झाले. नंतर १ सेकंद, २ सेकंद, ३, ५, १०, २० सेकंद, किती सेकंद झाले माहित नाही, पण माझ्या तोंडून पुढे काही शब्दच बाहेर पडेना. माननीय अटलबिहारी वाजपेयी बोलतात तेंव्हा त्यांचेही असेच होते. बरेचदा वाटते की विसरले की काय? पण ते शब्द तोलत असतात. काही झाले तरी शब्द म्हणजे रामबाण. एकदा भात्यातून निघाला की परत घेता येत नाही. असो. पण माझी गोष्ट वेगळी होती. माझ्या भात्यात बाणच नव्हता. मी बाबांनी लिहून दिलेले भाषण पाठ करून आलो होतो आणि ते मला वेळेवर आठवत नव्हते. जितका प्रयत्न करावा तितकी स्मरणाची द्वारे अधिकच बंद होत होती. डोके जणू बधिर झाले होते. नशिबाने पाय शुद्धीवर होते. ते वळले, व्यासपीठावरून खाली आले आणि रस्त्यावरून भरधाव पळत मला घरी घेऊन आले. येतांना संपूर्ण भाषण जसेच्या तसे आठवायला लागले. पण काय उपयोग? वेळ निघून गेली होती.

पूर्वतयारीचे वक्तृत्व हा शाळाकाॅलेजातून स्पर्धांचा एक सर्वमान्य विषय होता. १९४१ ते १९७६ ह्या आपल्या सेवाकालात बाबांनी त्यांच्या शाळेतर्फे अशा अनेक स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना उतरविले, त्यांच्याकरिता भाषणे लिहून दिली, त्यांच्याकडून ती पाठ करवून घेतली व हावभावासह स्पर्धेत वदवून घेतली. या विद्यार्थ्यांत आम्ही बहीणभावंडे पण होतो. वरील प्रसंग अपवादात्मकच. किती बक्षिसे मिळाली याची गणती नाही. क्वचितच शाळेचे बक्षिस जात असे. मिळालेली बक्षिसे आमचे मुख्याध्यापक स्वहस्ते प्रार्थनेच्या वेळी पुन्हा आम्हाला देत. टाळ्यांचा कडकडाट होत असे. बाबा शाळेच्या गॅलरीतून हे दृश्य बघत असत. त्या टाळ्या, तसेच भाषणात पडलेल्या टाळ्या ही आमची एक पुंजी आहे.

पूर्वतयारीच्या वक्तृत्वाप्रमाणेच वादविवाद व निबंध स्पर्धाही होत असत. निरनिराळे विषय, विभिन्न वयोगट, वेगवेगळे नियम. येथेही आम्ही व शाळेतील काही विद्यार्थ्यांनी बक्षिसे लुटून आणलीत. अर्थात् ह्या स्पर्धांमध्येही बोलविता व लिहविता धनी बाबाच होते.

सर्वात कठिण स्पर्धा म्हणजे 'समयस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा'. वेळेवर प्रत्येकाला वेगवेगळा विषय द्यायचे. त्यावर एका बंद खोलीत विचार करून दहा मिनिटांनी भाषण सुरू करावे लागायचे बापरे, महाकठिण काम! सुरुवाती सुरुवातीला जड जायचे. बाबांनी लिहिलेल्याच निबंध, भाषणातील विषयाला थोडीफार मिळतीजुळती वाक्ये व एखादे दुसरे आपले वाक्य यांची जमवाजमव करून वेळ मारून न्यायची झाले. हा स्पर्धेचा प्रकार एकंदरीतच अव्हाॅयडेबल वाटायचा.

बाबांना सर्व काही जपून ठेवायची सवय आहे. आजही आमच्याकडे गेल्या ८०-९० वर्षांची पंचांगे, भोसला वेदशाळेला १९५७ मध्ये दिलेल्या चार आणे मासिक वर्गणीच्या रसिदी शोधल्या तर सापडतील. पण याच सवयीमुळे १९४० नंतर बाबांनी लिहिलेले बहुतेक सर्व निबंध व भाषणे एका गाठोडीत नांदत होते. या लिखाणांमध्ये गेल्या ६० वर्षांच्या काळाची पाउले उमटली आहेत. हा खजिना पुस्तक रूपाने प्रकाशात आणायचा माझा बरेच वर्षांचा मानस होता. 'अध्यक्ष महाराज!' त्याचे प्रत्यक्ष स्वरूप.

पुस्तकात बाबांनी केलेले सर्वच 'ghost writing' समाविष्ट झाले आहे अश्यातला भाग नाही. काही लिखाण ज्या कागदावर लिहिले तो इतका जीर्ण झाला होता की त्याची घडी उघडतांना त्याचे तुकडे पडले. ते जोडण्याच्या प्रयत्नात तुकड्यांचे तुकडे पडले. सर्व कागद गाठोडीतून काढल्यावर तळाशी चुरा पडला होता. शब्दांचा कीस काढणाऱ्या व्यक्ति पाहिल्या, पण शब्दांचा अक्षरशः कीस डोळ्यांनी पाहण्याची व हाताने चाचपायची ही पहिलीच वेळ. काळ सर्वभक्षक असतो म्हणतात ते काही खोटे नाही.

काही लिखाण अगदी कालबाह्य झाले म्हणून गाळले. काही निबंध व भाषणे हरवली आहेत. 'वाचनाचे महत्त्व' व 'माझी आई' हे निबंध तर मी पाठ केले होते. दोन्हीही सुंदर होते. पण आज ते उपलब्ध नाहीत. पण उपलब्ध आहे ते लिखाण काही थोडेथोडके नाही. त्यांचेही काळाआड जाणे, काही काळाकरिता तरी मला टाळता आले, या पुस्तकाच्या माध्यमाने, याचे मला समाधान आहे. त्याहूनही मोठे समाधान बाबांचे लिखाण बाबांच्या नावाने प्रकाशात येत आहे याचे आहे.

गेले कित्येक महिने मी रोज एक पान या हिशोबाने हे पुस्तक पुढे रेटले. रोज एक पान वाचायचे, रोज एक पान काँप्युटरवर टाईप करायचे, व रोज एक 'तुकडा पान' त्यावर आपली मल्लीनाथी लिहायची. पानाचे व्यसन चांगले नाही असे म्हणतात. पण मला लागलेली ही 'पानाची सवय' मी जतन करणार आहे.

५०-६० वर्षांच्या कालखंडात सातत्याने एकाच व्यक्तीने, एकाच उद्देशाने लिहिलेले हे साहित्य वाचतांना काळाच्या ओघात सर्व गोष्टींची कशी झीज होते हे अनुभवले. बऱ्याच गोष्टी आजच्या मुलांना समजावून सांगाव्या लागतील. सडा-सारवण म्हणजे काय प्रकार होता हे समजावून सांगूनही समजेलच असे नाही. कासारीण म्हणजे कोण असा प्रश्न पडेल. बाबू गेनू कोण असाही प्रश्न पडेल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. व्याकरणाचे नियम सुद्धा बदलले. बाबांचेच जुने निबंध जसेच्या तसे छापून बाबांना दिले तर त्यात बाबांनी अनेक ऱ्हस्वदीर्घाच्या चुका काढल्या. बऱ्याच शब्दातील अनुस्वार घोड्यावरून घोडेस्वार पडावा तसे गळून पडले. शब्दाच्या शेवटची 'इ'ची मात्रा 'ई'ची झाली. बरेचदा अशा झालेल्या बदलांमुळे भाषण १९६० पूर्वीचे की नंतरचे असे कालानुमान करता आले. हे भाषेतील बदल ह्या पुस्तकात सर्वत्र सापडतील. सरसकट आजचे व्याकरणाचे नियम वापरण्याचे जाणूनबुजूनच टाळले. जसे लिहिल्या गेले तसे छापले. अनुस्वार फक्त शक्यतोवर गाळले.

पुस्तकाला शीर्षक काय द्यावे यावर बराच विचार केला. 'अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि बंधुभगिनींनो!' हे सुरुवातीला दिलेले लांबलचक शीर्षक बाबांनाही आवडले नाही. लिखाण इतके विविध विषयांवर आहे की ते एका साच्यात बसत नाही. पण बहुसंख्य लेखांचा मसावि 'अध्यक्ष महाराज!' हा आहे. तोच शीर्षक म्हणून वापरला. शेवटी नावात काय आहे!

बाबांचेच लिखाण आज गुढीपाडव्याच्या दिवशी बाबांना व सौ. आईला सादर समर्पण!

अरुण
गुढीपाडवा, १९९८
मुंबई

_____________________


लेखकाचे मनोगत


प्रकाशितांमध्ये माझे हे तिसरे पुस्तक. 'अमृतकलश' हे पहिले. तो स्वरचित भक्तिगीतांचा संग्रह आहे. तसे पाहिले तर कोणत्याही समाजाचे म्हणा, किंवा धर्माचे म्हणा, आद्य वाङमय हे काव्यरूपच असते. हिंदूंचे आद्य धर्मग्रंथ वेद, उपनिषदे, स्मृति, पुराणे, भगवद्गीता हे सारे ग्रंथ काव्यरूपच आहेत. मुस्लिमांचे कुराण, ख्रिस्तांचे बायबल, शीखांचे ग्रंथसाहेब हे ग्रंथही काव्यमयच. इतकेच काय, आद्य मराठी कवी मुकुंदराज यांचे परमामृत, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी व अमृतानुभव, एकनाथांचे एकनाथी भागवत, श्री समर्थ रामदासस्वामींचा दासबोध, संतश्रेष्ठ तुकारामांची गाथा, रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली, विनोबांची गीताई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सारे उत्स्फूर्त वाङमय पद्यात्मकच आहे. ह्रदयाचे आंतरिक उत्स्फूर्त उद्गार काव्यरूपानेच बाहेर पडत असतात.

याला कारणे दोन. एक म्हणजे, काव्यवाणी ही लघुसंदेशपदा असते. मोजक्या शब्दात पुष्कळ भावार्थ त्यातून व्यक्त करता येतो. गूढार्थ देखील व्यंजकतेने व्यक्त करण्याचे सामर्थ्य काव्योद्गारात असते. ह्रदयातील भावनावेग जोरदार झाला की, तो उत्स्फूर्तपणे काव्यरूपाने बाहेर प्रकट होत असतो. दुसरे कारण असे की पद्य हे गद्यापेक्षा ज्यास्त आकर्षक असते. गेय असल्यामुळे त्याची रंजकता अनेक पटींनी वाढते. ते ह्रदयाचे आंतरिक बोल असल्यामुळे वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या अंतःकरणाची पकड लगेच घेते, आणि ती पकड देखील बराच काळ टिकते. तेव्हा माझा पहिला प्रकाशित ग्रंथ 'अमृतकलश' हा गीतसंग्रह आहे हे सहजतेला धरूनच आहे.

'अमृतकलश' श्री दत्तजयंतीच्या सुमुहुर्तावर दि. २४ डिसेंबर १९९६ ला प्रकाशित झाला. त्याला माझी कन्या प्रा. सौ. संगीता पाटखेडकर (अकोला) यांची प्रस्तावना लाभली आहे.

माझा दुसरा ग्रंथ 'मज्जीवनमणिमाला'. याचे स्वरूप आत्मचरित्रात्मक आहे. याला माझे ज्येष्ठ चिरंजीव डाॅ. प्रमोद मोहरीर, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेता, डेप्युटी डायरेक्टर, National Geophysical Research Institute, हैदराबाद यांची प्रस्तावना लाभली आहे. या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ दि. १५ आॅगस्ट १९९७ रोजी, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव दिनी, तिथीनुसार माझ्या ८२व्या जन्मदिनी संपन्न झाला. हा ग्रंथ प्राधान्येकरून गद्यात्मक असला, तरी प्रसंगवशात् त्यात स्वरचित पद्याचीही जागोजाग पखरण आहे. इतकेच नव्हे तर मी सपत्निक संपूर्ण भारतवर्षाचा जो प्रवास केला त्याचे वर्णनही त्यात अंतर्भूत आहे. मी विसाव्या शतकाचा ८२ वर्षांचा दीर्घकाळ अनुभवला असल्यामुळे या ग्रंथाचे 'विसावे शतक' हे बारावे प्रकरण या शतकातील प्रमुख घटनांचा परामर्श घेणारे आहे. पण याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळात आपण काय कमावले व काय गमावले याचा तो आयव्ययात्मक व आटपशीर आराखडाही आहे.

माझा तिसरा ग्रंथ 'अध्यक्ष महाराज!' हा प्रकाशनाच्या प्रतिक्षेत आहे. मी आपल्या सी. पी. अँड बेरार माध्यमिक विद्यालय, महाल, नागपूर येथील अध्यापकीय जीवनात आपले कन्यापुत्र आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना वक्तृत्व, वादविवाद, निबंधलेखन, पाठांतर, संवाद, साभिनय भाषण, नाट्य इत्यादि विविध स्पर्धात उपयोगी पडावे म्हणून जो नानाविध लेखनप्रपंच केला त्याचा समावेश प्रस्तुत ग्रंथात करण्यात आला आहे. त्यात भाषणे आहेत, वादविवाद-संवाद आहेत, निबंध आहेत, काही थोर स्त्रीपुरुषांवरील लेख आहेत, भगवद्गीतेवरील काही स्फुट लेख आहेत, काव्य, नाट्य, लघुकथा आहेत. असा हा नानाजिनसी खजिना माझा सुपुत्र डाॅ. अरुण मोहरीर, प्राध्यापक, आय्. आय्. टी. मुंबई, हा माझ्याजवळून आग्रहपूर्वक मागून घेऊन गेला, आणि प्रयत्नपूर्वक निवड करून (१) माझा देश, (२) आमची संस्कृति, (३) वादरण, (४) द्वंद्व, (५) संवाद व (६) गोपालकाला ह्या प्रकरणात विभागणी करून ते सर्व साहित्य संगणकावर टंकलिखित करून पुस्तकरूपाने प्रकाशित करीत आहे. ग्रंथाचे व प्रकरणांचे नामकरण, प्रत्येक घटकाच्या आधीची परिचयात्मक प्रस्तावना व अंतीची मल्लीनाथी, ग्रंथाचा विस्तार, आकार व सौष्ठव यांचा कर्ता, करविता धनी तोच आहे. या महनीय कार्यात पितृप्रेमादरापोटी त्याने जे अथक परिश्रम घेतले, त्याचे मला अपार कौतुक आहे. त्याला जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच.

ह्या माझ्या ग्रंथत्रयीला साकार करून वाचकांना सादर करण्याच्या जिकिरीच्या कार्यात प्रस्तावना लेखन, संगणकावरील टंकलेखन व मुद्रण, मुद्रिके तयार करून शुद्धिपत्रक तयार करणे इत्यादि विविध कार्यरूपाने आमचे सर्वच कन्यापुत्र व त्यांचे परिवार यांचा मोलाचा हातभार लागला आहे. माझ्यावरील प्रेमादरापोटी  त्यांनी केलेल्या या मौलिक मदतीप्रित्यर्थ त्यांना माझे शतशः धन्यवाद.

माझी धर्मपत्नी सौ. प्रमिला हिचे अव्याज प्रेम, प्रेमळ सहानुभूती, प्रेरक स्फूर्ती व पदोपदी उत्तेजन यांच्या भरवशावरच मी आयुष्याच्या सायंकाळी एवढा लेखनप्रपंच करू शकलो. एरवी ते अशक्यप्रायच होते. ती खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी आहे. तिच्या अनमोल सहकार्याप्रित्यर्थ माझे तिला शतशः हार्दिक धन्यवाद.

प्रस्तुत ग्रंथातील बहुतेक सर्व साहित्य हे माझ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखातर, त्यांना विविध स्पर्धात भाग घ््यायला व यशस्वी होऊन शाळेची शान व कुळाची कीर्ती वृद्धिंगत करायला मदत व्हावी, म्हणून लिहिण्यात आले आहे. हा माझा ह्रदगत हेतू पूर्णतः सफल झाला आहे असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. तेव्हा या ग्रंथाला प्रस्तावना लिहिणारी व्यक्ति देखील आपल्या विद्यार्थ्यांपैकीच एक, शालेय जीवनापासूनच लेखनाची व काव्यरचनेची आवड असणारी, प्रतिभेचे स्फुल्लिंग अंतःकरणात जागृत असणारी, आपले उत्तेजन, प्रेरणा व मार्गदर्शन लाभलेली, उच्च शिक्षण घेतलेली व सध्या साहित्यिक, कादंबरीकार, नाटककार वा ललित वाङमयाच्या कोणत्याही अन्य दालनात मोलाची भर घालणारी असावी अशी साहजिकच माझी इच्छा होती. या दृष्टीने शोध सुरू झाला, आणि अचानक एक नाव पुढे आले. प्रा. डाॅ. विजय पांढरीपांडे, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद यांचे. ते आय्. आय्. टी. खरगपूर मधून Ph. D. झाले आहेत. सध्या ते हैदराबादच्या सुप्रसिद्ध उस्मानिया विद्यापीठात प्रोफेसर आहेत. त्यांचे वैशिष्ट्य असे की वैज्ञानिक व प्रौद्योगिकी क्षेत्राचे असून सुद्धा त्यांनी आपला विद्यार्थी दशेतला साहित्यनिर्मितीचा छंद जोपासला असून त्यांच्या आतापावेतो डझनभर कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना मी स्वत: आणि माझे सुपुत्र डाॅ. अरुण मोहरीर, जे प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशक आहेत, त्यांनी विनंती केली. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अल्पावकाशात अतिशय मार्मिक व समुचित प्रस्तावना लिहून आमच्या स्वाधीन केली. त्यांच्या प्रस्तावनेने माझ्या प्रस्तुत पुस्तकाला एक प्रकारचे वजन प्राप्त झाले असून त्याची शान वाढली आहे. तत्प्रीत्यर्थ मी त्यांना हार्दिक धन्यवाद देतो, आणि आपल्या अध्यापनाच्या व साहित्यनिर्मितीच्या कार्यात ते उत्तरोत्तर विस्तारणारी यशाची क्षितिजे गाठोत, अशी आंतरिक भावना प्रकट करतो. वाचकांनी प्रस्तुत ग्रंथाचे वाचन सुरू करण्यापूर्वी डाॅ. विजय पांढरीपांडे यांची प्रस्तावना अवश्य वाचावी अशी त्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो.

ह्या ग्रंथातील सर्व साहित्य माझ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अनेक स्पर्धांतून, चढाओढीतून, प्रतियोगितांतून - सी. पी. अँड बेरार हायस्कूल, सी. पी. अँड बेरार काॅलेज, श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालय, सेठ बिंझाणी सिटी काॅलेज, महाराष्ट्र अध्ययन मंदिर, गीतामंदिर, हिस्लाॅप काॅलेज, जी. एस्. काॅमर्स काॅलेज, ट्रेनिंग काॅलेज, भोसला वेदशास्त्र महाविद्यालय, विदर्भ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, धनवटे रंगमंदिर, तिडके हायस्कूल, पारळकर भवन, नगर भवन (टाऊन हाॅल), सीताबर्डी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राजाराम वाचनालय, महाल प्रायमरी शाळा, कुर्वे माॅडेल हायस्कूल, न्यू इंग्लीश हायस्कूल इत्यादि अनेक ठिकाणी आचार्य दादा धर्माधिकारी, वीर वामनराव जोशी, प्राचार्य राम शेवाळकर, डाॅ. अ. ना. देशपांडे, प्राचार्य गो. मा. कुळकर्णी, प्राचार्य पांढरीपांडे, डाॅ. के. रा. जोशी, प्राचार्य भा. रा. देशपांडे, प्रा. माणिकराव बैतुले यांच्यासारखी शिक्षण क्षेत्रातील थोर मंडळी अध्यक्ष वा परीक्षक असतांना मोठ्या प्रेक्षकश्रोतृवृंदासमोर दृकश्राव्य स्वरूपात सादर करून प्रथम वा द्वितीय क्रमांक पटकावून अनेक ढाली, चषक आणि स्वतःकरिता अनेक वैयक्तिक पारितोषिके प्राप्त करून संस्थेच्या व कुलाच्या कीर्तीत मोलाची भर घातली आहे. अमृत कलश आणि मज्जीवनमणिमाला हे ग्रंथ मी आपल्या आदरणीय मातापित्यांच्या पुण्यपावन स्मृतीस सादर समर्पण केले आहेत. तद्वतच 'अध्यक्ष महाराज!' नामक हा तिसरा ग्रंथही मी आपल्या पूजनीय मातापित्यांच्या पुण्यपावन स्मृतीस प्रणामपूर्वक सादर समर्पण करतो.

प्रस्तुत ग्रंथ रसिक वाचकांना सादर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. सुजाण वाचकांनो, आता तुम्हीच माझ्या ग्रंथाचे टीकाकार, भाष्यकार, समीक्षक रसज्ञ.

स. मो. मोहरीर
गुढीपाडवा
२८ मार्च, १९९८

१५ अ, सुफला अपार्टमेंट्स्
कॅनाल रोड, गोकुळपेठ,
नागपूर - ४४००१०

_____________________


गुरुदक्षिणा


माझे गुरुवर्य (हायस्कूलमधील शिक्षक) श्री. रा. रा. मोहरीर सर ह्यांच्या प्रस्तुत लेखसंग्रहाला प्रस्तावना लिहिण्याचा प्रस्ताव माझ्यापुढे आला तेव्हा गुरूची आज्ञा म्हणूनच मी त्याला मान्यता दिली. एरवी कोणाच्याही साहित्यिक कृतीला प्रस्तावना वगैरे लिहिण्याची (मोठमोठे व्यासंगी लेखक ज्या पद्धतीने प्रस्तावना लिहितात त्या अर्थाने) माझी योग्यता नाही. अन् ह्या पुस्तकाच्या बाबतीत तर अधिकारही नाही. खरे म्हणजे माझ्यासारख्याने त्यांची प्रस्तावना मागायची ... (ती मी मागितली देखील. शालेय जीवनातील माझ्या फुटकळ साहित्याचे मी स्वतःच तयार केलेले जे हस्तलिखित - त्याला त्यांच्याच हस्ताक्षरातील 'आशिर्वाद' लाभले होते. तीन दशकांपूर्वी!) ... त्याची परतफेड म्हणून नव्हे तर एक प्रकारची गुरुदक्षिणा म्हणून मी हे चार शब्द लिहिण्याचे धाडस करण्याचे ठरविले.

मोहरीर सरांचा माझा संबंध हा केवळ शाळेतील वर्गापुरताच मर्यादित नव्हता. त्यांचा मुलगा विश्राम हा माझा वर्गमित्र असल्याने शाळेत असतानाच नव्हे तर नंतरही त्यांच्या घरी येणे जाणे व्हायचे. आता तर त्यांचे ज्येष्ठ पुत्र डाॅ. प्रमोद मोहरीर अन् मी एकाच शहरात, एकाच पोस्टलकोड विभागात राहत असल्याने आमचे वैयक्तिक अन् व्यावसायिक संबंध आहेत. सर महालातल्या घरात होते तोपर्यंत मी नागपूरला गेलो की त्यांचे घरी जाणे येणे व्हायचेच. आता ते अपार्टमेंट्समध्ये गेले आहेत. त्या अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये मी अजून गेलेलो नाही.

हा घर आणि अपार्टमेंट मधला - दोन संस्कृतीतला - फरक असेल!

संस्कृति आणि संस्कार ह्यांचे माहेरघर म्हणजे मोहरीर सरांचे घर. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे कौटुंबिक अन् व्यावसायिक व्यापताप सांभाळून, वडिलांचे लिखाण शोधून, संगणकावर मुद्रित करून प्रसिद्ध करण्याचा हव्यास म्हणजे सोपे काम नव्हे. आजच्या पिढीत नात्यागोत्याविषयी पूर्वीचा जिव्हाळा राहिलेला नाही हे कटु सत्य आहे. आजचे सगळे व्यवहार मटेरियलिस्टिक असतात. दामाशी काम. कामापुरते काम. आजची पिढी ही वेगळ्या संस्कृतीत वाढलेली आहे. शिक्षणाचे स्वरूप आमूलाग्र बदललेले. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा. त्या स्पर्धेत उतरण्यासाठी जीवाचा आटापिटा. त्या दृष्टीने प्रस्तुत संग्रहातील लेखन म्हणजे चार पाच दशकापूर्वीच्या शालेय जीवनातील सांस्कृतिक प्रतिबिंब दर्शविणारा आरसाच आहे. पूर्वी स्नेहसंमेलने व्हायची. वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धा व्हायच्या. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनाची जडणघडण व्हायची. कुणी म्हणेल पाठांतर करून पोपटपंची केल्यासारख्या लिहिलेल्या, म्हटलेल्या ह्या भाषणांचे काय महत्त्व? परंतु पाठांतरात खोलवर जिरण्याचा जो गुण असतो त्याचे महत्त्व कॅलकुलेटर किंवा संगणक की बोर्डच्या पियानो संस्कृतीत वाढलेल्यांना पटवले तरी समजणार नाही. ह्यातील लेख मी वाचले तेव्हा आजही कुठेकुठे माझ्या अंगावर शहारे आलेत. वाटले - कॅसेट रिवाईंड करून मागचे ऐकतात किंवा पाहतात - तसे सगळे काही गुंडाळून साठ पासष्ट सालात जावे अन् नागपूरच्या महालातील सी. पी. अँड बेरार शाळेच्या गॅलरीतील कठड्याला टेकून - 'अध्यक्ष महाराज, बंधू अन् भगिनींनो!' म्हणायला सुरू करावे!

एका विशिष्ट वृत्ती प्रवृत्तीने भारून जाण्याचा तो काळ होता. अभ्यासाचे ओझे हे हमालासारखे (मला तरी) कधी जाणवले नाही. अर्थात दोष त्यांनाही देता येणार नाही. कारण त्यांच्या पुढ्यात जे काही आहे ते तुम्ही आम्हीच रांधलेले, वाढलेले आहे.

गेले पाव शतक सुदैवाने शिक्षणक्षेत्राशीच माझा संबंध आहे. नव्या पिढीच्या बॅचेस (तेही इंजिनियरिंग क्षेत्रातील कुशाग्र बुद्धीमत्तेच्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस) दरवर्षी हाताखालून जातात. संस्कृतीमधले हे स्थित्यंतर म्हणूनच मला जवळून  बघता, अनुभवता आले.

स्पर्धेचे युग आजही आहे. पण आजच्या स्पर्धा वेगळ्या, त्यांचे नियम वेगळे. हे काँपिटिटिव्ह एक्झाम्सचे युग आहे. आजच्या मुलामुलींचे आयुष्य हे टी. व्ही. चॅनेल्स् मधून प्रवाहित होणाऱ्या, इनफर्मेशन टेक्नाॅलाॅजीची जरतारी किनार लाभलेल्या, कार्यक्रमांनी प्रभावित होणार. अर्थात् त्यावर टीका करण्याचे काही कारण नाही. कारण बोर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट किंवा सिद्धार्थ बसूची इंडिया क्विझ काँटेस्ट टी. व्ही. वर बघतांना ओठावर मिसुरडे न फुटलेल्या अन् खांद्यावर (ओढणीचा) पदर न घेतलेल्या मुलामुलींच्या सामान्य ज्ञानाची गरुडझेप आमच्यासारख्या उच्चशिक्षाविभूषित युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकालाही तोंडात बोट (एक नव्हे, पाचही बोटं!) घालायला लावणारी असते. आता 'ते खरे की हे खरे' हा वादाचा विषय असून त्यावरची भाषणे डाॅ. अरुण, डाॅ. प्रमोद ह्यांना व त्यांच्या मुलामुलींनाच लिहावी लागतील. सर फार तर आजकालच्या चाणाक्ष राजकारणी पुढाऱ्यासारखे 'समान अंतरावर' (मुलांपासून अन् नातवांपासून!) राहून परीक्षकाचे काम करू शकतील!

ह्या सर्व पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकातील निबंध, लेख हे वरवर बघता कालबाह्य वाटत असले तरी त्यांचे सांस्कृतिक मूल्य काही कमी नाही. आजही विद्यापीठाला किंवा रेल्वे स्थानकाला नाव द्यायचे झाले तर आपल्याला डाॅ. आंबेडकर, छत्रपती शिवाजीच आठवतात. अर्थात ह्या नावांचा आपण खूपश्या भोळ्या आशेअपेक्षेने निवडून दिलेले पुढारी दुरुपयोग करतात अन् आर्. के. लक्ष्मणच्या कार्टून्सचे पात्र होतात हा भाग वेगळा!

मी हे लेखन मुद्रणप्रतीच्या रूपात वाचले. ह्या वाचनाने मला शालेय जीवनाची, शब्दशः 'रम्य ते बालपण' म्हणवणारी सफर घडविली. आमच्या शाळेजवळील महालच्या पाताळेश्वराच्या देवळातील घंटानाद, त्या शंकराच्या पिंडीवरील थंडगार तीर्थस्पर्श, त्या गाभाऱ्यातील निर्माल्यांचा वास ... हे सारे मी भक्तीभावे अनुभवले. ह्या अनुभवासाठी तरी मला सरांचे अन् त्यांचे लेखन तळमळीने प्रसिद्ध करणाऱ्या सुपुत्रांचे ऋणी रहावेसे वाटते. काही ऋणांचे ओझे वाहण्यातच आनंद असतो.

आज माझ्यात साहित्यिक छंद जोपासण्याची, सातत्याने लिहित राहण्याची जी जिद्द आहे त्यामागे सरांचे मराठी शिकवितानाचे संस्कार आहेत. म्हणूनच माझ्या पहिल्या वहिल्या हस्तलिखिताचे शाळाकाॅलेजात लिहिलेले बाड मी त्यांना तीस वर्षांपूर्वी वाचावयास दिले तेव्हा त्यांनी उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या आशिर्वादपर प्रस्तावनेत जे भविष्य वर्तविले ते प्रभुकृपेने खरे झाले. परदेशीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला संशोधनपर लेख अन् दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा ... अमेरिकन रिव्ह्यूअरची पेपरवरील समीक्षा अन् कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून आलेले माझ्या कथाकादंबरीवरील वाचकाचे पत्र ... मला सारखाच आनंद देतात. ही शालेय जीवनातील संस्कारांची देणगी आहे. ह्या संग्रहातल्यासारख्याच लेखांचा तो प्रभाव आहे. ह्या सुसंस्कृतीने मधाळलेल्या संस्कारांचे प्रतिबिंब आजही माझ्या लेखनात मांजरीच्या पावलाने डोकावतेच. म्हणूनच अलीकडे मी लिहीत असलेल्या महाकादंबरीच्या ताज्या प्रकरणात नागपूरच्या महालातील सिटी हायस्कूलच्या प्रांगणात त्यावेळी होत असलेल्या ललित कला विहारच्या भाषणमालांचा संदर्भ आलाय. आता ह्या आठवणींची धृवपदे गातांना 'गेले ते दिन गेले' एवढेच म्हणणे आपल्या नशिबी आहे.

सरांच्या ह्या पुस्तकाला माझी प्रस्तावना म्हणजे रेशमी शालीला गोधडीचे ठिगळ लावण्यासारखे आहे. पण काही जुन्या माणसांना शालीपेक्षा गोधडीचीच ऊब भावते त्याला आपण काय करायचे?

ह्या वर्षीच्या गुढीपाडव्याला ... नेमक्या माझ्या वाढदिवशी ... ही गुरुदक्षिणा मला अर्पण करता आली हे माझे सौभाग्य.

डाॅ. विजय पांढरीपांडे
प्राध्यापक,
इलेक्ट्राॅनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग
उस्मानिया विद्यापीठ
हैदराबाद - ५००००७

गुढीपाडवा
२८ मार्च, १९९८

_____________________

अनुक्रमणिकेकडे


गोपालकाला



बाबांचे लिखाण अफाट आहे. विषय बेफाट आहेत. बरेचसे विषय कोणत्याच साच्यात बसत नाहीत. बरेचसे विषय असे आहेत की ज्यावर सामान्याला काहीच सुचणार नाही. पण त्यावरही बाबांनी पानावर पाने भरली. ती वाचून झाली की मग पटते की विषय काही अगदीच टाकाऊ नव्हता. काही विषय असे आहेत की ज्यात जुन्या काळाचे प्रतिबिंब पडले आहे. काही लेख अभ्यासपूर्ण आहेत. काही विचार करायला लावणारे आहेत. काही विचार बदलविणारे आहेत. काही विनोदी आहेत. काही परखड आहेत. काही खट्याळ आहेत. काही स्वप्नाळू आहेत. काही खडबडून जागे करणारे आहेत. काहीत गोडवा आहे. काहीत कडवेपणा आहे. काही तिखट आहेत. अनेक चवींचे अनेक लेख. त्यातलेच काही घेऊन हा समाप्तीचा गोपालकाला कालविला आहे.


वाङमयाच्या अभ्यासाची आवश्यकता


'भाषेत जे जे बोलले किंवा लिहिले जाते ते म्हणजे वाङमय' अशी संस्कृतात वाङमयाची व्याख्या केली आहे. परंतु आज वाङमय ह्या संज्ञेच्या अर्थाचा संकोच झाला असून ज्यात मनुष्याच्या आशाआकांक्षा, गुणदोष यांचे प्रतिबिंब पडले आहे आणि ज्यातून आपणास मानवसमाजाच्या ध्येयकल्पनांचे दर्शन होते अशा लेखनसमुदायास वाङमय असे संबोधिले जाते. वाङमय आणि साहित्य या दोन संज्ञात प्राचीन काळी भेद केला जात असे. परंतु सांप्रत ह्या दोन्ही संज्ञांचा जवळजवळ समान अर्थानेच उपयोग केला जातो.

'साहित्य संगीत कलाविहीनः । साक्षात पशुः पुच्छविषाणहीनः ।' असे भर्तृहरीने म्हटले आहे. याचा अर्थ असा की मनुष्य आणि पशु ह्या दोघात मूलभूत फरक करणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यापैकीच साहित्य किंवा वाङमय हीहि एक होय. ही गोष्ट ध्यानात घेतल्यावर वाङमयाच्या अभ्यासाची आवश्यकता काय असा प्रश्न करण्याचे कारणच उरत नाही. पशु आणि मानव ह्यात साहित्याने फरक केला आहे. म्हणून हा फरक कायम ठेवण्यासाठी, मानवाला अधिकाधिक सुसंस्कृत करण्यासाठी वाङमयाच्या अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे.

वाङमय आणि मानवसमाज यातील परस्पर संबंध खालील रूपकाद्वारे सुंदर रीतीने स्पष्ट करता येतो. वाङमय ही एक विशाल विस्तृत गंगा असून त्याकाठी मानवी संस्कृतीचा, मानवी समाजरचनेचा अवाढव्य वृक्ष उभा आहे. मग त्या वृक्षाचे गंगेच्या स्वच्छ पाण्यात प्रतिबिंब पडणे हे तर अटळच आहे. पण गंगेच्या पाण्यानेच आणि तिने वाहून आणलेल्या गाळानेच ह्या वृक्षाचे पोषण आणि संवर्धन होणार हीहि गोष्ट तितकीच सुनिश्चित आहे. म्हणजे मानवसमाजाचे प्रतिबिंब तत्कालीन वाङमयात पडत असते आणि वाङमय तत्कालीन समाजास निराळे वळण लावण्यास कारणीभूत होत असते. रामायणाच्या वाचनाने आपणाला रामायणकालीन समाजरचनेची यथार्थ कल्पना येते. येवढेच नव्हे तर रामायणाच्या अभ्यासाशिवाय तत्कालीन समाजरचनेचे परिपूर्ण चित्र आपल्या दृष्टीसमोर उभे राहणे शक्य नाही. म्हणून मानवी समाजाच्या निरनिराळ्या काळातील प्रगतीचा आढावा घेणे व मानव समाज कसाकसा उत्क्रांत होत गेला याचे ज्ञान करून घेणे यासाठी वाङमयाच्या अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे.

वरील उदाहरणावरून हे सहज स्पष्ट होते की मानव समाजाच्या उत्क्रांतीला वाङमय साहाय्यभूत ठरत असते. प्राचीन काळी भारतीय समाज अखिल जगासमोर आदर्श म्हणून मानला जात असे याचे श्रेय त्याकाळच्या अभिजात वाङमयासच द्यावे लागेल. वाङमयाच्या वाचनाने आपण कोठे आहो आणि आपणास कोठे जावयाचे आहे याचे यथार्थ ज्ञान होत असते. आपल्यास समोर कोणते ध्येय आपण ठेवले पाहिजे याची कल्पना वाङमयाच्या अभ्यासाने येते. म्हणून योग्य दिशेने वाटचाल करावयाची असेल तर वाङमयाच्या अभ्यासाचे महत्त्व विसरून चालणार नाही.

वाङमयाच्या अभ्यासाचे महत्त्व काय हा प्रश्न सुद्धा नव्याने उपस्थित झालेला आहे. पूर्वी हा प्रश्न कधीच उपस्थित झाला नव्हता. याचे कारण प्राचीन काळी सर्व शास्त्रे सुद्धा वाङमयाच्या पेहरावात वावरत असत. आजकाल जे जुने वैद्यकशास्त्राचे ग्रंथ सापडतात त्यांनी सुद्धा पद्याचा पोषाख चढविलेला आढळून येतो. परंतु दोन तीन शतकापूर्वी जसजशी विज्ञानाची प्रगति होत गेली तसतसा हा प्रश्न डोके वर काढू लागला. विज्ञान व वाङमय ह्या परस्परविरोधी शक्ति होत असा एक अपसमज लोकात प्रसार पावू लागला आणि ह्या अपसमजापोटीच वरील प्रश्नाचा जन्म झाला. परंतु विज्ञान व वाङमय या मूलतःच परस्परविरोधी शक्ति नसून त्यांचे कार्य परस्परास पूरक असेच आहे. निरनिराळे आश्चर्यकारक शोध लावून मानवाला अचाट शक्ति प्राप्त करून देणे हे विज्ञानाचे कार्य होय. आणि या शक्तीचा उपयोग विकासाकडे करवून घेण्यासाठी मानवी समाजाला योग्य ते वळण लावून त्याला शाश्वत सुखाचा लाभ करवून देणे हे वाङमयाचे कार्य आहे. त्या दृष्टीने पाहिले असता विज्ञानापेक्षा वाङमयाचाच मानवी जीवनाशी अधिक निकटचा संबंध आहे ही गोष्ट स्पष्ट होते. वाङमयीन मूल्ये आणि वाङमयाने मानवासमोर ठेवलेली सर्वोच्च ध्येये ही शाश्वत असून विज्ञानाची तत्त्वे आणि त्यांचे सिद्धांत हे सतत बदलत असतात. म्हणून वाङमय हा मानवी जीवनाचा मध्यबिंदू असून विज्ञान हा त्याचा परीघ होय ही गोष्ट ध्यानात घेऊन परीघापेक्षा मध्यबिंदूस अधिक महत्त्व देण्यास आपण शिकले पाहिजे. म्हणजे वाङमयाच्या अभ्यासाची आवश्यकता काय असा निरर्थक प्रश्न उपस्थित करण्याचे प्रयोजनच उरणार नाही.

वरील सर्व विवेचनावरून हे सहज स्पष्ट होते की वाङमयाचा अभ्यास हे मनुष्यजीवनाचे एक अपरिहार्य अंग असून त्याकडे योग्य ते लक्ष पुरविल्याशिवाय मनुष्याची सर्वांगीण प्रगती होणे सर्वथैव अशक्य आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या मिषाने बाबांच्या हातून घडलेले हे लिखाण अनेक वर्षांनी उकरून काढण्यात काय स्वारस्य आहे असा प्रश्न मला आता कोणी विचारला तर मी उत्तरादाखल स्वतःच्या नावाने बाबांचा हा निबंध पाठवून देईन. या विस्तृत लिखाणात एका विस्तृत कालखंडाचे प्रतिबिंब पडले आहे. इतर काही नसले तरी शालेय जीवनाचे, तत्कालीन विचारधारा, तत्कालीन समस्या इत्यादींचे प्रतिबिंब पडले आहे. त्या दृष्टीने हे सर्व वाङमय आहे. ते प्रकाशात यायलाच हवे होते. असो.

आता शालेय स्पर्धांचे स्वरूप बदलले. स्पर्धांची नावे बदलली. स्पर्धांचे उद्देश बदलले. काळाचा ओघच बदलला. हे सर्व लिखाण वाचताना कुठेतरी खोल असे वाटत होते की काळाचा ओघ बदलायला हवा. पण केवळ गंगेचा ओघ बदलायला भगीरथ प्रयत्न लागतात, तेथे काळाचा ओघ कोण बदलेल?


समाजसुधारक ज्योतिबा फुले


इ. स. १८२७ ते १८८० हा ज्योतिबा फुले यांचा जीवनकाल लक्षात घेतला तर त्यांच्या समाजसुधारक कार्याचे मूल्यमापन यथार्थतेने व साकल्याने होऊ शकेल. परकीय सत्तेच्या आगमनाने सर्वत्र पसरलेल्या विकलतेच्या व निराशेच्या अंधःकारात त्यांनी मानव्याची ज्योत जागवली. इंग्रजी सत्ता आणि संस्कृति यांनी आपल्या देशावर गाजविलेला प्रभाव लक्षात घेतल्यास ज्योतिबा फुल्यांच्या कार्याची पार्श्वभूमि लक्षात येऊ शकते. इंग्रजी सत्तेने आपल्या देशात अत्याचार पुष्कळ केले असतील, पण इंग्लिश संस्कृतीने 'मानवत्वाच्या प्रतिष्ठेची जाण' दिली हेही तितकेच खरे.

डाॅ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्यासारख्या एका विचारवंताने तर म्हटले आहे की 'मानवत्वाची प्रतिष्ठा' हे तत्व म्हणजे इंग्रजी संस्कृतीच्या व सत्तेच्या आपल्यावर झालेल्या आक्रमणामुळे झालेल्या विचारमंथनातून निघालेले एक महान रत्न होय.

इंग्रजांच्या पूर्वीचा काळ लक्षात घेतल्यास हे विधान त्या विचारवंताला कां करावेसे वाटले याची नीट संगती लागते. विविध विभिन्न बंधनाच्या तडाख्यात भारतीय समाज पिचला गेला होता. अनेक जाचक बंधनाखाली दडपला गेला होता. स्नानाविषयीचे, भोजनाविषयीचे नियम, स्पृष्यास्पृष्यविचार, स्त्रीविषयीची संकुचित भावना या सर्व बाबींमध्ये माणसाचा माणूस म्हणून विचार केल्या जात नव्हता. माणसाच्या आत्म्याला महत्त्व न देता केवळ शरीराला देण्यात येत होते.

न्यायमूर्ति रानडे, लोकहितवादी, आगरकर, ज्योतिबा फुले, सर सय्यद अहमद वगैरे अनेक समाजसुधारकांनी या बंधनाविरुद्ध आवाज उठवला तो मुख्यतः इंग्रजी संस्कृतीतील विचार त्यांना पटले म्हणून.

ज्योतिबा फुल्यांच्या आयुष्यक्रमाकडे लक्ष दिल्यास हे तत्काल लक्षात येते की आपल्या समाजाचा उद्धार व्हावा, विकास व्हावा, क्रांती घडून यावी म्हणून त्यांनी कळकळीने आणि तळमळीने कार्य केले आहे.

माणुसकीची भावना त्यांच्या ठिकाणी प्रबळ असल्यामुळेच त्यांनी अस्पृश्य लोकांना आपल्या हौदावर पाणी भरण्याची परवानगी दिली. अस्पृष्य हाही माणूसच असतो, त्यालाही भावना असतात हे त्यांनी जाणले. स्त्रीची अशिक्षितता ही तिला परावलंबी बनविण्यास कारणीभूत झालेली आहे हे सुज्ञपणाने ओळखून स्त्रीशिक्षणासाठी पुण्यात पहिली शाळा काढली. बहुजनसमाज हा शिक्षणापासून वंचित असल्यामुळेच त्याला पुष्कळदा 'गुलामगिरी' करावी लागते हे ओळखून १८८२ साली भारताच्या शिक्षणाचा विचार करण्यासाठी नेमल्या गेलेल्या हंटर कमिशनसमोर त्यांनी रोखठोक सांगितले की 'शिक्षणाची उभारणी खालून वर अशी करा. जातिभेद-वर्णभेदांमुळे समाज एकसंघ नाही. म्हणून वरच्या लोकांवर बहुजन समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी टाकू नका. बहुजनसमाजासाठी निदान १२ वर्षांच्या वयापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा.'.

डोक्याला फाटके मुंडासे, खांद्यावर घोंगडी, पायात फाटक्या वहाणा या वेषात ते व्हिक्टोरिया राणीच्या मुलाचा पुणेकरांनी सत्कार केला त्यावेळी गेले. कशासाठी?त्याहीमागे भारतीय जनता कशाप्रकारच्या दारिद्र्यात जीवन कंठीत आहे हे त्या राणीपुत्राला कळावे व या जीवनमानात निदान काही सुधारणा घडून यावी हाच कळकळीचा उद्देश होता.

फुल्यांनी लिहिलेल्या लेखसंग्रहाचे नावच मुळी 'गुलामगिरी'. भारतीय समाज रूढींच्या, आचारविचारांच्या, अशिक्षिततेच्या आणि पारतंत्र्याच्या गुलामगिरीत बघून यापेक्षा समर्पक नाव दुसरे कोणते ठेवावे हाही कदाचित त्यांना प्रश्न पडला असेल.

या विविध बंधनांना झुगारून देऊन फुल्यांना समाजात सुधारणा घडवून आणायची होती. त्यासाठी जबरदस्त चेतावणीची व उठावणीची आवश्यकता होती. फुल्यांनी मुख्यतः धार्मिक बंधनावर हल्ले चढविले. फुल्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून याबाबतीत पुष्कळ प्रेरणा घेतली. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. शाळा काढल्या. त्यासाठी समित्या नेमल्या. त्यात कुठेही ख्रिस्ती मिशनऱ्यांना स्थान नाही. फुल्यांना त्यांच्या सर्व कार्यात समंजस ब्राह्मणांचे पाठबळ मिळाले.

फुल्यांचे वैर ब्राह्मणांशी नसून ब्राह्मण्याशी व म्हणूनच जातिसंस्थेशी होते. ब्राह्मणेतर जनता ब्राह्मण्याच्या धार्मिक नि सामाजिक गुलामगिरीत खितपत होती असे त्यांचे मत व अनुभव होता. त्यांनी ब्राह्मण उपाध्यायांच्या मध्यस्थीशिवाय अगदी अल्पखर्चात अनेक लग्ने लावली. हे अस्पृश्य तुमच्याच रक्ताचे असे म्हणण्याला लागणारी जबरदस्त हिंमत त्यांच्या ठिकाणी होती.

याप्रकारे फुल्यांनी आपल्या समाजसुधारणाविषयक कार्यात मुख्यतः बहुजनसमाजाचे प्रश्न हाताळले. त्यांची दुःखे समजावून घेऊन त्यात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केला.

अशा रीतीने खऱ्या अर्थाने 'माणुसकी जगणारा' आणि जागविणारा ज्योतिबा फुले हा आपल्या देशाला लाभलेला फार मोठा समाजसुधारक होता व त्यामुळेच आजचा काळ घडू शकला असे म्हटल्यास त्यात मुळीच अतिशयोक्ति वाटावयास नको.

फुल्यांचा धर्म सत्यधर्म होता. सत्य जाणण्याची त्यांना उत्सुकता होती. 'निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक । भांडणे अनेक कशासाठी?' हे धर्माविषयी त्यांचे म्हणणे पटण्यासारखेच नव्हे काय? 'सुखे वागवावे पंगु लोका' हाच भूतदयापूर्ण त्यांचा संदेश होता.

फुल्यांच्या काळात समाजसुधारणेतही दोन गट पडलेले आढळतात. एका गटाने पुनर्विवाह, केशवपन, प्रौढविवाह, प्रेमविवाह, बायकांची जाकिटे, बायकांचे जोडे इत्यादि नागर प्रश्नांवर विचार केला. दुसऱ्या गटाने बहुजनसमाजाच्या सुधारणेवर प्रामुख्याने जोर दिला. दुसऱ्या गटात अर्थातच फुल्यांचा समावेश होता.

फुल्यांनी पुष्कळांशी धार्मिक बंधनांवर हल्ले चढविले याचे एक कारण कदाचित असे असू शकेल की त्यांच्या अगोदर लोकहितवादींनी आर्थिक व सामाजिक आघाडी सांभाळली होती. त्याच त्याच गोष्टी वाचाळपणाने सांगण्याची आवश्यकता कदाचित फुल्यांना जाणवली नसावी.

फुल्यांच्या आयुष्याला लोकसेवेच्या व मानवतेच्या दृष्टीकोनातून आलेले महत्त्व त्याकाळचे पुष्कळसे पुढारीही ओळखू शकले नाहीत हे मात्र खरोखरच दुर्दैव आहे.

इंग्रजी राज्य हे ईश्वरी वरदान आहे म्हणून करता येईल तितका स्वविकासाच्या दृष्टीने त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे हा विचार ज्योतिबा मांडत असत. नेमका हाच विचार पुष्कळांना पटला नाही म्हणूनही मतभेद झाले असावेत. पण मतभेद झाले म्हणून फुल्यांचे अविस्मरणीय कार्य दृष्टीआड करण्यासारखे तर नाहीच नाही. उलट शे-सवाशे वर्षांपूर्वी समाजसुधारणेचा डिंडिम त्यांनी दुमदुमविला म्हणून ते अधिकच डोळ्यात भरण्यासारखे आहे. असेही म्हणता येईल की लोकशाहीचे प्रमुख तत्व जे व्यक्तिस्वातंत्र्य ते जवळ आणण्यासाठी ज्योतिबा फुल्यांचा प्रयत्न निःसंशय कारणीभूत झाला.

इथून तिथून एकच परमेश्वरी तत्त्व व्यापलेले आहे हा विचार त्यांनी अंगी मुरविला होता म्हणूनच त्यांना महात्मा म्हणावयाचे.

समाजसुधारणेचे हे असिधाराव्रत आचरीत असतांना त्यांना अतोनात छळ, अवहेलना व मानखंडना सहन करावी लागली. पण ह्या आपत्तींनी पिचून न जाता त्यांनी आपले समाजसुधारणेचे कार्य अधिकच हिरिरीने व जोमाने पुढे चालविले व समाजाच्या रोषाची पर्वा न करता आपली तत्त्वनिष्ठा अढळ राखली. त्यांच्यावर कोसळलेल्या अनेक आपत्तींच्या आगीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सोने अधिकच उजळून निघाले.

न्या. रानडे, आगरकर, महर्षि कर्वे, बॅ. सावरकर, डाॅ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला पुढे जे नेत्रदीपक यश लाभले त्याचे बरेचसे श्रेय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणारे सामाजिक सुधारणेचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांनाच द्यावे लागेल.

टिळक, आगरकर, स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी इत्यादि आपल्या आपल्या कालखंडावर ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिविशेषांवरही बाबांचे अनेक लेख आहेत. स्थळाअभावी त्यांचा या संकलनात समावेश होऊ शकला नाही.

अपघातातून दगावलेल्या इसमाला वाचा फुटली तर!!!


यंदा महापूराने सबंध देशभर जसा कहर उडविला आहे व संहाराचे भीषण थैमान घातले आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या चित्तथरारक अपघातांनीहि आमचा पिच्छा पुरविल्यासारखा दिसतो. एक दोन दिवसाआड कुठल्यातरी भीषण अपघाताची दुःखद वार्ता कानावर येऊन थडकते व चित्ताचा थरकाप उडतो. सुमारे १५ दिवसांपूर्वी वाॅकर रोडवर श्री. भिषिकर यांना झालेला मोटरसायकलचा अपघात आणि त्याच सुमारास कन्हानमध्ये होडी उलटून झालेला अपघात ह्या तर अगदी ताज्या घटना आहेत. आणि त्या आमच्या शहराच्या पंचक्रोशीत घडल्या असल्यामुळे आमच्या विचारांना जोराची गति व चालना दिल्याशिवाय राहात नाहीत. असल्या प्रकारच्या आकस्मिक घटनांनी डोक्यातील विचारचक्राला अनपेक्षित गति मिळाली म्हणजे अनेक प्रश्नचिन्हे डोळ्यासमोर उभी राहतात. 'अपघातात दगावलेल्या इसमाला वाचा फुटली तर!' हा असाच एक प्रश्न आहे.

अपघातात दगावलेल्या इसमाचा मृत्यु हा काही नैसर्गिक मृत्यु नव्हे. कालाने त्याच्यावर घातलेली ती अकाली झडप होय. मनुष्य जेव्हा एखाद्या दुखण्याने आजारी पडतो आणि त्याचे दुखणे जेव्हा विकोपास जाते तेव्हा संबंधातील माणसांना हा आता आपणाला सोडून जाणार अशी कल्पना येऊन जाते. त्याच्या मृत्यूची जणू काय त्यांना नोटीसच मिळते आणि त्याचा वियोग सहन करण्यास त्यांचे मन आपोआपच तयार होत जाते. पण अपघाती मृत्यु कोणत्याहि आगाऊ पूर्वसूचनेशिवाय घडून येतो. ज्याला अपघात घडतो त्याच्यावर जशी आकाशाची कुऱ्हाड कोसळते, तशीच त्याच्या कुटुंबियांवर, नातलगांवर व संबंधितांवरहि कोसळते. अपघातात दगावलेल्या माणसाची सारी सुखस्वप्ने, आशाआकांक्षा, मनोराज्ये व मनोरथ अर्ध्या आडात दोर तोडून टाकावा त्याप्रमाणे भंग पावलेली असतात. अपघातामुळे आकस्मिक मृत्यु येऊन त्याची वाचा बंद पडली असते, पण त्याला जर पुन्हा वाचा फुटली तर तो काय बोलेल व काय सांगेल याची कल्पना करणे मोठेच उद्बोधक ठरणार आहे.

शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे, रस्त्यावरील वाढत्या रहदारीमुळे आणि त्याच्याशी व्यस्त प्रमाणात असणाऱ्या पोलीस बंदोबस्तामुळे, तसेच वाहन चालविणाऱ्यांच्या बेछूट बेपर्वाईमुळे व पादचाऱ्यांच्या हलगर्जी निष्काळजीपणामुळे रस्त्यावरील अपघात घडून येतात. तेव्हा रस्त्यावरील अपघातात दगावलेल्या एखाद्या इसमास वाचा फुटली तर तो अपघाताच्या याच कारणांकडे अंगुलिनिर्देश करून ती नाहिशी करण्यास लोकांना सांगेल हे उघड आहे. खालील आशयाचेच तो काहीतरी बोलेल असे वाटते.

'एका क्षणापूर्वी मी तुमच्या जगात होतो. तुमचा संबंधी होतो. पण दुसऱ्याच क्षणी तुमच्याशी माझा संबंध तुटला. अमुक इतके वाजता घरी परत येईन असे सांगून घरून निघालो पण तितके वाजण्याच्या अगोदरच माझा दुसऱ्या जगाचा प्रवासहि सुरू झाला. माझी जीवनज्योत मालवली. पण इतक्या वर्षांच्या सान्निध्याने निर्माण झालेल्या मायापाशातच माझा जीव अजून अडकलेला आहे. पोलिसांनो! तुम्ही थोडीशी अधिक दक्षता बाळगली असती तर माझा जीव सहज वाचला असता. अमाप माल लादलेली ट्रक चालविणाऱ्या ड्रायव्हरांनो! गाडी हाकतांना थोडा जरी विचार तुम्ही केला असता तरी माझा मृत्यु टळला असता. निवडणुकीच्या वेळी मतदारांना वारेमाप आश्वासने देणाऱ्या नगरपित्यांनो! तुम्ही थोडे जरी आपल्या वचनाला जागला असता तरी हा अपघात टळला असता. जनता आकाशास भिडू पाहणाऱ्या महागाईने आधीच बेजार झाली असतांना तिच्यावरील कराचे ओझे अधिकच वाढविण्यास सवकलेल्या महापौरांनो आणि सरकारी आैंफिसरांनो! नागरिकांकडून कर वसूल करणे एवढेच आपले काम नसून त्याबरोबरच जनहिताच्या अनेक जबाबदाऱ्यांचे उत्तरदायित्व आपणावर आहे अशी जाणीव आपल्या मेंदूला शिवली असती तर माझ्या आयुष्याची दोर अर्ध्यातच तुटली नसती. स्वतःच्या पोटातील पाणी हलू न देता मोटारीतून भरधाव प्रवास करणाऱ्या लक्षाधीशांनो! सडकेवरील पादचाऱ्यांनाही आत्मा असतो याची जाणीव तुम्हाला असती तर मी तुमच्या मोटारीखाली चेंगरलो नसतो. परमेश्वरा! तुझ्या सूर्यमालेत सारे ग्रह आपापल्या कक्षेतून इतक्या नियमबद्धतेने फिरत असतांना व त्यांच्यात कधीही टक्कर झाल्याचे ऐकिवात नसतांना त्यापैकीच एक ग्रह असलेल्या ह्या पृथ्वीवर एवढे उत्पात कां बरे व्हावे? तुझ्या आधिपत्याखाली असलेल्या अनंतकोटी ब्रह्मांडाचा व्यापार इतका सुरळीत चालला असतांना ह्या पृथ्वीवरच इतकी अंदाधुंदी कां बरे असावी? ह्या लोकावरील तुझे लक्ष अलीकडे उडालेले दिसते. तुझी कृपादृष्टी असली तर आमची काही धडगत आहे. तेव्हा बाबा रे! तुला आमची हात जोडून नम्र प्रार्थना आहे की तुझे आमच्यावर पूर्ववत लक्ष असावे. फार काय बोलू? कळावे, लोभ असावा, ही विनंती. आपला, अपघातात दगावलेला, एक इसम.'

रस्त्यावरील अपघाताला जबाबदार असणाऱ्या सर्वांचा थोडक्यात पण खरपूस समाचार घेणारा हा निबंध! शहरातील गर्दी व त्यावरील उपाय, रस्त्यावरील अपघात कसे टाळता येतील?, An accident I have seen या विषयांवरही निबंध आहेत. थोडासा वशिला असता किंवा यातील एखादाही लेख काँग्रेसच्या एखाद्या वृत्तपत्रात प्रसिद्ध जरी झाला असता तर त्या पुण्याईवर बाबा सहज वाहतूकमंत्री झाले असते. पण प्रसिद्धीचे महत्त्व बाबांना कळते तर मला हे पुस्तक प्रसिद्ध करण्याची पाळी येती ना! असो.


मी स्वतंत्र हिंदुस्थानचा पंतप्रधान झालो तर!


आमच्या घरी गेल्या रविवारी एक पाहुणे आले आहेत. मी त्यांना कधीही पाहिले नव्हते. मी बाबांना विचारले 'हे कोण आहेत हो?'. त्यांनी सांगितले 'हे तुझ्या मावशीच्या यजमानांच्या मावशीचे चिरंजीव'. मी आ वासून पहातच राहिलो. 'बाबा नाही माझ्या लक्षात येत हे नाते' मी म्हणालो. 'अरे आजकालच्या पोरांना नाहीच समजायची ही नाती! पूर्वीसारखा आपलेपणा राहिलाच नाही आता. इतकं जवळचं नातं तुझ्या लक्षात नाही येत? काय म्हणावं तुला? अरे ते माझ्या साडभावाचे मावसपुतणे. कळलं आता?', बाबांनी मला विचारलं. मला काही देखील नात्याचा उमज पडला नाही. बरं त्यांचं नातं काही का असेना, त्याच्याशी आपल्याला कर्त्तव्य नाही. सांगायची गोष्ट म्हणजे की ते सदासर्वदा वाद करीत असतात. आणि त्यांचा विषय नेहमी राजकारण असतो. वादविवाद करण्यात त्यांचा सारा वेळ निघून जात असल्यामुळे प्रत्यक्ष कृति त्यांच्या हातून काही होत नाही हा त्यांचा दोष नव्हे हे आपणही कबूल कराल. परवा असाच पाहुणेबुवांचा आणि बाबांचा वादविवाद चालला होता. ऐन रंगात आला होता. पाहुणेबुवा जवाहरलालजींवर खूपच उखडले होते. 'जवाहरलाल नेहरू स्वार्थी आहेत, नेभळे आहेत, जिनांना भितात. ह्यांनीच पाकिस्तान मान्य केलं. ह्यांनीच अखंड हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसला. ह्यांनीच अखंड भारताचं स्वप्न धुळीस मिळवलं. हिंदु प्रजेनं यांच्या खांद्यावर विश्वासानं टाकलेली मान यांनीच कसायाच्या निर्दयतेनं छाटली.'. सारखी आग पाखडत होते! पटरा चालला होता सारखा जिभेचा! 'स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान झाले, पण राष्ट्राची सारी इभ्रत धुळीस मिळवली. जेलमध्ये जाऊन देशसेवेचं सोंग आणावं यांनी. राष्ट्राचं राजकारण खेळायला लायकी असावी लागते म्हटलं!'. जवाहरलालजींचा अनादर मला स्वस्थ बसू देईना. मी झटदिशी समोर होऊन म्हटले 'तुमची काय लायकी आहे हो नेहरूंची लायकी काढायला?'. 'काय लायकी आहे? अरे हिंदुस्थानचे लोक लायक नाहीत. त्यांना माणसांची परख नाही. लोकांना सुबुद्धी सुचली आणि मी स्वतंत्र हिंदुस्थानचा पंतप्रधान झालो तर!'. 'काय कराल हो तुम्ही?'. मी प्रश्न विचारायचाच अवकाश, त्यांची जीभ अशी काही मोकाट सुटली की तब्बल दीड तास तिचं तांडव नृत्य सुरू होतं. कोणाला त्यांनी मध्ये बोलू दिले नाही की प्रश्न विचारू दिले नाहीत. मी त्यांचे भाषण मुकाट्याने ऐकून घेतले. त्यात बऱ्याचशा शिव्या होत्या. पुष्कळशी टीका होती. पण काही सुविचारही होते. त्यांचे काही विचार मला पटलेही. मी विचार केला की आपल्याला शिरोळे चढाओढीत 'मी हिंदुस्थानचा पंतप्रधान झालो तर!' या विषयावर बोलायचेच आहे. तेव्हा पाहुणेबुवांचे जे विचार आपल्याला पटले ते आपल्या भाषणात मांडावे. दरवर्षी नाहीतरी आपण पाहतोच आहो की एकही विद्यार्थी स्वतःचे विचार तेथे मांडत नाही. सर्वजण दुसऱ्यांनी लिहून दिलेले भाषण पाठ करून नाटकी आविर्भावात तिथे म्हणून दाखवितात. आणि त्यापैकीच एखादा बक्षीसही मिळवितो. मग मी कोण्या परक्या माणसाचे नव्हे, तर माझ्या वडिलांच्या साडभावाच्या मावसपुतण्याचे मला पटलेले विचार आपणापुढे मांडले - आणि तेही बहाणा न करता, आपणाला खरी वस्तुस्थिती सांगून आणि शिवाय पाठ न करता - तर काय बिघडले? मला अशी अनपेक्षित मदत केल्यामुळे पाहुणेबुवांचं नातं मला जवळचं वाटू लागलं.

अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि बंधुभगिनींनो! मी स्वतंत्र हिंदुस्थानचा पंतप्रधान झालो तर जवाहरलाल नेहरूंना १५ आॅगस्टपासून चार महिन्यांच्या प्रदीर्घ अवकाशात ज्या गोष्टी साधल्या नाहीत, त्या ताबडतोब करीन. क्षणाचा विलंब न लावता करीन. आम्ही स्वतंत्र झालो. पण पारतंत्र्याच्या खुणा तशाच कायम आहेत. नाणी, पोस्टाची व रेव्हिन्यू तिकिटे, नोटा, त्याच चलनात आहेत. मी त्या ताबडतोब रद्द करून स्वतंत्र हिंदुस्थानची नवीन नाणी, नव्या नोटा, नवी तिकिटे काढीन. स्वातंत्र्याचे शुभागमन ह्याशिवाय सर्व जनतेला जाणवणार कसे? शस्त्राचा कायदा ताबडतोब रद्द करीन व कोणाही इसमाला कोणतेही शस्त्र
कोणत्याही वेळेस आणि कोठेही विनानिर्बंध वापरता येईल असे फर्मान काढीन. हिंदुस्थानचे पौरुष खच्ची करण्याकरिता ब्रिटिशांनी जारी केलेला शस्त्रास्त्रांचा कायदा आमच्या उरावर अजून नाचतो आहे. चार महिने झाले तरी अजून त्याची पकड ढिली होत नाही. काय म्हणावे याला? स्वसंरक्षणाकरिता देखील आम्हाला शस्त्र वापरण्याची परवानगी नाही. नौखाली प्रकरण झाले, पंजाबचे हत्याकांड झाले, काश्मीरवरील स्वारी झाली, पाकिस्तानी पिशाच्चांचा सर्वत्र हैदोस सुरू आहे. अनेक स्त्रियांवर अनन्वित अत्याचार झाले, निरपराध बालकांचे खून झाले, असहाय्य जनतेची सरसहा कत्तल झाली, तरी सहनशीलतेचे घोट आम्हाला पाजण्यात येतात. जनतेच्या हाती शस्त्रे दिली की या सैतानी चाळ्यांना आपोआप पायबंद बसेल.

आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. 'ब्रिटिशांनो चालते व्हा' हा महामंत्र आम्ही जपला. 'चले जाव' करिता बेचाळीसचे रणकंदन झाले. पण मौंटबॅटन हा इंग्रजी माणूस व्हाइसराॅय म्हणून आमच्या डोक्यावर आम्ही स्वखुशीने लादून घेतला. काय आमच्यात लायक माणसे नाहीत? जी हिंदभूमी रामचंद्र, अशोक, शिवाजी, राणाप्रताप, राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या वीरांना प्रसवली ती काय आज वांझ झाली, म्हणून व्हाइसराॅयपदाची धुरा सांभाळायला आम्हाला लायक हिंदी माणूस मिळाला नाही? मला पंतप्रधानकीची वस्त्रे मिळाल्याबरोबर मी लाॅर्ड मौंटबॅटन किंवा त्याच्या वारसदारांना प्रथम गचांडी देऊन सैन्यातील, आरमारातील, हवाईदलातील व मुलकी खात्यातील साऱ्या गोऱ्या आॅफिसरांना बोटीत बसवून इंग्लंडला रवाना करीन. देशात रहायचे असेल तर सामान्य प्रजाजन म्हणून रहा, अधिकारी म्हणून नाही. आणि हे पसंत नसेल तर इंग्लंडची तिकिटे काढा.

काश्मीरवर जे आक्रमण झाले ते पूर्वनियोजित होते, त्यात पाकिस्तानातील अधिकाऱ्यांचा हात होता, ब्रिटिशांचाही त्यात हात होता हे आता सिद्ध झाले आहे. खुद्द जवाहरलाल नेहरू तसे
सांगत आहेत. असे असताना मी थंडाईचे धोरण ठेवले नसते. पाकिस्तानने काश्मीरवर स्वारी केल्याबरोबर किंवा तेथील प्रजेला त्रास दिल्याबरोबर मी पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारून सिंधवर स्वारी केली असती. निजामच्या बाबतीत तसलीच थंड कारवाई चालली आहे. मी असतो तर असं काही केलं असतं की निजाम वठणीवर आला असता. पाकिस्तानमधील अनेक हिंदू लोकांची हत्या झाली. त्यांचे वित्त बरबाद झाले. त्यांच्या स्त्रिया, मुले यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले. घरे जाळली गेली. पाकिस्तानातून हिंदुस्थानात येणाऱ्या आश्रयार्थींना वाटेत लुटण्यात आले. त्यांच्या गाड्या उलटवण्यात आल्या. त्यांचे हाल करण्यात आले. पण या साऱ्या सैतानी कृत्यांबद्दल पाकिस्तान सरकारला काय शासन मिळाले?

वेगळ्याच शैलीत लिहिलेले हे 'कल्पना करा' या सदरात मोडणारे भाषण अपूर्ण आहे. त्याचा उर्वरीत भाग शोधूनही सापडला नाही. हाती सापडेल त्या पाठकोऱ्या चिटोऱ्यावरच बाबांचे बहुतेक लिखाण आहे. एका बाजूला माननीय मुख्याध्यापक साहेबांना एखाद्या पालकाने लिहिलेली मुलाच्या रजेची अर्जी व दुसऱ्या बाजूला गीतेतील चातुर्वर्ण्यावर निबंध असाच एकंदरीत प्रकार आहे. ह्या निबंधाचा नंतरचा भागही अशाच एखाद्या चिटोऱ्यावर लिहिण्यात आला असेल आणि काम झाल्यावर आठवणीने ठेवण्यात आला नसेल. असो. 'मी महानगरपालिकेचा महापौर झालो तर!' असाही एक निबंध आहे. 'वृत्तपत्र नसते तर!' ह्या विषयावरही कल्पनास्त्राचा वापर करण्यात आला आहे. 'तऱ्हेतऱ्हेच्या विषयांवर स्पर्धा झाल्या नसत्या तर!' या विषयावर कल्पनाविस्तार करणे हेच वाचकांच्या हाती आहे.

हिंदुस्थानातील पोषाख


विषय अतिशय व्यापक आहे. हिंदुस्थानइतकाच खरोखरी व्यापक आहे. आणि वेळेचे बंधन सांभाळण्याकरिता मला तो पोशाखाइतकाच सुटसुटीत आणि मर्यादित करावयाचा आहे. ही तारेवरील कसरत मला कशी काय जमते हे ठरविण्याकरिता परीक्षक येथे बसलेलेच आहेत. त्यांचे काम ते करतील, माझे काम मी करतो.

हिंदुस्थानातील पोषाख! हिंदुस्थानातील लोकांचा पोषाख किती वैचित्र्यपूर्ण आहे! स्त्रीपुरुषांचे पोषाख तर निराळे आहेतच, आणि ते सर्वच देशात असतात, पण प्रांतोप्रांतीचे पोषाख निराळे! अशिक्षित आणि सुशिक्षितांचे पोषाख निराळे! निरनिराळ्या धंद्यातील लोकांचे पोषाख वेगवेगळे! इतकेच नव्हे तर आपल्या धर्मग्रंथातून आश्रमपरत्वे सुद्धा पोषाख भिन्न सांगितले आहेत. ब्रह्मचाऱ्याची लंगोटी, गृहस्थाची पागोटी, वानप्रस्थाची काठी आणि संन्याशाची छाटी प्रसिद्धच आहेत. आता हे आश्रमहि राहिले नाहीत आणि त्याचे विशिष्ट पोषाखहि राहिले नाहीत, ही गोष्ट निराळी. आश्रमपरत्वे जशी पोशाखात भिन्नता आहे, तेवढी वर्णपरत्वेहि भिन्नता दिसून येते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचेही पोषाख निरनिराळे आहेत. अशा ह्या वैचित्र्यपूर्ण भारतीय पोषाखांचे आपण ओझरते समालोचन करू.

देशकालपरिस्थित्यनुरूप पोषाखात फरक पडत जातात. आर्यकालीन पोषाख आता राहिला नाही. हिंदुस्थानावरील राजसत्ता जशी बदलत गेली तसा पोशाखहि बदलत गेला. राजसत्तेतील हस्तांतराने पोषाखातही स्थित्यंतर घडवून आणले. मुसलमानांच्या राजवटीत आपल्या पोषाखावर मुसलमानांनी छाप पाडली. इंग्रजांच्या राजवटीत इंग्रजी पोषाखाखाली दडलेली हिंदी शरीरे दिसू लागली आहेत. आंग्ल पद्धतीच्या पोषाखाने नटलेला माणूस पाहिला की तो सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुधारलेला समजण्याची विकृत मनोवृत्ती आपल्या समाजात निर्माण झाली होती, आणि आहे. हल्ली ती झपाट्याने बदलत आहे ही सुदैवाची गोष्ट आहे. शिरस्त्राणातच किती फरक झाला आहे ते पहा. पागोटे जाऊन पगडी आली. पगडी जाऊन फेट्याने आपला पगडा बसवला. फेट्याची जागा टोपीने बळकावली, आणि टोपाला पाहता तिचीही बिचारीची गाळण उडाली. शरीराचा मुख्य भाग जे डोके, त्यानेच इतका थारेपालट केल्यावर बाकीच्या शरीराची काय कथा? अंगरखा, बाराबंदी जाऊन कोट आला, धोतर, विजार, पायजामा, सुतना, पँट अशी वस्त्रांतरे होत गेली. नेकटायने मान आवळून धरली आणि काॅलरने गळफास लावला. उपरणे तर कुठच्या कुठे दडून बसले.

प्रांतोप्रांतीच्या पोषाखाकडे आता मी आपले लक्ष वेधू इच्छितो. सध्या स्त्रीदाक्षिण्याचा काळ आहे, म्हणून प्रथम स्त्रियांचे पोषाख पाहू. आपल्या महाराष्ट्रीयन भगिनींच्या पोषाखात देखील किती बदल घडून आला आहे. चोळीचे पोलके, पोलक्याचे ब्लाऊज, ब्लाऊजचे जंपर आणि त्याच्याही नाना तऱ्हा! कोणाचा बाहीवर फुगा, तर कोणाचा खांद्यावर फुगा, तर कोणाचा उडता काॅलर, तर कोणाच्या उडत्या बाह्या. क्वचित कोठे लुगड्याची जागा गोल साडी घेऊ पहात असली, तरी अजून कासोट्याच्या लुगड्याचेच साम्राज्य आहे. महाराष्ट्रीयन स्त्रिया सोडल्या तर माझ्या निरीक्षणाप्रमाणे बाकीच्या स्त्रियांत कासोट्याच्या लुगड्याची पद्धत नाही. गुजराती, मद्रासी, परदेशी, मारवाडी, बंगाली, रजपूत वगैरे सर्व स्त्रिया पोकळे पातळ नेसतात. छत्तीसगढी स्त्रियांत चोळी घालूच नये असा रिवाज आहे. महाराष्ट्रीय स्त्रियांच्या लुगड्याचा पदर उजव्या खांद्यावर तर गुजराती व मद्रासी स्त्रियांचा डाव्या खांद्यावर. मारवाडी स्त्रियांचा लहंगा व घुंघट, मुसलमानी स्त्रियांचा पडदा. मारवाडी स्त्री आपला बुरखा सांभाळता सांभाळता बेजार होते, तर मुसलमान स्त्रीला जाळीदार डोळ्यातून जग पहावे लागते. चाकू कातऱ्या विकणाऱ्या कांगारिणी तुम्ही पाहिल्याच असतील. त्यांचा पोषाख तरी किती चमत्कारीक असतो? पाठीवर रुळणाऱ्या वेणीच्या बटा, अंगातील पोलके, त्यावर पदर नाही, कमरेला लहंगा. असो. स्त्रियांच्या पोषाखाचे नुसते ओझरते दर्शन करायला गेलो तर इतका विस्तार झाला. आता पुरुषांच्या पोषाखाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.

आपल्या महाराष्ट्रापासूनच सुरुवात करू. साधारणपणे कासोट्याचे धोतर, अंगात कुडते व त्यावरून कोट आणि डोक्यावर टोपी हा सध्याचा रूढ महाराष्ट्रीयन पोषाख आहे. मद्रासी पुरुषाचा पोषाख म्हणजे पोकळे धोतर, अंगात सैल सदरा आणि फक्त काठ दिसेल एवढे रुंद उपरणे. हे बोडखे असतात.

आमच्या बंगाली बंधूंचे पंचांग नसलेले धोतर, बंगाली सदरा हा पोषाख - हे शक्यतोवर पांढरे कपडे घालतात.

पंजाबी लोक ढिला पैजामा वापरतात, आणि अंगात गुडघ््यापर्यंत लांब असा शर्ट घालतात. त्यांच्या शर्टाच्या बाह्या मात्र मनगटाजवळ घट्ट असतात. ते क्वचित कोटही घालतात. डोक्याला जरीची टोपी व भोवती पट्टीदार फेटा बांधतात. पायात लांब टोकाचा जोडा घालतात.

संयुक्त प्रांतातील परदेशी लोक आखूड धोतर नेसतात, अंगात काॅलर नसलेला सदरा घालतात, व डोक्याला जाळीची मलमली टोपी असते. ते बहुतेक हातात उंच काठी बाळगतात.

आपले गुजराती बंधू साधारणतः बंगाल्यांप्रमाणेच पंचांग नसलेले धोतर नेसतात. बंगाली किंवा साधा सदरा, त्यावर जाकिट व वरून लांब कोट असे त्यांचे अंगातील कपडे असतात. डोक्याला साधी टोपी किंवा गुजराती पगडी असते. 

मारवाडवासियांचा थाट काही औरच असतो. ते आपल्या पोषाखाने सहज ओळखू येतात. पंचांग नसलेले धोतर, साधे शर्ट, लंबा कोट, मारवाडी पगडी व एखादा उपरणेवजा रुमाल, असा त्यांचा नमुनेदार बाणा असतो.

रजपूत लोकांचा पोषाखलढाऊ पद्धतीचा असतो. तंग विजार, डोक्यावर राजपुतानी दोन टोके असणारी पगडी, आणि पायात पहेलवानी जोडा असे त्याचे थोडक्यात वर्णन करता येण्यासारखे आहे.

रोहिले लोकांचा पोषाखही मजेदार असतो. त्यांचा तो मजबूत आणि धष्टपुष्ट आंगबांधा, सैलच सैल पायजामा, गुडघ््यापर्यंत लांब असा सदरा, वरून जरीचे जाकिट आणि पोलीस काँस्टेबलच्या पद्धतीची टोपी अशा रुबाबासहित रागाने तो एखाद्याकडे पाहून गरगर डोळे फिरवू लागला, म्हणजे घाबरट लोकांची भीतीने गाळणच उडते.

मुसलमान बंधूंचा पोषाख आपण पाहिलेलाच आहे. मांड्यांवर फुगीर आणि गुडघ््याखाली पोटरी उमटून दिसेल इतकी तंग विजार, मुसलमानी सदरा, जाकिट आणि वरून गुडघ््याच्याही खालपर्यंत लांब बंद काॅलरचा कोट, डोक्याला तुर्की टोपी असा त्यांचा थाट असतो. त्यांना बहुतेक भडक आणि नक्षीदार कपड्यांची आवड असते.

पारशी लोक बहुधा सधन असतात. त्यांचा पोषाख आपण सर्वांनी पाहिलाच आहे. पँट, शर्ट, बहुतेक बंद काॅलरचा कोट, आणि डोक्याला गोल बसकी टोपी असे त्याचे थोडक्यात वर्णन करता येईल. हिंदी ख्रिश्चनांचा पोषाख बहुतेक आंग्ल पद्धतीचा असतो.

आतापर्यंत मी हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रमुख प्रांतवासियांच्या आणि भिन्नधर्मीय लोकांच्या पोषाखाचे यथाशक्ति व यथामति वर्णन केलेले आहे. जातिपरत्वे, धर्मपरत्वे, शिक्षणपरत्वे आणि व्यवसायपरत्वे त्यात पुन्हा शेकडो फरक आहेत. त्या सर्वांचे वर्णन करू गेल्यास १ घंटा लागेल व अध्यक्षांना घंटा वाजवावी लागेल. तेव्हा तो प्रसंग मी अध्यक्षांवर व आपल्यावर ओढवून घेऊ इच्छित नाही आणि लवकरच आपले भाषण आटोपते घेतो.

पोषाखाचा मूलभूत उद्देश लज्जारक्षण आणि थंडी, ऊन, वारा यापासून शरीराचा बचाव करणे हा आहे. या दृष्टीने पाहू जाता आपला हिंदी पोशाखच श्रेष्ठ ठरतो. प्रांतवार जे निरनिराळे पोषाखभेद दिसून येतात त्याचे कारण तेथील भिन्न परिस्थिती आणि हवामान हेच होय. पण अलिकडे विलायती पोषाखाचे अंधानुकरण करण्याची जी प्रवृत्ती आपल्या लोकात दिसून येते ती अत्यंत अनिष्ट आणि स्वाभिमानशून्यतेची निदर्शक आहे. तो पोशाख विलायतेच्या हवामानात जरी योग्य असला तरी आपल्याकडील हवामानाला मुळीच योग्य नाही. असो. आता माझा वेळ संपत आलेला असेल.

मी आतापर्यंत जो थोडाबहुत प्रवास केला त्यात मला आगगाडीत निरनिराळ्या लोकांचे पोशाख पहावयास मिळाले. त्यांचे मी आपल्या चौकस बुद्धीनुसार बारकाईने निरीक्षण केले, ते आज य़ा शिरोळे चढाओढीच्या निमित्ताने माझ्या कामी आले. मिळविलेला अनुभव आणि ज्ञान केव्हाहि वाया जात नाही म्हणतात ते हे असे! आपण माझे भाषण शांतपणाने आणि लक्षपूर्वक ऐकून घेतले, याबद्दल अखिल श्रोतृवृंदाचे आभार मानून मी आपली रजा घेतो.

फाटक्या साडीचे आत्मवृत्त


'संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते' हे भगवद्गीतेचे वचन अगदी अक्षरशः खरे आहे. संभाविताला अपकीर्ति ही मरणापेक्षाहि भयंकर वाटते. मरण पुरवले पण जगात अपकीर्ति नको अशी संभाविताच्या मनाची धारणा असते. अपमानाच्या यातना मोठ्या कठिण असतात. सारी शल्ये बोथट होतील, सारे व्रण बुजतील, पण अपमानाचे शल्य हे नेहमीच बोचत असते. मला याचा पुरेपूर अनुभव आहे.

ज्यांच्या अंगाखांद्यावर मी मानाने मिरविले, ज्यांच्या देहाला आणि अंगकांतीला मी शोभा आणली, ज्यांना मी आपल्या आवरणाने समाजात मानमान्यता प्राप्त करून दिली त्याच आज 'फाटकी साडी' म्हणून माझी अवहेलना करताना पाहून मला किती बरे दुःख होत असेल! परदुःख शीतल असे म्हणतात हेच खरे. माझ्या दुःखाची रोज नवीन नवीन साड्या नेसावयास मिळणाऱ्या या कुर्रेबाज महिलांना काय कल्पना येणार? मला 'फाटकी साडी' म्हणून अडगळीच्या कोपऱ्यात फेकून देण्यात त्यांना मोठी धन्यता वाटत असेल, पण माझी ही अवस्था कोणी केली? त्यांनीच ना? नाहीतर इतक्या लवकर फाटायला मला काय झाले होते?

माझी मालकीण साऱ्या मुलखाची फॅशनेबल! दिवसातून तीनदा साडी बदलायची. मला कितीदा ती साबण लावून गोट्यावर आपटायची आणि कितीदा सोड्याच्या गरम पाण्यात मला उकळायची याला गणतीच नाही. माझ्या अंगाची लाहीलाही होत असे. दगडावर आपटताना कंसाच्या निर्दयतेने ती मला आपटीत असे. इतका मार खाऊनहि पुन्हा मी हसतमुखाने तिच्या सेवेला हजरच राहत असे. पण या सेवेचे चीज मालकिणीला कळले तर ती मालकीण तरी कसली? 'सेवाधर्मः परम गहनः' असे कवि म्हणतात तेच खरे.

आजकालच्या महागाईच्या दिवसात तरी यांनी मला जपून वापरायला हवे होते. कोठे एखादा खोचा लागला किंवा नुसती रंगाची तकाकी जरी फिकी पडली तरी मी त्यांच्या मर्जीतून उतरते व 'फाटकी साडी' या सदरात जमा होते. माझे तुकडे तुकडे करून भांडी पुसण्याकरिता, पोतेऱ्याकरिता देखील माझा उपयोग करावयास कोणी मागेपुढे पाहत नाही. कोणी माझ्या चिंध्यांचा बाहुल्या तयार करण्याच्या कामी तर कोणी महालक्ष्म्यांची धडे तयार करण्याच्या कामी उपयोग करतात. माझी मोठी बहीण जी नऊवारी लुगडे, तिचे दुःख माझ्या मानाने जरा कमीच म्हणावे लागेल, कारण नऊवारी पातळाच्या पोतात, किनारीच्या, रंगाच्या व नक्षीच्या तऱ्हा माझ्या मानाने कमीच. आम्हा पाच-सहा वारी साड्यांची अंतर्बाह्य रूपे सदैव पालटत असतात. नऊवारी पातळांची एकच तऱ्हा पुष्कळ दिवस टिकत असल्यामुळे मालकिणीची मर्जी माझ्या वडील बहिणीवर बरेच दिवस टिकत असे. पण आमचे रंग सरड्याच्या रंगाप्रमाणे नेहमी बदलत असल्यामुळे कोणतीही नवीन तऱ्हा निघाली की जुनी तऱ्हा गिऱ्हाइकांच्या नजरेत भरत नाही. माझ्या कितीतरी बहिणी अशा आहेत की ज्या वास्तविक फाटक्या नसूनही त्यांना फाटकेपणाची अवकळा बळेच सहन करावी लागते. 

मला माझ्या मालकिणीने विकत घेतले ते किती हौशीने! माझे पोत, माझे डिझाईन, माझी किनार व माझा रंग तिला अगदी पसंत पडला होता. मला प्रथम ती किती जपून वापरायची! फक्त कोठे समारंभाकरिता किंवा खास कार्यक्रमाकरिता जातानाच ती माझा उपयोग करायची. घरी आल्यावर मला ती नीट घडी करून कपाटात ठेवायची. पण ही टापटीप फार थोडे दिवस टिकली. बाजारातली फॅशनची तऱ्हा बदलली. आणि माझे नशीबही बदलले. मी मालकीणबाईच्या मर्जीतून उतरले. माझी काळजी घेण्याचे त्यांनी अजिबात सोडून दिले. मला अगदी बेमुर्वतपणे त्या वापरायच्या. मी कोठेही धूळ खात पडायची. हे अपमानाचे जिणे मला अगदी असह्य व्हावयाचे व मुक्या मनाने दुःखाचे कढ काढीत मी बसावयाची. एकदा मोलकरणीने धुता धुता मला कोठे तरी खोचा लावला. झाले! आधीच मी मालकिणीच्या मर्जीतून उतरले होते. एवढेच निमित्त तिला पुरे झाले. माझ्यावर फाटकेपणाचा शिक्का बसला तो कायमचाच. मला वापरणे तिने अगदी सोडून दिले. मला अतिशय दुःख झाले. पण ते बोलून दाखवायचे तरी कोणाजवळ? बरे कोणाजवळही बोलून न दाखविता दुःखाचा उमाळा आतल्या आतच गिळावा तर तेही तापदायक जिव्हाळ्याच्या माणसाजवळ बोलून दाखविल्यानेच दुःख कमी होते. आज तुम्ही माझी आस्थापूर्वक विचारपूस केली म्हणून आपल्या अंतरीचे दुःख मी तुमच्याजवळ बोलून दाखविले एवढेच. त्यामुळे माझ्या मनावरील दुःखाचे दडपण तेवढेच कमी झाले. आपण दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल धन्यवाद.'.

जवळ-जवळ ४५ वर्षांपूर्वीचे हे आत्मवृत्त वाचून मौज वाटली. नागपूरला पाच वारी साडी क्वचितच दिसत असे असा उल्लेख आहे. फॅशन म्हणजे पूर्वी फॅशनबाह्य झालेल्या गोष्टींचा पुनः वापर करणे अशी फॅशनची एक व्याख्या आहे. ती खरीही आहे. म्हणूनच सोनाली-मोनाली जाऊन पुनः मीरा, उमा ही नावे वापरात आली. पण नऊ वारी गेली ती मात्र गेलीच. आणि अशा विषयांवर स्पर्धा भरविणाऱ्यांची व त्यात भाग घेणाऱ्यांची जमात गेली, out of fashion झाली ती झालीच.

फुटक्या आरशाचे आत्मवृत्त


भंगलेली मूर्ति आणि फुटका आरसा यांची जात एकच. भंगलेल्या मूर्तीची पूजा करू नये असे म्हणतात. त्याचप्रमाणे फुटक्या आरशात तोंड पाहू नये असे म्हणतात. ज्या मूर्तीला टाकीचे घाव सोसून देवत्व प्राप्त झाले तिलाच कोठे एखादा वार गेल्याबरोबर तिची देव्हाऱ्यातून उचलबांगडी व्हावी हे दैवदुर्विलसितच नव्हे काय? ज्या देवतेच्या पायावर अनेकांनी लोटांगणे घ््यावीत, जिला माळाफुलांनी सजवावे, षोडषोपचारांनी जिची पूजा करावी आणि जिच्या दर्शनाला भक्तजनांचे थवेच्या थवे रोज लोटावेत, तीच भंगल्यानंतर तिचे भग्न अवशेष कुठेतरी धूळ खात पडलेले दिसतात. तशीच आज माझी स्थिती झालेली आहे. माझे तेज गेले, चैतन्य नाहीसे झाले, ऐश्वर्य लयाला गेले, आणि दारिद्र्य कपाळी जडले. 'हास्याचे दिन मावळले, आसवे लोचनी आली' अशी माझी स्थिति झाली आहे.

मी जेव्हा सुस्थितीत होतो तेव्हा माझा कोण बडेजाव! दिवाणखान्याच्या दर्शनी भागी मी टांगलेला असावयाचा. यौवनाच्या प्रांगणात नुकतेच पदार्पण करणाऱ्या षोडषवर्षा नवयुवतींचा मी अतिशय लाडका असे. त्या माझ्यापुढे तास-अन्-तास उभ्या राहत आणि आपली वेशभूषा, केशभूषा आणि साजशृंगार पुन्हा पुन्हा माझ्यात न्याहाळून पाहण्यात त्यांना दर क्षणी नवीन गोडीचा आल्हाद चाखावयास मिळे. माझ्यात आपला चेहरा न्याहाळला म्हणजे त्यात वस्तुतः नसलेले सौंदर्य असल्याचा त्यांना आभास होई. येता जाता माझ्यात पाहून केसावरून कंगवा फिरविण्याचा त्यांना जणू चाळाच लागून राहिला होता. उपवर तरुणी आणि उपवधु तरुण यांचा माझ्यावर अतिशय जीव जडलेला असायचा. मी जागेवर दिसलो नाही तर त्यांना चुकल्याचुकल्यासारखे वाटायचे आणि आपल्यातच काही व्यंग निर्माण झाले आहे की काय असे त्यांना वाटायचे. प्रौढांना आणि म्हाताऱ्यांना देखील माझ्यात आपले रूप न्याहाळल्यानंतर आपले वय लोक म्हणतात तितके मोठे नाही अशी भावना चाटून जात असे, आणि ते आपल्या कृतांतकटकामलध्वजेवरून मोठ्या डौलाने हात फिरवीत. पोक आलेला पाठीचा कणा थोडासा तरी ताठ होई आणि छाती अभिमानाच्या वाऱ्याने थोडीतरी फुगल्यावाचून राहत नसे. वास्तवतेच्या बोचक अनुभूतिभोवती आकर्षकतेचे एक नवीनच वलय निर्माण करण्यात तर माझा हातखंडाच होता. न्हाव्याच्या दुकानापासून तर देवाच्या मंदिरापर्यंत आणि राजाच्या ऐनेमहालापासून तर मिलमजूराच्या फाटक्या खिशापर्यंत सर्वत्र माझा संचार होता.

पण आज? माझे नशीब फुटले. दिवाणखान्याला रंगसफेदी झाल्यानंतर पुनश्च खुंटीला टांगतांना माझ्यावर जीवाभावाने ममता करणाऱ्या मुलीच्या हातून मी निसटलो. खळ्ळकन आवाज झाला, माझ्या शरीरावर जागोजागी तडे गेले आणि एक तुकडा तर गळून खाली पडला. माझा देह छिन्नविच्छिन्न झाला. त्या मुलीला किती वाईट वाटले म्हणून सांगू? तिने आपल्या उष्ण आसवांनी मला जणु न्हाऊच घातले. पण आता रडून तरी काय उपयोग होता? फुटलेली काच आणि विटलेली मने जोडता येत नाहीत हेच खरे! माझ्यात आपली भ्रामक प्रतिमा पाहून समाधानाचे स्वर्गीय सुख अनुभवणाऱ्या लोकांना माझ्या गुळगुळीत पृष्ठभागामागे लावलेला पारा व सेंदूर दिसून आला. बाहेरून दिवाणखान्यात येणारा प्रत्येक माणूस 'अरे! इथला आरसा काय झाला हो?' असा प्रश्न विचारल्याशिवाय राहत नसे. भिंतीवरची ती जागाच ओकी-ओकी दिसायला लागली. शेवटी घरमालकाला तेथे नवीन आरसा विकत आणून लावावा लागला व मी अडगळीच्या खोलीत धूळ खात पडलो. येता जाता माझ्यात आपले रूप न्याहाळणारा आज माझ्यात ढुंकूनही पाहात नाही. गतकालाच्या स्मृतींची भूते मला कशी भंडावून सोडतात. दिवसातून अनेकवार माझ्यात डोकावून जाणारे ओळखीचे चेहरे .... त्यांचे दर्शनहि आज मला दुर्लभ झाले आहे. ते मालक, ती मालकीण, तो बाळ, ती बेबी, यांची मला आजही किती आठवण येते म्हणून सांगू? पण आता काय उपयोग? माझ्या या दुःखावर काळच विरजण घालील.

अरे हो! पण माझी कूळकथा तुम्हाला सांगावयाचीच राहिली. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे' या उक्तीप्रमाणे वाळूचा तप्त रस भट्टीत तयार होऊन त्यापासून माझा चकचकीत देह तयार झाला. बेल्जमच्या काच कारखान्यात मी जन्माला आलो. माझे दोन प्रकार, साधा आणि बिल्लोरी. बिल्लोरी आरशाला जास्त मान आणि त्याची किंमतही जास्त. माझ्या पाठीवर पाऱ्याचे पूट चढविण्यात आले आणि माझे पारदर्शकत्व जाऊन त्याची जागा परावर्तकत्वाने घेतली. मला एक सुंदर फ्रेम बसविण्यात आली आणि टांगण्याकरिता हूकहि बसविण्यात आले. पेट्या भरभरून देशोदेशी आमची रवानगी झाली. मी माझ्या काही भाऊबंदासहित मुंबई बंदरात येऊन दाखल झालो. एका बड्या व्यापाऱ्याने आम्हाला खरेदी केले व काचेच्या कपाटातून आमचे प्रदर्शन मांडले. माझ्या मालकाने मला खरेदी केले आणि दिवाणखान्यात दर्शनी भागी टांगून ठेवले. पुढचा जीवनवृत्तांत आधीच सांगून टाकला आहे. त्याची पुनरावृत्ती कशाला?

असेच भूकंपग्रस्ताचे आत्मवृत्तहि आहे. या दोन तीन आत्मवृत्तांनंतर तब्बल ४० वर्षांनी बाबांनी आणखी एक आत्मवृत्त लिहिले. ते मज्जीवनमणिमाला नावाने प्रसिद्धीस आले.

रम्य ते बालपण


मी आज आपणासमोर रम्य ते बालपण ह्या विषयावर बोलणार आहे. आम्हा बालांना वक्तृत्वस्पर्धेसाठी हा विषय ठेवण्यात स्पर्धेच्या नियोजकांनी मोठेच औचित्य साधले यात शंका नाही. 'बालादपि सुभाषितं ग्राह्यम्' या न्यायाने आपण माझे भाषण शांतपणे ऐकून घ््याल अशी मी आशा बाळगतो. जन्माच्या स्टेशनावरून मृत्यूचे तिकीट आम्ही काढले आणि काळाच्या आगगाडीत बसलो. आता नाइलाजाने आम्हाला मोठेच व्हावे लागणार. प्रत्येक दिवसाचा मावळणारा सूर्य आमच्या बालपणातील एक एक रम्य दिवस हिरावून नेणार. किती क्रूर आहे नाही काळ? कसा भराभर धावतो आहे!

खरोखर बालपणासारखे रम्य या जगात दुसरे काय आहे? प्रत्यक्ष रामचंद्रांनीहि आपल्या बालपणाची आठवण होताच 'ते हि नो दिवसा गतः' असे खिन्न उद्गार काढावे यात बालपणाची रम्यता, बालपणातील स्वच्छंद आनंद यांचेहि महत्त्व नाही का स्पष्ट होत? वयाने वाढलेला प्रत्येक मनुष्य 'मज अजून आठवे बालपणातील काळ' म्हणून दीर्घ सुस्कारा टाकीत असतो ते काय अगदीच अर्थशून्य आहे? 'आमच्या बालपणी' हे प्रत्येक पितामहाच्या गोष्टीचे पालुपद होऊन बसले आहे ते का विनाकारणच? खरोखरच बालपण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे! लहान मुलांना 'देवाघरची फुले' म्हणतात ते काही उगीच नव्हे. साधी पृथ्वीवरची फुले तरी का कमी रम्य असतात?

बालपण म्हणजे आयुष्याची सुरुवात. कोणत्याहि गोष्टीची सुरुवात किती मोहक असते! ना काळजी, ना चिंता, ना अडचणी, ना संकट. किती मनोहर जीवन! खावे, प्यावे, नाचावे, बागडावे, उडावे, पडावे, गाणी गावी, फुलपाखरामागे धावावे, याशिवाय दुसरा उद्योग नाही. कल्पनेच्या साम्राज्यात मनसोक्त विहार करावा, आईवडिलांना नाना तऱ्हेचे प्रश्न विचारून भंडावून सोडावे. खेळगड्यासवे क्रीडा कराव्या, आईचा लटका मार खावा आणि सौख्यसागरी बुडी मारून निजानंदी तल्लीन व्हावे. या साऱ्या गोष्टींची रमणीयता, खरे रम्यत्व हे अंतिम ध्येयसिद्धीत साठवले आहे, आणि त्यासाठी यशस्वी वाटचाल आम्ही करणार. संपत आलेल्या बालपणासाठी रडून आम्हाला आता काय लाभणार आहे?

आणि रमणीयता ही काय आयुष्याच्या एका विशिष्ट कालखंडावर अवलंबून असते? रम्यपणाचा संबंध मनुष्याच्या भावनेशी आहे. बालपणाशी त्याचा काडीमात्रहि संबंध नाही. जो तो या जगतावर आपल्याच मनाची छाया पसरतो आणि जग हे ओसाड वाळवंट आहे म्हणून रडगाणे गात सुटतो. 'निश्वासे तुमच्याच सृष्टि करपे' गोविंदाग्रजांनी सांगितले ते काय खोटे आहे? मोठे होऊनही जगातील रम्यत्वाची अवीट गोडी आम्हाला चाखता येईल. बालपणासाठीच विलाप करण्याचे खरोखरीच काही एक कारण नाही. आम्ही देवाची लेकरे आहोत. बालपण जर खरेच रम्य असते आणि बाकीच्या जीवनात रम्यत्वाचा संपूर्ण अभाव असता तर परमेश्वराने आम्हाला अखंड बालपणच नसते का दिले? परमेश्वर जे काही करतो ते आमच्या हितासाठीच नाही का करीत? मग आम्ही त्याच्या कृतीला दोष कां बरे लावावा? माणसाचे आयुष्य हे एक उद्यान आहे. त्याचे उजाड माळरान करणे किंवा त्याचे रमणीयत्व वाढवीत वाढवीत सर्वोच्च स्थितीत नेऊन पोहोचविणे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याच हाती आहेत. मग आयुष्यभर जगातील रमणीयत्व आपणास चाखता न आले, आपले सारे आयुष्य रम्य न बनविता आले तर तो आपलाच दोष नाही काय?

हे भाषण टंकलिखित करताना बाबांच्या आत्मचरित्रावर भोपाळवासी, प्रथितयश कवि व लेखक श्री. मा. गो. जामदार यांनी लिहिलेल्या समीक्षेतील त्यांच्याच (श्री. जामदार यांच्या) एका कवितेतील ओळी मनात घोळत होत्या.

प्रवास जाहला सुरू
म्हणून लागला सरू
'सुरू-सरू'तले भले
बुरे कसे टळायचे?


इतिहासावरून घ््यावयाचा बोध


विषय जरी आम्हा लहान लहान मुलांकरिता ठेवलेला असला, तरी विषय नेमणाऱ्यांनीहि त्यावर विचार करावा या योग्यतेचा भारदस्त असा हा विषय आहे. आत्मश्लाघेचा ठपका पत्करून देखील मला असे म्हणावेसे वाटते की, 'बालादपि सुभाषितं ग्राह्यम्' या न्यायाने आमच्यापासून काही विचार घेता आले तर पहावे हाहि विचार कदाचित विषय ठेवणाऱ्यांच्या डोक्यात असेल, नाही असे नाही. काही का असेना, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदुस्थानच्या सध्याच्या संक्रमण काळात तर अत्यंत विचारपात्र आहे. आमच्या सारख्या लहान मुलांना, हिंदुस्थानच्या भावी नागरिकांना, स्वतंत्र हिंदुस्थानच्या भावी तरुण पिढीला वक्तृत्व चढाओढीच्या निमित्ताने का होईना, पण अशा मूलग्राही व गंभीर विषयावर स्वतंत्र विचार करावयास आपण प्रवृत्त केले, याबद्दल अखिल विद्यार्थी वर्गातर्फे मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो.

इतिहासावरून घ््यावयाचा बोध! राष्ट्राचा गतेतिहास, मेलेली मढी! काय करायची ती उकरून? शिळ्या कढीला ऊत आणून काय करायचे? आम्ही जिवंत इतिहास निर्माण करणार! गेल्या गोष्टी भूतकाळात जमा झाल्या. पूर्वजांचे वैभव आठवून अश्रू ढाळणे आणि त्यांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांना शिव्या हासडणे - दोन्हीही नादानपणाची लक्षणे होत. काय करायचे ते आम्ही करणार. आमचे राष्ट्र आमच्या प्रयत्नांनी आम्ही वैभवाला चढविणार! असे कित्येक म्हणतात. पण बाबांनो! ही त्यांची आत्मप्रौढी आहे. त्यांचा उद्देश स्तुत्य असेल. देशाविषयीची कळकळ प्रश्नातीत असेल. पण भूतकाळातील इतिहासाविषयीची बेपर्वाई आक्षेपजनक आहे. स्वतःच्या आणि राष्ट्राच्या पायावर धोंडा पाडून घेणारी आहे. आपण इतिहासापासून बोध घेतला नाही म्हणून हिंदुस्थानची ही अवस्था झाली. १५ आॅगस्ट १९४७ ला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले व त्याच दिवशी हिंदुस्थानचे दोन तुकडे झाले. शिरापासून धड वेगळे झाले. अखंड हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसल्या गेला. आणि त्यानंतरची अनर्थपरंपरा, अनन्वित अत्याचार आणि क्रौर्यालाहि लाजविणारी अमानुष क्रूरता हे सारे प्रकार अजून शिळे झाले नाहीत. ते भडक कुंचल्याने रंगवून जातीय वणवा अधिक भडकविण्याचा माझा उद्देश नाही. माझे प्रांजळ मत एवढेच की, ही अनर्थपरंपरा जर कशाने ओढविली असेल तर इतिहासापासून घ््यावयाचा बोध न घेतल्याने.

ब्रिटिशांचा कावेबाजपणा आणि नीच मुत्सद्देगिरी आख्या जगाला माहित आहे. आयर्लंडला स्वातंत्र्य देताना त्यांनी तेच केले. तेथे अल्स्टर निर्माण केले. इजिप्तमध्ये तेच केले. पॅलेस्टाईनमध्ये तेच केले. स्वातंत्र्य देण्याचा बहाणा करून स्वातंत्र्याचा मुडदा पाडला. पण त्यांचा हा कावा आम्ही ओळखला नाही. इतिहासाचा आम्हाला विसर पडला. इतिहासाची पुनरावृत्ति होत असते, हे तत्त्व नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. राष्ट्रविभाजनाला आम्ही संमति दिली. गळात मासा अडकला. शत्रूंचे फावले पण आम्हाला भोवले! हे सारे कसे घडले? आणि कां घडले. इतिहासाच्या शिकवणुकीकडे आमचे दुर्लक्ष झाले म्हणून.

जुने वैभव आठवून शोक करणे, आणि पूर्वजांच्या चुकांबद्दल त्यांना दोष देणे हा नामर्दपणा होय हे आम्हालाही मान्य आहे. पण पूर्वजांचे वैभव आठवून तसे वैभव पुन्हा मायदेशाला प्राप्त करून देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे, शिवाजी, राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे, गुरु गोविंदसिंग व गुरु बंदा ह्याच्या शौर्यकृत्यांनी स्फुरित होऊन राष्ट्रशत्रूचा निःपात करण्याची शपथ घेणे, पूर्वजांच्या हातून कोणत्या चुका घडल्या त्यांचे नीट परिशीलन करून तसल्या चुका आपल्या हातून इतःपर होऊ न देण्याची खबरदारी घेणे - हा बोध तर प्रत्येक राष्ट्रभक्ताने इतिहासापासून अवश्य घ््यावयालाच पाहिजे.

थोर महात्मे होउनि गेले । चरित्र त्यांचे पहा जरा ।।
आपण त्यांच्या समान व्हावे । हाच सापडे बोध खरा ।।

हा इतिहासापासून घ््यावयाचा मुख्य बोध आहे.

तसेच 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' ह्या दृष्टीनेही इतिहासाचे परिशीलन आवश्यक आहे. जगाच्या इतिहासाचा अभ्यास अशा रीतीने करायला पाहिजे. निरनिराळ्या राष्ट्रांचा इतिहास अशा दृष्टीने चाळायला पाहिजे. शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखायला पाहिजे.

इतिहासापासून स्फूर्ति घ््यायला पाहिजे. निश्चय बाणायला पाहिजे. नैराश्य झडा़़यला पाहिजे. शूरांची चरित्रे वाचून भावना उद्दीपित झाल्या पाहिजेत, बाहू स्फुरण पावले पाहिजेत, हिंमत वाढली पाहिजे. दुष्ट क्रूरकर्म्यांची चरित्रे वाचून अन्यायाची चीड निर्माण झाली पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसत असेल तिथे तिथे हिरीरीने त्याचा प्रतिकार करण्याची धमक अंगी बाणली पाहिजे. निरनिराळ्या राष्ट्रांनी स्वातंत्र्य कसे मिळविले आणि ते कसे राखले, आपले राष्ट्र वैभवाप्रत कसे नेले, याचे बारकाईने निरीक्षण करून आपल्या संस्कृतीशी जुळेल अशा रीतीने आपणही देशोन्नतीचे प्रयत्न केले पाहिजेत. आपण स्वातंत्र्य मिळविले आहे ते चिरकाल टिकविले पाहिजे. स्वतंत्र भारत यापुढे कोणाचीही शागिर्दी करणार नाही, कोणापुढेही मान तुकविणार नाही. जगाच्या तो गुरुस्थानी राहील व अखिल जगाला त्याची आदरयुक्त भीति वाटेल, भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची छाती होणार नाही, असे रम्य स्वप्न आपणाला सत्य सृष्टीत उतरवायचे आहे. एकेकाळी वैभवाच्या शिखरावर आरूढ झालेल्या हिंदुस्थानला पुनश्च त्याचे मानाचे स्थान प्राप्त करून देण्याचा आपल्याला निर्धार करावयाचा आहे. आणि ह्याची स्फूर्ति भूतकालीन इतिहासापासून आपणाला मिळण्यासारखी आहे. इतिहास हा स्फूर्तीचा झरा आहे. अनुभवाचा साठा आहे. प्रत्येक नवीन पिढी जुन्या पिढ्यांचा अनुभव पदरी बांधून जन्माला येत असते, आणि स्वतः गारद होतांना जगाच्या अनुभवात नवीन भर घालून जात असते. तेव्हा गतेतिहासापासून आम्हाला काही शिकण्यासारखे नाही असे म्हणणे म्हणजे निव्वळ कृतघ््नपणा होय. आमचा इतिहास आम्हाला सांगतो की आमचा प्राचीन काळ दिव्य होता, आणि म्हणूनच आम्हाला खात्री आहे की आमचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे.

पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ ।
बोध हाच इतिहासाचा सदा सर्व काळ ।।

लहान वयाच्या स्पर्धकांकरिता लिहिलेली पण त्यांच्या वयाच्या मानाने जरा बोजडच वाटणारी ही दोन भाषणे आजही एकही शब्द इकडचा तिकडे न करता खपवली जाऊ शकतात. अडचण एवढीच की आता स्पर्धाच होत नाहीत. झाल्या तरी मराठी माध्यमातून कमीच होतात. आणि त्यातही असे विषय क्वचितच असतात. उच्च प्रतीच्या स्पर्धा व स्पर्धकांचा पूर्व दिव्य काळ आपला होता. इतिहासाचा सदा सर्वदा बोध हाच आहे की भावी काळही रम्य असेल. दुर्दैवाने सध्या वर्तमानकाळ सुरू आहे.

भारतीय एकात्मतेचे शत्रू


भारताच्या राष्ट्रपतीपासून तो शासनयंत्रणेतील निम्नश्रेणीच्या अधिकाऱ्यापर्यंत, महामंत्र्यापासून तो प्रांतोप्रांतीच्या सचिव-उपसचिवांपर्यंत, जनमनावर अधिराज्य गाजविणाऱ्या राष्ट्रनेत्यापासून तो गावोगाव विखुरलेल्या ग्रामनेत्यांपर्यंत सर्वांच्या तोंडी जर आज कोणती गोष्ट असेल तर ती 'भारतीय एकात्मता' ही होय. जो तो भारत एकात्म राष्ट्र झाले पाहिजे असा सारी शक्ति एकवटून कंठशोष करीत आहे. भारतीय एकात्मता कशी प्रस्थापित होईल याचा विचारविमर्श करण्याकरिता सभा, संमेलने, परिषदा भरविण्यात येत आहेत. चिनी आक्रमणामुळे तर एकात्मतेची आवश्यकता अधिकच तीव्रतेने जाणवत आहे. सर्व जातिभेद, पंथभेद, धर्मभेद, भाषाभेद, पक्षभेद आणि वर्गभेद यांचे ओहळ राष्ट्रीय एकात्मतेच्या विशाल सागरात विलीन झाल्याशिवाय शत्रूचा मुकाबला यशस्वी रीतीने करता येणे सर्वथैव अशक्य आहे हे उघड सत्य आहे. राष्ट्रहितावर अविचल दृष्टी ठेवून, सर्व क्षुल्लक मतभेद बाजूला सारून भारताच्या स्वातंत्र्याच्या मारेकऱ्याविरुद्ध एकमताने व वज्रकठोर दृढनिश्चयाने रणांगणात उभे ठाकल्याशिवाय तरणोपाय नाही अशी सद्यपरिस्थितीची चेतावणी आहे.

पण ही एकात्मता म्हणजे आहे तरी काय आणि तिच्या अंगभूत गोष्टी कोणत्या याचा विचार करणे अगत्याचे आहे. राष्ट्रीय एकात्मता ही सभासंमेलनातील ठरावांनी आणि वृत्तपत्रातील अग्रलेखांनी आकारास येणारी गोष्ट नव्हे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे प्रत्येक व्यक्ति ही राष्ट्रपुरुषाच्या विशाल शरीराचा एक अवयव आहे अशी जिवंत जाणीव, व्यक्तिहिताचे राष्ट्रहितात विलीनीकरण. राष्ट्राच्या सुखदुःखाची स्पंदने व्यक्तीच्या अंतरंगात उमटली पाहिजेत. राष्ट्राच्या बलिवेदीवर स्वार्थाची आहुति देण्यास प्रत्येक राष्ट्रघटक सदैव सज्ज असला पाहिजे. राष्ट्रहिताच्या विचारालाच अग्रप्राधान्य दिले पाहिजे. येथून तेथून सारे राष्ट्र एकजिनसी आहे याचा सर्वत्र प्रत्यय आला पाहिजे. राष्ट्राच्या कोणत्याही भागावर आघात झाला तरी त्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिकाराचे पडसाद उमटले पाहिजेत. व्यापक राष्ट्रहिताच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट व्यक्तिमात्राने बुद्धिपुरस्सर टाळली पाहिजे. पायाला ठेच लागली तर डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात आणि हात तेथे पट्टी बांधण्यास सरसावतात, तद्वतच हिमालयावर आक्रमण झाले तर सह्याद्रीच्या कडेकपारावरील काळा फत्तर आपल्या छातीचा कोट करून शत्रूच्या प्रतिकारार्थ पुढे सरसावला पाहिजे. असे झाले तर ती खरी भारतीय एकात्मता!

आणि अशा एकात्मतेचा प्रत्यय भारतीय जीवनात सध्या काही प्रमाणात येतहि आहे. भारतात हजार जाती आहेत, लाख पंथ आहेत आणि कित्येक पक्ष आहेत. पण लाल चीनच्या पिवळ्या संकटाची काळी छाया भारतावर पडताच संघटनेचा सूर्य कधी नव्हता इतक्या प्रखर तेजाने भारतांत तळपू लागला. चीनच्या रूपाने सामान्य शत्रू समोर उभा ठाकताच 'वयं पंचाधिकं शतं' अशी प्रतीति येऊ लागली. पण असे सामान्य संकट सदासर्वकाळ थोडेच कायम टिकणार आहे? आणीबाणीची परिस्थिति निर्माण होताच एकात्मतेचा प्रत्यय अाला. तेव्हा ही आणीबाणी दीर्घकाळ टिकविण्याचे - निदान जनमनाला तसे भासविण्याचे सरकारचे प्रयत्न चालू आहेत. आणीबाणीची परिस्थिति नेहमी कायम राहणे शक्य नाही, पण एकात्मता मात्र अखंड कायम राहिली पाहिजे. तेव्हा भारतीय एकात्मतेच्या मार्गात कोणकोणत्या अडचणी आणि विघ््ने आहेत किंवा भारतीय एकात्मतेचे शत्रू कोणते याचा विचार करून त्यांचा निकाल कसा लावता येईल याचा विचार करू या.

भारत हा खंडप्राय देश आहे. इंग्लंड, फ्रांस, हाॅलंड, बेल्जियम. जपान किंवा जर्मनी इत्यादि देशांपेक्षा भारताचा एकेक प्रांत देखील मोठा येईल. तेव्हा भारताची ही विस्तीर्णताच कित्येकदा एकात्मतेच्या आड येते. मतस्वातंत्र्य, उपासनास्वातंत्र्य, पूजास्वातंत्र्य यांना भारतीय संस्कृतीत कधीही मज्जाव नव्हता. किंबहुना तेच हिंदु धर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे असे म्हटल्यास अधिक सयुक्तिक होईल. युरोपमध्ये जसे प्रोटेस्टंटांना जाहीर रीतीने जाळण्यात आले तसा अनन्वित अणि अमानुष छळ विरोधी मत प्रतिपादन करणाऱ्यांचा हिंदुस्थानात कधीहि झाला नाही. चार्वाकासारख्या नास्तिकालाहि भारतीय संस्कृतीने दर्शनकार मानले. हिंदुस्थानचे धोरण सर्वसमन्वयाचे आहे. पण याचा परिणाम असा झाला की नाना प्रकारचे पंथ अस्तित्वात आले. जैन, बौद्ध, शीख हे तर सोडाच, पण शुद्धाद्वैत, विशिष्टाद्वैत, शैव, वैष्णव, शाक्त, नाथ, महानुभाव असे असंख्य पंथांचे पीक देशात वारेमाप फोफावले. प्रत्येकाचे तत्त्वज्ञान वेगळे आणि आचारधर्महि वेगळा. ही विविधताच एकात्मतेच्या मार्गातील अनिवार्य धोंड होऊन बसली. भारतात अठरा पगड जाती, छप्पन्न भाषा व शेकडो पोशाखाच्या तऱ्हा अाहेत. त्यात पुन्हा रोटीबेटी व्यवहाराचे निर्बंध, स्पर्शास्पर्श विचार, विधिनिषेधाच्या कल्पना आणि उच्चनीचतेच्या भावना यांनी तर कहर केला आहे. स्वामी विवेकानंदांनी अामचा सध्याचा हिंदुधर्म म्हणजे 'Kitchen-pot religion आणि 'Don't touchism' झाला आहे असे जे उपहासगर्भ उद्गार काढले त्यातील इंगित हेच. या सर्वांचा अवश्यंभावी परिणाम असा झाला की फुटीर वृत्ति बळावली. राष्ट्रासमोर सामान्य संकट उपस्थित होताच जरी एकात्मतेचा काहीसा साक्षात्कार दृग्गोचर झाला तरी तो अल्पजीवी ठरतो आणि संकटाच्या समाप्तीबरोबरच फुटीर वृत्ति पुनश्च अापले डोके वर काढतात. भाऊबंदकी तर हिंदुस्थानच्या पाचवीलाच पुजली आहे हे भारतीय युद्धावरून स्पष्टच होते. अापसातील भांडणाचा निकाल लावण्यासांठी परक्यांची मदत घेणे ही वृत्तिहि आम्हा भारतीयांच्या रोमरोमात भिनली अाहे. पृथ्विराज चव्हाण आणि जयचंद राठोड यांचा इतिहास हेच दर्शवीत नाही काय? एक धर्म आणि एक भाषा ही कोणत्याही देशाला राष्ट्रत्व प्राप्त होण्याची अनिवार्य अट मानण्यात येते. भारताचा अपवाद वगळला तर जगाच्या पाठीवरील यच्चयावत राष्ट्रात ही एकधर्माची आणि एकभाषेची अट पूर्णत्वाने वसत असलेली दिसून येते. भारतात मात्र ती अभावानेच वसत आहे. जातीजातीतील वैमनस्ये, हिंदु मुसलमानांचे दंगे यांना तर ब्रिटिश आमदानीत ऊत आला होता. इंग्रजांची 'फोडा आणि झोडा' ही कुटिल राजनीतिहि त्याला जबाबदार असेल, नाही असे नाही. पण अखेरीस त्याचा परिणाम द्विराष्ट्रवादात झाला आणि पाकिस्तान हे वेगळे राष्ट्र निर्माण होऊन अखंड भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्या गेला. पाकिस्तान ही हिंदुस्थान सरकारला कशी कायमची डोकेदुखी होऊन बसली आहे ते नव्याने सांगण्याची गरज नाही. द्विराष्ट्रवादाची जागा अनेकराष्ट्रवाद घेईल की काय अशी साधार भीति वाटू लागण्यासारख्या घटना नजीकच्या भूतकाळात घडल्या आहेत आणि घडत आहेत. शीखांचे शीखस्थान, द्रविडांचे द्रविडस्थान आणि नागांचे वेगळे राज्य या चळवळी काय दर्शवितात? भाषावादाचेहि अत्युग्र स्वरूप आपण संयुक्त महाराष्ट्राच्या आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळीच्या निमित्ताने अनुभविलेले आहे. या साऱ्या विषवल्लींचे निर्मूलन झाल्याशिवाय भारतीय एकात्मतेचा वृक्ष निरामयतेने फोफावणार नाही.

राजकीय पक्ष देखील हिंदुस्थानात विकृत आणि विघातक स्वरूप धारण करीत आहेत आणि भारतीय एकात्मतेला सुरुंग लावीत आहेत. 'जो तो म्हणे मीच शहाणा' अशी एकंदर स्थिति आहे. निवडणुकीच्या वेळी राजकारणाच्या रिंगणात उतरलेले हे पक्ष एकमेकावर कशी चिखलफेक करतात आणि एकमेकांविरुद्ध कसे गरळ ओकतात हे सर्वविदितच आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास आणि आरोप प्रत्यारोपांची देवाणघेवाण ही तर नित्याचीच बाब झाली आहे. आणि सर्वांवर कळस म्हणजे कम्युनिस्टांसारख्यांच्या पंचमस्तंभी कारवाया. हिंदुस्थानचे हित त्यांच्या डोळ्यासमोर नसते, तर रशियाच्या अनुरोधाने त्यांच्या सर्व कारवाया चाललेल्या असतात. चीन व हिंदुस्थान यांच्या भांडणात कम्युनिस्टांचा कल चीनकडे आहे हे उघड सत्य आहे. ही सारी विषबीजे वेळीच खणून काढण्यात आली नाहीत तर भारतीय एकात्मता ही स्वप्नवत ठरणार आहे.

ब्रिटिश आमदानीच्या पूर्वी निरंकुश एकछत्री साम्राज्याचा अनुभव भारताने क्वचितच घेतला. सम्राट अशोक हाच काय तो याला म्हणण्यासारखा एकमेव अपवाद. मराठ्यांचे घोडे सिंधुनदीला पाणी प्याले आणि पेशव्यांनी अटकेपार झेंडे नाचविले, पण शिंदे, होळकर, गायकवाड यांच्यासारखी आपल्याच अभिनिवेशात गर्क असलेली तुटक तुटक राज्ये, दुर्बळ केंद्रसत्ता आणि विघटनात्मक प्रवृत्ति असाच सर्वत्र थाट होता. एकंदरीत एकात्मतेची भावना भारतात कधीच प्रयत्नपूर्वक जोपासली गेली नाही असे मोठ्या खेदाने म्हणणे प्राप्त आहे.

आपल्या सुदैवाने आज आपण स्वतंत्र आहोत. ब्रिटीशांच्या आमदानीत, पारतंत्र्यात का होईना, दीडशे वर्षे आपण एकछत्री अंमलाखाली नांदलो ही इष्टापत्तीच म्हटली पाहिजे. साऱ्या भारत भाषांची जननी जी संस्कृत ती भारतीयांची आद्यभाषा आहे. हिंदुधर्म हा बहुजनसमुदा़याचा धर्म आहे. गंगा सिंधूच्या तीरावर स्थिरपद झालेल्या अार्यसंस्कृतीचे आम्ही सर्व वारसदार आहोत. गंगायमुनांना आम्ही पवित्र मानतो. रामकृष्णांना अवतार समजतो. वेद हे आमचे पवित्र धर्मग्रंथ. भगवद्गीता हा आमचा व्यवहारधर्म. गाय ही आम्हाला मातेसमान पूज्य. हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे. तेव्हा भारताच्या संकीर्णतेतहि एक प्रकारची सुसंगतता आहे, विसंवादातही संवाद आहे, भेदातहि साम्य आहे, विविधतेतहि एकता आहे. इंद्रधनुष्याचे सप्तरंग हे ज्याप्रमाणे एकाच सूर्यप्रकाशाच्या विविध छटा, त्याचप्रमाणे भारतातील विविध कर्म, पंथ आणि परंपरा ह्या एकाच सत्याचे विविध आविष्कार होत. अशा समन्वयी दृष्टिकोनातून विचार करण्याची मनाला सवय लावल्यास आणि आम्ही सर्व प्रथम भारतीय व नंतर सर्व काही अशी वास्तव भूमिका धारण केल्यास स्वामी विवेकानंद व रविंद्रनाथ टागोर यांनी आपल्या लिखाणातून व काव्यातून उद्घोषिलेले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लो. टिळक आणि महात्मा गांधी यांनी जोपासलेले व पं. जवाहरलाल नेहरू सारख्या राष्ट्रनेत्यांनी उराशी बाळगलेले भारतीय एकात्मतेचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही.

सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर बाबांनी अनेक भाषणे, भांडणे व निबंध लिहिले. काही निवडक शीर्षकांचा उल्लेख मुद्दाम करीत आहे. स्वराज्यात सामाजिक सुधारणांना गौण स्थान आहे (परिसंवाद), कृषिप्रधान देशात भूदानाला अत्यंत महत्त्वाचे गणल्या जाणे साहजिकच आहे (वादविवाद, समर्थन), आंतरराष्ट्रीय समस्याओंके लिए युद्धहि एकमात्र उपाय है (वादविवाद, विरोध), भारतात आधुनिक उद्योगधंद्यांचे स्थान (भाषण), आजच्या जगात विज्ञानाने केलेली प्रगति (निबंध), Food problem (निबंध), Compulsory military training (निबंध), भारतावरील आक्रमण (निबंध), भारतातील भाषावाद (निबंध), Education in India (निबंध), राष्ट्र की उन्नतिके लिए सतोगुण की अपेक्षा रजोगुण की अधिक आवश्यकता है (वादविवाद, समर्थन) इत्यादि. या सर्वांचा गोपालकाल्यात समावेश आहे असे समजून घेणे.

विद्यार्थी जीवन


बालपणातील किंवा तारुण्याच्या सीमेवरील विद्यार्थीदशेचे दिवस आठवले म्हणजे अजूनही मन कसे आनंदाने मोहरून जाते! तेव्हाच्या त्या रम्य आठवणी चित्तात येऊ लागल्या, म्हणजे त्यांच्या हिंदोळ्यावर मन हेलकावे खाऊ लागते आणि त्याच नादात तल्लीन होऊन जाते. विद्यार्थी दशेतले ते दिवसच तसे मजेचे आणि आनंदाचे असतात. हृदयाला घरे पाडणाऱ्या चिंता त्यावेळी नसतात, किंवा जीवन करपवून टाकणाऱ्या विवंचनांचा ससेमिराहि नसतो. किती निश्चिंत आणि विवंचनारहित जीवन असते ते आणि म्हणूनच किती आनंदी आणि मोकळे! किती अल्लड अाणि अवखळ! किती स्वैर आणि स्वतंत्र! चित्ताला चिंतेचे बंध त्यावेळी नसतात, किंवा मनाला मरणाची भीतिहि नसते. तीरावरील वृक्षलतांशी गूढगुंजन करीत, आणि मार्गात आडव्या येणाऱ्या अडथळ्यांना झुगारून देत स्वैरपणाने आपला मार्ग आक्रमिणाऱ्या अवखळ ओढ्‌याप्रमाणे असते ते जीवन. अजूनहि बालपणातले किंवा विद्यार्थी दशेतले सोबती सवंगडी काही दिवसांनी भेटले म्हणजे त्याकाळच्या अाठवणी काढण्यात चित्ताचे भान कसे हरपून जाते याचा अनुभव कोणाला नसेल? गप्पांना ऊत येतो आणि गोष्टींना पूर येतो. रात्रीच्या जेवणानंतर एकदा का गोष्टी सुरू झाल्या म्हणजे रात्र सरून जाते पण गोष्टी संपत नाहीत. फारा दिवसांनी भेटलेल्या रामसीतेबद्दल 'अविदितगतयामा रात्रीरेवव्यरंसीत्' असे जे उद्‌गार भवभूतीने काढले ते फारा दिवसांनी भेटलेल्या या वालमित्रांनाहि लागू पडतात. स्वैरपणे हसावे, खेळावे, उडावे, नाचावे, विद्याभ्यास करावा. आईबापांच्या प्रेमाची पखरण वरून असतेच. संसाराची जबाबदारी अंगावर येऊन पडलेल्या संसारी जीवांच्या बाह्यात्कारी हास्याप्रमाणे त्यांचे हास्य अंतःकरणाला चावणाऱ्या नानाविध चिंतांच्या दंशानी व्यथित झालेल्या व आतल्या आत कुढणाऱ्या मुक्या मनाच्या आंतरिक वेदनांनी डागळलेले नसते. त्यांचे हास्य जसे अव्याज मनोहर, तसेच त्यांचे बोलणेहि निष्कपट आणि सरळ.

असे हे विद्यार्थी जीवनातील दिवस आठवले म्हणजे, विद्यार्थी दशा कधी संपूच नये, असे वाटते. तुकारामासारखे साक्षात्कारी संत 'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' अशी अभंगवाणी मुखावाटे बाहेर काढतात आणि 'प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे' असे उद्गार आधुनिक कवि देखील काढतात, यातले खरे रहस्य हेच आहे.

असे हे विद्यार्थी जीवन असते. राष्ट्राच्या उद्धाराच्या दृष्टीने देखील विद्यार्थी जीवनाची फार महति आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरीक असतो. राष्ट्रोत्कर्षाच्या भव्य मंदिराचे विद्यार्थी हे आधारस्तंभ होत. विद्यार्थ्यांतूनच भावी कर्तबगार पिढी निर्माण होणार. आपल्या प्रिय भारताला सुखाचे दिवस यावेत, तो वैभवाच्या शिखरावर आरूढ व्हावा, शक्तिशाली आणि सामर्थ्यसंपन्न राष्ट्रांकडून त्याला अग्रपूजेचा मान मिळावा, जगातील देशांच्या मालिकेत तो मेरुमण्याप्रमाणे शोभावा, साऱ्या राष्ट्रांनी त्याला मानाचा मुजरा द्यावा व तो साऱ्या जगाच्या गुरुस्थानी शोभावा ही आपली चिरवांछित इच्छा आहे. फारा दिवसांचे ते स्वप्न आहे. ही इच्छा फलद्रूप व्हावी, हे स्वप्न साकार होऊन प्रत्यक्षात अवतरावे म्हणून अनेक थोर देशभक्तांनी, आपल्या सर्वस्वाचे बलिदान केले आहे, आपल्या प्राणांची अाहुति स्वातंत्र्याच्या होमकुंडात दिलेली आहे, आणि त्यांच्याच प्रयत्नांचे फळ म्हणून आपली ही सस्यशामला भारतमाता आज स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे. आपल्या राष्ट्राचे धुरीण, पुढारी व मुत्सद्दी राष्ट्राचा उत्कर्ष व्हावा, म्हणून जिवाचे रान करीत आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना खरे यश, स्वातंत्र्याच्या काळात सध्या विद्यार्जन करीत असलेले आजचे विद्यार्थी मोठे होऊन कर्त्तव्याची धुरा आपल्या शिरावर घेतील तेव्हाच येणार आहे. आणि याची पूर्ण जाणीव आपल्या आजच्या राष्ट्रधुरीणांना आहे. आणि म्हणूनच ते विद्यार्थीजीवन समृद्ध, सर्वव्यापी, सर्वंकष व सर्वस्पर्शी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, विद्येची नवनवीन दालने उघडीत अहेत, शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याच्या दिशेने पावले टाकीत आहेत, विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यानुरूप त्यांना अभ्यासक्रम पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि विद्यार्थ्यांना विद्यादान करणारे शिक्षक आपले सर्व बळ व उत्साह विद्यादानाच्या कार्यात खर्च करू शकावे म्हणून त्यांची सांपत्तिक स्थिति सुधारण्याचे प्रयत्न करीत आहेत.

अशा प्रकारे विद्यार्थी दशा हा व्यक्तीच्या अायुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थीवर्ग हा राष्ट्रपुरुषाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. जुनी पिढी आणि नवीन उदयास येणारी पिढी यांमधील विद्यार्थी हा महत्त्वाचा दुवा आहे. विद्येचे महत्त्व अनन्यसाधारण आहे ह्याबद्दल तर कोणाचेच, दुमत नाही. 'विद्याविहीनाः पशुभि: समानाः' आणि 'विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी' या उक्ति तरी काय दर्शवितात? मनुष्याला मनुष्यत्व प्राप्त होत असेल तर ते केवळ विद्येनेच. पण ही विद्या म्हणजे केवळ पुस्तकी विद्या नव्हे. पुस्तकांच्या भाराखाली स्वतःचा मेंदू गुदमरून सोडणारा आणि पुस्तकातील केवळ किडा होऊन राहणारा विद्यार्थी हा काही खरा विद्यार्थी नव्हे. विद्यार्थ्याचा केवळ बौद्धिक विकास होऊन चालणार नाही. तर बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक, शारीरिक, आत्मिक आणि नैतिक विकासहि झाला पाहिजे. त्याचा दृष्टिकोन विशाल बनला पाहिजे. सहृदयता आणि सहिष्णुता त्याच्या अंगी बाणली पाहिजे. परधर्म आणि परमत यांविषयी योग्य तो अादर त्याच्या अंतःकरणात उत्पन्न झाला पाहिजे. जुन्या अंधश्रद्धाळु लोकांप्रमाणे त्याने आपल्या मनाचे दरवाजे बंद ठेवता उपयोगी नाही. तर सभोवतालच्या सृष्टीचे आणि समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून आणि अभ्यासक्रमात नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर ग्रंथांचेहि अध्ययन करून नवीन विचारांना आपल्या मनात प्रवेश करण्यास किंवा बुद्धीला पटत नसलेल्या विचारांना बाहेर जाण्यास त्याने पूर्ण मोकळीक ठेवली पाहिजे. रूढींची कुंपणे त्याने ओलांडली पाहिजेत आणि ज्ञानाचे कण जेथून जेथून मिळविता येतील, तेथून मिळविले पाहिजेत.

विद्यार्थी दशेत त्याने कोणत्याहि पक्षाचे अनुयायी होऊ नये. आपले मन पूर्वग्रहदूषित न ठेवता सर्व पक्षांच्या मतमतांतराचा विचार करावा. पूर्ण विचारांती जो पंथ, पक्ष किंवा मार्ग योग्य वाटेल त्याचा प्रचार त्याने विद्यार्थी दशा संपल्यावर अवश्य करावा. पण विद्यार्थी दशा चालू असेतोपर्यंत मात्र त्याने कोणत्याहि पक्षाच्या हातातील बाहुले बनू नये. अलीकडे कोवळ्या वयाचे आणि अपरिपक्व बुद्धीचे विद्यार्थी एकत्र जमवून त्यांच्या मनावर आपल्या पक्षाच्या विचारपरंपरेची पुटे चढविण्याचे पद्धतशीर व हेतुपुरस्सर प्रयत्न निरनिराळ्या पक्षाच्या धुरीणांकडून होताना दिसतात. पण ते योग्य नाही. ह्याने विद्यार्थ्यांची विचारसरणी एकांगी, संकुचित अणि दुराग्रही बनते. त्याचे मन एखाद्या साचलेल्या डबक्यासारखे बनते. असे होता उपयोगी नाही. त्याचे मन निर्मळ वाहत्या झऱ्याप्रमाणे असले पाहिजे. पुष्कळदा नगरपालिकेच्या किंवा असेंब्लीच्या निवडणुकीच्या धामधुमीत एखाद्या विशिष्ट पक्षातर्फे किंवा उमेदवारातर्फे प्रचार करण्याकरिता विद्यार्थ्यांच्या मिरवणुकी काढण्यात येतात आणि पक्षांध राजकारणाचे विषारी संस्कार त्यांच्या कोवळ्या मनावर केले जातात. हे सर्वथैव गैर आहे. आपल्या पक्षाच्या प्रचाराकरिता विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राबवून घेण्याचे प्रयत्न जर असेच चालू राहिले तर विद्यार्थीजीवन दूषित झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा समाजनेत्यांनी या गोष्टीचा योग्य विचार करावा.

विद्यार्जनाबरोबरच आज्ञाधारकपणा, नियमितपणा व वक्तशीरपणा, शिस्त, सहकार्य, उद्योगप्रियता, स्वावलंबन, सचोटी, प्रामाणिकपणा, वाडवडिलांविषयी व गुरुजनांविषयी आदर हे सद्गुणहि विद्यार्थ्याच्या अंगी बाणले पाहिजेत. श्रमाची थोरवी त्याला कळली पाहिजे. दलितांविषयी त्याच्या मनात सहानुभूति आणि सहसंवेदना उत्पन्न झाली पाहिजे. त्याच्या डोळ्यासमोर उच्च आदर्श ठेवण्यात आले पाहिजेत. पण या दृष्टीने हल्ली कितीसा प्रयत्न केला जातो?

विद्यार्थ्याचे शील किंवा चारित्र्य ही सध्या सर्वात जास्त उपेक्षिली गेलेली बाब आहे. शाळेच्या किंवा काॅलेजच्या चार भिंतींच्या आत शिस्तीचे काय पालन केले जात असेल तेवढेच. पण ही शिस्त भीतीच्या पोटी जन्म पावलेली असते. ती त्यांच्या जीवनात उतरत नाही. तोंडाने सिगरेटचा धूर सोडीत, पानाच्या ठेल्यासमोर घोळक्या-घोळक्यांनी उभे राहत असलेले आणि चौरस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे पाहून तोंडावाटे अचकट विचकट प्रलाप बाहेर काढीत रहदारीला अडथळा उत्पन्न करणारे, किंवा चित्रपटगृहासमोर दंगल माजविणारे विद्यार्थ्यांचे थवे पाहिले म्हणजे हेच का आमच्या राष्ट्राचे आधारस्तंभ, हा विचार मनात येऊन चित्त चरकल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थी हा केवळ शाळेच्या किंवा कॉलेजच्या आवारातच विद्यार्थी असतो, आणि एकदा का त्या आवाराच्या बाहेर पाऊल टाकले म्हणजे त्याला वाटेल तसे वागण्याचा सदर परवाना असतो असे थोडेच आहे? शाळेच्या किंवा कॉलेजच्या बाहेरचे त्याचे वर्तनहि विद्यार्थ्याला साजेसेच असले पाहिजे. विद्यार्थी हा घरी, शाळेत, क्रीडांगणावर, रस्त्यावर, सभेत, सामाजिक उत्सवात, चित्रपटगृहात आणि प्रदर्शनात विद्यार्थीच असला पाहिजे आणि त्याचे वर्तन कोठेहि विद्यार्थ्याला न शोभणारे असता कामा नये. बाष्कळ कादंबऱ्या, मागणी तसा पुरवठा या न्यायाने प्रसिद्ध होणारे सध्याचे अनैतिक बोलपट आणि रस्तोरस्ती झालेली उपहारगृहे ही विद्यार्थ्यांचे वर्तन बिघडण्यास बऱ्याच अंशी कारणीभूत होतात. तेव्हा यावर नियंत्रण घालण्यात आले पाहिजे. ते कसे घालावे याचा विचार या लेखात कर्त्तव्य नाही. येथे फक्त रोगाच्या मुळाशी असलेल्या बीजांकडे अंगुलिनिर्देश केलेला आहे. सभोवतालचे दूषित वातावरण, उच्च अादर्शाचा अभाव, शिथिल होत चाललेली नीतिमूल्ये आणि दिवसानुदिवस लोप पावत असलेली आंतरिक श्रद्धा, धार्मिक व नीतिशिक्षणाचा अभाव, वाढती बेकारी, जीवनाच्या सर्व क्षेत्रात बोकाळलेली प्राणघातक स्पर्धा, लाचलुचपतीचा प्रादुर्भाव, विविध प्रलोभने, यासारखी अनेक कारणे समाजाच्या नैतिक ऱ्हासाकरिता पुढे करता येण्यासारखी आहेत. असो. समाजाची नैतिक पातळी कशी उंचावता येईल हा मोठा विस्तृत आणि बिकट प्रश्न आहे. तो अल्पश्रमाने व धावत्या प्रयत्नांनी सुटण्यासारखाहि नाही. त्याकरिता मूळालाच हात घातला पाहिजे. मूलगामी उपाय योजले पाहिजेत, आणि त्याकरिता प्रथम शाळाकॉलेजातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व विद्यार्थिनींची मने निरोगी, कणखर, सुसंस्कारित, सहिष्णू आणि सहनशील कशी बनतील या दृष्टीने विचार केला पाहिजे. विद्यार्थी सामर्थ्यसंपन्न आणि नीतिमान झाले तर सारा समाज सामर्थ्यशाली आणि नीतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थीवर्ग हा समाजपुरुषाच्या पाठीचा कणा आहे. त्यात कोणतीहि विकृति उत्पन्न होता उपयोगी नाही. त्यात जर विकृति उत्पन्न झाली तर समाजाचे कंबरडेच मोडेल.

विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला अभ्यासक्रम देण्यात आला पाहिजे. एखाद्या कलेत किंवा हस्तव्यवसायात ज्याच्या बुद्धीची गति आहे त्याला गणिताची आकडेमोड कशाला? पुष्कळदा यामुळे 'Square pegs in a round hole' यासारखी अवस्था होते.

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की पुष्कळदा शाळाकॉलेजातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत खोट्‌या प्रतिष्ठेची भावना निर्माण होते. त्यांना शारीरिक श्रम करण्याची लाज वाटू लागते. शाळा कॉलेजातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी कोणती ना कोणती नोकरी मिळविण्यासाठी खटपट करतो, आणि मग No Vacancy च्या खडकावर डोके आपटून स्वतःचा कपाळमोक्ष करून घेतो. तेव्हा सर्वांनी नोकरीच्या मागे न लागता निरनिराळ्या उत्पादक धंद्यात शिरून राष्ट्राची संपत्ति वाढविली पाहिजे. श्रमाची महति त्याला कळली पाहिजे, आणि त्या दृष्टीने शिक्षणक्रमात योग्य तो बदल घडवून आणला पाहिजे.

इंग्रजांच्या राजवटीत गुलामी मनोवृत्तीचे कारकून पैदा करण्याकरिता लॉर्ड मेकॉलेने इंग्रजी शिक्षणपद्धति हिंदुस्थानात सुरू केली. तो हेतु बऱ्याच अंशी सिद्धीसहि गेला. पण तेच इंग्रजी शिक्षण घेऊन विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारखे लोकहि देशात उत्पन्न झाले, आणि त्यांच्या अविरत प्रयत्नांना अखेरीस स्वातंत्र्याचे फळ लागून त्यांची तपस्या सिद्धीस गेली. स्वातंत्र्यसूर्याचा उदय झाल्यानंतर शिक्षणाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोणहि अर्थातच बदलला आणि त्याकडे देशहिताच्या व्यापक दृष्टिकोणातून पाहण्यात येऊ लागले. शिक्षणक्षेत्रातहि आज अनेक बिकट समस्या आ वासून उभ्या आहेत. पण सर्वांच्या एकजुटीने व सहकार्याने त्या सोडविल्या जातील, आणि विद्यार्थी जीवन अधिकाधिक समृद्ध होईल असे वाटते.

विद्यार्थि जीवनाशी निगडित असलेल्या विषयांवरही अमाप लेखन आहे. निवडक विषयांचा उल्लेख करणे आवश्यक वाटते. शाळेत नैतिक शिक्षणाचे महत्त्व (निबंध), शिस्तीचे महत्त्व (निबंध), भारताचे स्वातंत्र्यरक्षण आणि विद्यार्थ्यांची कर्त्तव्ये (भाषण), Moral and religious education in schools and colleges (निबंध), विद्यार्थ्यांतील अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात धार्मिक व नैतिक शिक्षणाचा समावेश करणे आवश्यक आहे (वादविवाद, समर्थन), आजचे चित्रपट व विद्यार्थी (परिसंवाद), आजचे विद्यार्थी गैरशिस्त नाहीत (वादविवाद, विरोध), आजच्या शिक्षणात इंग्रजीचे स्थान (भाषण), मी आपल्या गुरुजनांपासून काय शिकले (भाषण), स्वामी विवेकानंदांची खऱ्या शिक्षणाची कल्पना (निबंध), विद्यार्थ्यांची कर्तव्ये (भाषण), सद्यपरिस्थितीतील विद्यार्थ्यांची कर्त्तव्ये (निबंध), छडी लागे छमछम, विद्या येई घमघम (भाषण), आजच्या विद्यार्थी जीवनातील अनिष्ट प्रवृत्ती (भाषण), पर्यावरण शिक्षण (निबंध), नैतिक शिक्षण (निबंध), Students and discipline (निबंध), Knowledge is power (निबंध), Travelling as part of education (निबंध) इत्यादि. हे सर्व लिखाण वगळताना मनावर दडपण होते. शक्यतोवर समावेश करण्यात आलेल्या लिखाणात ह्या गाळण्यात आलेल्या लिखाणांचीही चव उतरेल अशी दक्षता घेतली आहे.

हे साहित्य संकलन करायला सुरुवात केली तेव्हा त्याला काय स्वरूप येईल याचा फारसा विचार मी केला नव्हता. जसे जसे काम पुढे पुढे जाऊ लागले तसे तसे ते फार मोठे आहे हे लक्षात येऊ लागले. सर्वच लिखाणाचा अंतर्भाव केला तर पुस्तक फारच लठ्ठ होईल हेही लक्षात आले. पुस्तक जसजसे लठ्ठावते तसतसा वाचकवर्ग रोडावतो. तसे झाले तर सर्व श्रम वाया जातील हे लक्षात आले. नंतर निवडक लिखाणच घ््यायला सुरुवात केली. जवळजवळ २५-३० टक्के लेख, निबंध गाठोडीतच घडीबंद राहिले. त्यांचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्याआधी मी घडी उलगडून ते वाचून काढले. पुन्हा जी घडी पडली ती आता बहुधा कधीच न उघण्यासाठी. जाता जाता ह्या सर्व मंडळींची माफी मागणे आवश्यक आहे. समावेश न करण्यात आलेल्या पण वर उल्लेखिलेल्या लेखांव्यतिरिक्त माफीचे हक्कदार असे. माझा महाराष्ट्र (भाषण), पाऊस (निबंध), माझे बाबा (लघुकथा), माझी दिनचर्या (भाषण), लोकमान्यांचे व्यक्तिमत्व (निबंध), लोकोपयोगी कर्तव्यकर्म! (भाषण, हिंदी), स्वधर्मे निधनं श्रेय: (भाषण), गीतेची उपयुक्तता (भाषण), गीतोक्त चातुर्वर्ण्य (निबंध), श्री समर्थांच्या चरित्रातील कोणता भाग मला आवडतो व तोच कां (भाषण), भगवान श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व (निबंध), असे होते स्वामी विवेकानंद (निबंध), स्वराज्यात सामाजिक सुधारांना गौण स्थान आहे (वादविवाद, विरोध), आजच्या जगात विज्ञानाने केलेली प्रगति (निबंध), धार्मिक उत्सवांचे महत्त्व (भाषण), गणेशोत्सव धार्मिक दृष्टीने न मानता राष्ट्रीय दृष्टीनेच केला पाहिजे (वादविवाद, समर्थन), जगाच्या कल्याणासाठी राजकारणी पुरुषांपेक्षा साहित्यिकांचीच नितांत आवश्यकता आहे (वादविवाद, समर्थन), मराठी वृत्तपत्रांची साहित्यिक कामगिरी (भाषण), महाराष्ट्रदर्शन (प्रवासवर्णन), चंदाराणी (पुरुषपात्रविरहित नाटिका), मेसर्स एलिफंट अँड कंपनी (स्त्रीपात्रविरहित नाटिका), त्रिकाल (कविता), स्वातंत्र्याची मंगलगाथा (कविता), लोकमान्य स्तवन (कविता), जय श्री गंगे (कविता), संतस्मरण (कविता), मराठी असे आमुची मायबोली (निबंध), स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी (निबंध), सूर्य (निबंध), चंद्र (निबंध), याच कारणामुळे मला स्वामी विवेकानंदांची थोरवी पटते (निबंध), ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर, १९७१ (युद्धकथा), To err is human (निबंध), Women have made a mistake in asking for equality (वादविवाद, समर्थन), Sweet are the uses of adversity (निबंध), इत्यादि.

वरील यादी पाहता हे लक्षात येईल की प्रस्तुत पुस्तक हे बाबांच्या साहित्याचे संपूर्ण संकलन नव्हे. बाबांच्याच ४२ वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या व प्रकाशात न आलेल्या एका कवितेने हे अपूर्ण संकलन आता पूर्ण करू या.


अपूर्णतेचा शाप


पूर्णापासुनि विश्व निघाले जाते पूर्णाकडे
भलेही म्हणोत जन बापुडे
मदीय बुध्दी असे सांगते की हे नच कधि घडे
पहा हे प्रत्यंतर रोकडे
गुलाब पुष्प परिपूर्ण विकसता गळती त्या पाकळ्या
होउनी विशीर्ण त्या साकल्या

चंद्रबिंब हे पूर्णत्वा पोचते
न पोचते तो ग्रहण तया लागते
क्षयवृध्दीचे चक्र तया बाधते
अपूर्णतेचा शाप जगाला खरोखर हा असे
पहा हे डोळे उघडा कसे

गुलाब अपुल्या रूपसौरभे घालि जगा मोहन
तनूवरि काट्यांची पखरण
डौलदार गजदेह शोभतो गंडस्थळि मौक्तिके
नेत्र की परंतु त्या मिचमिचे
मत्तमयुर हा नाचत थयथय वर्षागमि डोलतो
चरण की हेंगाडे दावितो

इंद्रचाप जरि रुचिर, क्षणभंगुर
कस्तुरी सुगंधित,  मृत्तिका केवळ
रंगरुपाची माया ना तिजवर
सर्व गुणांचा सुयोग्य संगम दुर्लभ या जगि असे
अपूर्णचि सारे जगती दिसे

प्रखररश्मि चंडांशु दिवाकर ग्रहण तया लागते
खद्योत तुच्छ तेज मिरविते
शशांकशोभा शारदीय अति शांति मना देतसे
मृगाचा कलंक हिणवीतसे
सरोवरातिल सरोज सुंदर सौंदर्ये सुखविते
रसिक कविमानस संतोषते

परि मूळ तयाचे चिखले ते माखले
कृष्णभृंग दु:संगतिने भुलविले
लुटिले रससर्वस्व परी नुमगले
विद्युल्लतिका दिपवि नयन परि केवळ एक क्षण
पुनरपि घन तिमिर निबिड दारुण

सच्चिदानंद परब्रह्म हे जगति अवतरले
जना अवतार नाट्य दाविले
गीतापीयुष पार्थमिषाने जगता पाजियले
परी ते सांगा का बदलले?
देवर्षींनी संतमहात्मी वळण जया लावले
परी ते श्वानपुच्छ भासले

चैतन्याला बंध जडाचा पडे
निरपेक्षाला सापेक्षाचे तडे
पूर्णालाहि अपूर्णता परि नडे
दिक्कालाचे बंधन पडता परब्रह्म ते रडे
तरी मग काय करी बापुडे ?

_____________________